जगणे झाले बेहाल…! अन् प्राण कंठाशी आला…!!
अहमदपूर (गोविंद काळे) : ‘जगू कशी मी तुझ्याविना,
जगणे झाले बेहाल…!
अन्….
प्राण कंठाशी आला …!!
तूच सांग सजना आता,
जगू कशी तुझ्याविना…’
कवयित्री मनीषा सूर्यवंशी यांच्या या विरहार्तता असलेल्या कवितेने रसिकांची प्रचंड दाद घेऊन कविसंमेलनाचा उत्साह द्विगुणित केला.
किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर द्वारा संचालित महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूरच्या मराठी विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या संकल्पनेतून ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा ‘ समारोपानिमित्त आजी-माजी विद्यार्थ्यांचे गुगलमीट या दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या ३० कविंच्या उपस्थितीत कवी संमेलन पार पडले. या आजी माजी विद्यार्थ्यांच्या अभिनव कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी अहमदपूर येथील यशवंत विद्यालयाच्या सहशिक्षिका तथा माजी विद्यार्थी वर्षा लगडे ह्या होत्या. तर उद्घाटक म्हणून किलबिल प्राथमिक शाळा, अहमदपूरच्या मुख्याध्यापिका तथा माजी विद्यार्थी सरोजा भोसले ह्या उपस्थित होत्या. या कविसंमेलनाचे प्रास्ताविक मुंबई येथील ॲमिटी युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापिका डॉ.स्वाती जोशी यांनी केले. यावेळी त्यांनी कविता या साहित्यप्रकाराची सविस्तर माहिती देऊन –
” शब्द कधी कुणाला देतात सूर
तर शब्द कधी भासतात बेसूर
शब्दच लावतात माणसात
भांडण शब्दांमुळेच येतो
जगण्यात प्राण शब्द
असते माणसाचे सामर्थ्य
शब्दच करतात अर्थाचा अनर्थ
शब्द मिळवून देतात न्याय
तर कधी शब्दच करतात
अन्याय”
ही कविता सादर केली. आपल्या उद्घाटकीय मनोगतामध्ये अहमदपूर येथील किलबिल प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सरोजा भोसले यांनी-
” सुगंधी जखमांचा मगमली थर
आता वाटतं तेव्हा तुला बोललो
असतो तर “
ही रचना सादर केली. त्यानंतर थेट कोकणातून एका आदिवासी पाड्यावरील शाळेच्या सहशिक्षिका मनीषा सूर्यवंशी यांनी –
“जगू कशी मी तुझ्या विना
जगणे झाले बेहाल
प्राण आला कंठात
तूच सांग सजना आता
जगू कशी तुझ्याविना..? “
ही विरहाची रचना सादर केली.
एमपीएम माजी विद्यार्थी संघाचे प्रमुख राहुल गायकवाड यांनी –
” जगात पसरली जेव्हा
कोरोनाची सावली
डॉक्टरांच्या रूपात
उभी राहिली ती माऊली
बाळासाठी आई
जशी मदतीस धावली
कुठे गेली माणुसकी जेव्हा
गावाकडची वाट अडवली”
ही कोरोना काळात सर्वसामान्य माणसांच्या झालेल्या दुरवस्थेचे चित्रण करणारी कविता सादर केली. लातूर येथील कवयत्री आशा भराडिया यांनी –
“आई माझी मायेचा सागर
दिला तिने जीवना आकार “
ही रचना सुंदर आवाजात गायली तर ऐश्वर्या रेचेवाड या विद्यार्थिनीने-
“आभाळाची आम्ही लेकरे
आभाळाची आम्ही पाखरे
निसर्गाची छाया
आम्हा लाविते माया”
ही नितांत सुंदर निसर्ग कविता म्हणून दाखवली. अनाथांची माय म्हणून ओळखल्या गेलेल्या सिंधुताई सपकाळ यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारी ‘अनाथांची माई’ ही कविता मोहिनी मेकाले या विद्यार्थिनीने सादर केली. बी.ए.तृतीय वर्षात शिकणाऱ्या अंजली हुलगुंडे या विद्यार्थिनीने –
“देवांनाही खाली
यावे लागले तुझे रूप
पाहायला
शब्दच नाही गं आई
तुझे गुणगान गायला “
तर बी.ए. प्रथम वर्षाच्या वैष्णवी मुंडे हिने-
‘नसतेस जेव्हा घरी तू
घर परक्यासारखे वाटते
अशी कशी गं आई तू
मला सतत हवीहवीशी वाटते’
अशा आईचे महत्त्व सांगणाऱ्या रचना सादर केल्या. लोहा येथील कवी संतोष चमकुरे यांनी माय मराठीचे महत्त्व सांगणारी-
“माय लेकराला
जसा लाविते जिव्हाळा
तसा लावा माझ्या
मायमराठीला लळा”
ही बहारदार रचना सादर केली. राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी आपल्या कवितेतून वृक्षारोपणाचा संदेश दिला. आपल्या कवितेतून ते म्हणाले-
” ध्यास घ्यावा फुलांचा
रंग गंधही प्यावे
नकळत त्यांच्यामधले
फुल होऊन जावे
ध्यास घ्यावा निसर्गाचा
व्रत घ्यावे सेवेचे
या हातांनी देता देता
एक तरी झाड लावावे”
महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख तथा अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ. नागराज मुळे यांनी-
” जा जिंकून ये जग सारे
या जीवनातच उदात्त सुंदर
उत्कृष्ट असे काही कर तू
गौरवाने आठवतील तुला
या नंतरच्या अनेक पिढ्या “
ही प्रेरणादायी रचना सादर केली.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा शीघ्र कवी डॉ. दुर्गादास चौधरी यांनी –
“माझा जन्म मराठी
माझा श्वास मराठी
माझी आस मराठी
माझा ध्यास मराठी “
अशी मराठीची गौरव गाथा गायली. तर भूगोल विभाग प्रमुख दिगंबर माने यांनी –
“उसवलेली मनं
आणि फाटलेली नाती-गोती
शिवण्याची कला आपल्याला
जमली पाहिजे मित्रा
जना-मनातल्या आणि
गल्लीबोळातल्या
माणुसकीच्या भिंती
उभारायला आपल्याला
शिकलं पाहिजे मित्रा “
ही गंभीर प्रकृतिचीची कविता सादर केली.
या कवि संमेलनासाठी प्रा. अर्जुन घोगरे यांनी ‘ शहीद जवान ‘ , सावन बावणे यांनी ‘शेतकरी ‘ , संगीता जाधव यांनी ‘आंधाराने आच्छादले धुके ‘, प्रशांत बेले यांनी ‘पोलिसा चे जीवन, ‘पल्लवी कांबळे ‘ यांनी ‘तिचा प्रश्न ‘ ,दीपक काकडे यांनी ‘सर ‘, विश्वनंदा नंदवंशी यांनी ‘ बाप ‘ , क्रांती राठोड यांनी ‘ सेवाभाया ‘, मेघा ससाणे यांनी ‘गीतक्रांतीचे ‘, स्नेहा कांबळे, मेघा ससाणे यांनी ‘सावित्रीबाई फुले ‘, संजीवनी येडले, कान्होपात्रा क्षीरसागर यांनी भक्तीपर कविता सादर केली या कवींसोबतच प्रा. शंकर घाडगे, दिव्या दहिकांबळे, शंकर कदम या आजी माजी विद्यार्थ्यांसह डॉ. एस.जी. ससाणे यांनी ‘हे क्रांतीबा’,आदी कविता सादर केल्या. या कविसंमेलनाची सांगता प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या ‘ कविता म्हणजे असते काय ?कविता असते दुधावरची साय ‘ या कवितेने झाली . तसेच कविसंमेलनाचा अध्यक्षीय समारोप वर्षा लगडे यांनी ‘अंतराळ यात्री’ या कवितेने केला.
या कवि संमेलनाचे प्रास्ताविक अमेटी युनिव्हर्सिटी मुंबईच्या प्रा. डॉ. स्वाती जोशी यांनी केले तर बहारदार सूत्रसंचलन महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवि डॉ. मारोती कसाब यांनी व कवींचा परिचय ह.भ.प. प्रो. डॉ. अनिल महाराज मुंढे यांनी करून दिला तसेच आभार अधिक्षक, मूकबधीर निवासी विद्यालय, काळी ता. महागाव जि. यवतमाळ तथा माजी विद्यार्थी महादेवी चौकटे यांनी मानले. कवि संमेलनाची सुरुवात वंदे मातरम् ने तर सांगता राष्ट्रगीताने झाली.