सायबर क्राईम जनजागृती काळाची गरज – पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे
दयानंद कला महाविद्यालय सायबर क्राईम जनजागृती कार्यक्रम संपन्न!
लातूर (प्रतिनिधी) : विज्ञानाची व तंत्रज्ञानाची प्रगती होत असतानाच सायबर क्राईम मध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते आहे. मोबाईल व संगणक वापरत असताना ते जितके फायदेशीर आहेत तितकेच त्यातील धोके सुद्धा आहेत. या संदर्भातली जनजागृती ही सर्व नागरिकांत होणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन लातूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले. ते दयानंद कला महाविद्यालयात आयोजित आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सायबर क्राईम जनजागृती कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड हे होते. ते म्हणाले की,” दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या स्वरुपात बदल होताना दिसतो आहे. घरफोडी,पाकीटमार करणे अशा किरकोळ चोरांपासून आज ऑनलाइनच्या माध्यमातून अकाउंट हॅक करणे, एटीएमच्या माध्यमातून चोरी करणे अशी गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून ऑनलाइन व्यवहार करणे गरजेचे आहे.
याप्रसंगी सायबर क्राईमचे पोलीस निरीक्षक अशोक बेले यांनीही जनजागृतीपर मार्गदर्शन केले. तसेच सुरज गायकवाड यांनी पावर पॉइंट प्रझेंटेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सायबर क्राईमच्या संदर्भातील सविस्तर माहिती दिली. हॅकिंग, फिशिंग,चाईल्ड पॉर्नोग्राफी,ई शेअर मार्केट, पासवर्ड सिक्युरिटी याची माहिती त्यांनी सांगून यातून कशा पद्धतीची सायबर गुन्हेगारी वाढते हे त्यांनी सविस्तर सांगितले. एवढेच नव्हे तर यासाठी कुठली कलमे लागू होतात याबाबत ही जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी प्रार्थना गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य अनिलकुमार माळी यांनी केले तर कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी पर्यवेक्षक डॉ.दिलीप नागरगोजे यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.संदीप जगदाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा जिगाजी बुद्रुके यांनी केले. याप्रसंगी सायबर क्राईमचे प्रदीप स्वामी व संतोष देवडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी अकरावी ते एम.ए.चे अनेक विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्यक,प्रा. सचिन पतंगे, प्रा. इरफान शेख व प्रीतम मुळे यांनी केले.तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा संजय कुलकर्णी,प्रा. दयानंद शिरुरे,प्रा. अंजली बनसोडे, डॉ गोपाल बाहेती आदींनी परिश्रम घेतले.