पुणे ; अवैध प्रवासी वाहतूक जोमात,पोलिस यंत्रणा कोमात
पुणे (केशव नवले) : ग्रामीण भागात धोकादायक अवैध प्रवासी वाहतुकीने कहर केला असून शहरात किमान काही प्रमाणात अशा वाहतुकीवर नियंत्रण
शहराप्रमाणेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही अवैध प्रवासी वाहतुकीने कहर केला असून, शहरी व ग्रामीण भागात वाहतूक पोलिसांचे अस्तित्वच कुठे दिसत नाही. त्यामुळे एकेका रिक्षात प्रमाणापेक्षा कितीतरी अधिक प्रवाशांची वाहतूक होताना दिसते. अशा प्रकारच्या वाहनांना कधी एखादा अपघात झाल्यास वाहतूक पोलिसांकडून काही दिवस कारवाईचे नाटक केले जाते. नंतर परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ होते.
शहरी ग्रामीण भागातील जवळपास बहुतेक बस स्थानकांना खासगी प्रवासी वाहतुकदारांचा गराडा राहात असल्याने या वाहतुकदारांचे दलाल किंवा स्वतः वाहतूकदार बस स्थानकातून प्रवासी पळविण्याचेही काम करतात. हे वाहतूकदार लहान मुलांचे कोणतेही भाडे घेत नाहीत, शिवाय प्रवासी सांगतील त्या ठिकाणी वाहन उभे करण्यात येते. या फायद्याच्या गोष्टींमुळेही बसऐवजी प्रवाशांकडून रिक्षा सेवेला प्राधान्य दिले जाते. अर्थात प्रवाशांच्या दृष्टीने या जमेच्या बाजू असल्या तरी खासगी प्रवासी वाहतूक ही तितकीच धोकादायकही आहे. बस चालकावर जबाबदारीचे ओझे असल्याने सुरक्षितपणे बस चालविण्यास त्यांच्याकडून प्राधान्य दिले जाते. याउलट खासगी प्रवासी वाहतूकदारांना दिवसातून अधिकाधिक फेऱ्या करून कमाई करावयाची असल्याने त्यांच्याकडून वाहन चालविताना सुरक्षिततेऐवजी वेगाला अधिक प्राधान्य दिले जाते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक असते.
नाशिक फाटा, भोसरी, चाकण, राजगुरूनगर, कामशेत, देहूरोड, कात्रज, हडपसर याठिकाणी अवैध प्रवासी वाहतुकीने कळस गाठलेला दिसून येईल. वाहनांमध्ये प्रवासी अक्षरश: कोबून भरलेले असतात. एकेका रिक्षात चार ते दहा दरम्यान गेलेली दिसून येईल. ही धोकादायक वाहतूक पोलिसांच्या देखत होत असतानाही त्यांच्याविरूध्द कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. वाहतूक पोलिसांना ठराविक ‘हप्ता’ दिल्यावर कारवाईपासून मुक्तता होत असल्याची चर्चा आहे. हप्ता थकल्यावर मात्र पोलिसांकडून कारवाई होते. बऱ्याच वेळा रिक्षांची तपासणी होणार असल्याचे चालकांना आधीच कळलेले असते. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या एखाद्या वाहनास अपघात झाल्यावर या विषयाचा गवगवा होत असल्याने वाहतूक पोलिसांना काही दिवस कारवाईचा ‘फार्स’ करणे भाग पडते. वरीष्ठ अधिकाऱ्यांनी नियमितपणे तपासणी मोहीम सुरू केल्यास अशा प्रकारच्या अवैध वाहतुकीस आळा बसू शकेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.