जातीच्या चौकटीतून कोणत्याही महापुरुषांच्या विचारांना समजून घेता येत नाही – ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुरेश वाघमारे यांचे प्रतिपादन
अहमदपूर (गोविंद काळे) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक मान्यतेचे विद्वान होते; त्यांनी जगाला समता, स्वातंत्र्य बंधुता व न्याय आदी मानवी मूल्यांचा समावेश असलेल्या भारतीय संविधानाला जग मान्यता मिळवून दिली. अशा महापुरुषाला जर आपण जातीच्या चौकटीत बांधण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे विचार समजून घेणे शक्य नाही, असे स्पष्ट प्रतिपादन मुरुड येथील संभाजी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा ज्येष्ठ सामाजिक विचारवंत डॉ. सुरेश वाघमारे यांनी केले.
ते अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व महात्मा फुले महाविद्यालय, अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय ई -चर्चासत्राच्या बीजभाषण प्रसंगी बोलत होते. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य तथा महाराष्ट्रातील ज्येष्ठ समीक्षक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे सचिव ज्ञानदेव झोडगे तसेच किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे कार्यकारी संचालक पृथ्वीराज अशोकराव पाटील एकंबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. आभासी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन रेनी (जर्मनी ) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे अभ्यासक रवी वाघमारे यांनी केले. प्रारंभी किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर चे कार्यकारी संचालक पृथ्वीराज अशोकराव पाटील एकंबेकर यांनी आपल्या शुभ संदेशातून या अंतरराष्ट्रीय चर्चासत्राला शुभेच्छा दिल्या. तर बीजभाषक म्हणून आपले विचार मांडताना प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणण्याची गरज आहे, त्यांना ज्या पद्धतीने अभिप्रेत होते त्याच पद्धतीने त्यांची जयंती साजरी होणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रातूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या विचाराला अभिवादन केले जाऊ शकते.डॉ. आंबेडकर हे आजन्म विद्यार्थी होते आणि त्यांनी ज्ञानाला वाहून घेतले होते असे ही ते म्हणाले. या चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी जर्मनी येथील रेने या शहरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अभ्यासक रवी वाघमारे म्हणाले की, शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ‘ हा मूलमंत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला, यामुळेच सामाजिक विषमता नष्ट झाली, असे ते म्हणाले.
या चर्चासत्राच्या द्वितीय सत्रामध्ये कॅलिफोर्निया अमेरिका येथून प्रा. डॉ.चैताली बोरसे, असाम येथील प्रा. साधना शर्मा तर मुंबई येथील प्रा. डॉ. सोनाली वाखर्डे यांनी अभ्यासपूर्ण शोध निबंधाचे वाचन केले. या शोधनिबंध वाचन सत्राच्या अध्यक्षस्थानी सोलापूर येथील प्रा. डॉ. प्रतिभाताई बिरादार ह्या होत्या. या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचा अध्यक्षीय समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आज समाजाला गरज आहे. त्यांचे विचार अंगीकारून अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद मिळते. तसेच शिक्षण समाजपरिवर्तनाचे उत्तम माध्यम आहे, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिले. त्यातूनच त्यांनी अस्पृश्यतेचे विषारी पीक समाजात आपली मुळे रोऊन डौलाने डोलत होते. त्यासमुळापासून उखडून टाकण्याचा निर्धार केला. असेही ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषाशैलीचा अभ्यास अभ्यासकांनी करणे गरजेचे आहे कारण समाजाच्या विषमतेवर प्रखरपणे तुटून पडण्याची त्यांची भाषा होती असेही ते शेवटी म्हणाले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत ‘युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘ या ग्रंथाचे आभासी पद्धतीने प्रकाशन करण्यात आले. या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे प्रास्ताविक संयोजक तथा समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सतीश ससाने यांनी केले तर सूत्रसंचालन मराठी विभागाचे डॉ . मारोती कसाब यांनी व आभार मराठी विभागाचे ज्येष्ठ प्रा. डॉ. अनिल मुंढे यांनी मानले. या अंतरराष्ट्रीय चर्चासत्रास देश-विदेशातून चारशेहून अधिक अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थी आभासी पद्धतीने सहभागी झाले होते.