उदगीर (प्रतिनिधी) पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जीवन व शिकवणीचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने परिवर्तन सीरत कमिटी, उदगीर, जि. लातूर यांच्या वतीने इजलास-ए-आम चे आयोजन करण्यात आले. भाजी मार्केट, पतेवार चौक, उदगीर येथे झालेल्या या कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाची सुरुवात हाफिज सय्यद हुजैफा तौहीद खतीब यांनी पवित्र कुराण पठणाने केली. त्यानंतर हाफिज मुदस्सिर नबी शेख यांनी आपल्या गोड आवाजात नात अर्थात पैगंबर स्तुतीगीत सादर केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हजरत मौलाना हाफिज सय्यद जियाउद्दीन मजाहिरी साहेब होते. प्रमुख उपस्थिती म्हणून माजी नगरसेवक अहमद सरवर, सनाउल्लाह खान, ओम गांजुरे आणि अब्रार पठाण, लईक खान उपस्थित होते.
प्रमुख वक्ते हजरत मौलाना अबरारुल हसन रहमानी, हैदराबाद आणि मौलाना मोईजुद्दीन कासमी , लातूर यांनी पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जीवनातील विविध प्रसंग, त्यांची शिकवण, मानवतेप्रती असलेली करुणा, सामाजिक न्याय, बंधुभाव, शांतता आणि नैतिक मूल्ये यावर सविस्तर प्रकाश टाकला.
मौलाना अबरारुल हसन रहमानी यांनी पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी दिलेल्या मूलमंत्राचा उल्लेख करत, अल्लाहवरील श्रद्धेला जीवनात अत्यंत महत्त्व असल्याचे स्पष्ट केले. श्रद्धा जितकी दृढ असेल, तितकेच मनुष्याचे आचरण शुद्ध राहते. पैगंबरांची सुन्नत म्हणजेच त्यांचे आचरण आपल्या जीवनात आणण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. परमेश्वरावरील भक्तीचा परिणाम आपल्या आचरणातून दिसून आला पाहिजे; तरच ती भक्ती सार्थ ठरते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मराठी भाषेत मार्गदर्शन करताना अब्दुल मुजीब देवणीकर यांनी पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे मानवतेचे उपकारक असून ते संपूर्ण मानवजातीसाठी मार्गदर्शक असल्याचे सांगितले. तसेच पैगंबर आणि महामानव यातील फरकही त्यांनी स्पष्ट करून सांगितला.
वक्त्यांनी पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे संपूर्ण मानवजातीसाठी दया, प्रेम, क्षमा आणि मार्गदर्शनाचा आदर्श असल्याचे सांगितले. त्यांच्या जीवनातून आजच्या समाजाला मिळणारा संदेश आणि त्यांच्या शिकवणीची वर्तमान काळातील उपयुक्तताही त्यांनी स्पष्ट केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हाफिज अब्दुल अजीज राजा पटेल यांनी केले. परिवर्तन सीरत कमिटीच्या वतीने दरवर्षी उदगीर येथे अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. अझरोद्दीन शमशोद्दीन शेख हे परिवर्तन सीरत कमिटीचे संस्थापक अध्यक्ष असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सीरतविषयक विविध उपक्रम राबविले जातात.
कार्यक्रमाच्या शेवटी परिवर्तन सीरत कमिटीचे संस्थापक अध्यक्ष अझरोद्दीन शमशोद्दीन शेख यांनी आभार मानले. दरवर्षी अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्याची परंपरा अखंडितपणे सुरू ठेवू, असा विश्वास त्यांनी उपस्थित श्रोत्यांसमोर व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिवर्तन सीरत कमिटीचे पदाधिकारी, व मौलाना अजीज पटेल, सामाजिक कार्यकर्ते शेख हमीद, कुरेशी उमर, सद्दाम बागवान, अन्सार सिद्दिकी तसेच इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. याशिवाय अनेकांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.
उपस्थित नागरिकांनी कार्यक्रमाचे कौतुक करत, पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जीवन व शिकवणीचा संदेश समाजात अधिक व्यापकपणे पोहोचविण्याची गरज व्यक्त केली.














Responses (0 )