फुले दांपत्यांनी शैक्षणिक क्षेत्रात क्रांतिकारक कार्य केले – डॉ. सदाशिव दंदे
अहमदपूर (गोविंद काळे) : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सनातनी वर्गाचा विरोध पत्कारून स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य केले. त्यांचे हे कार्य म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातील क्रांतिकारी कार्य होय, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदाशिव दंदे यांनी केले. ते महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर येथे स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व महात्मा फुले महाविद्यालय, अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात बोलत होते. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे सचिव ज्ञानदेव झोडगे तसेच किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे कार्यकारी संचालक पृथ्वीराज अशोकराव पाटील एकंबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या ऑनलाईन एक दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन कॅलिफोर्निया अमेरिका येथील डॉ. देवयानी बोरसे यांनी केले. तर प्रारंभी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी संचालक पृथ्वीराज अशोकराव पाटील एकंबेकर यांनी या चर्चासत्राला शुभेच्छा दिल्या. बीजभाषणा प्रसंगी प्रा. डॉ. सदाशिव दंदे म्हणाले की, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी व सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय असे कार्य केले आहे. खऱ्या अर्थाने बहुजन समाजाचे ते उध्दारक होते. त्यांनी अस्पृश्य निर्मूलनाचे कार्य तर केलेच केले त्याच बरोबर बालहत्या प्रतिबंधक, विधवा पुनर्विवाह यासारखे कार्य सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून केले. त्यांनी बहुजन समाज आणि स्त्रियांच्या शिक्षणाचे क्रांतिकारी कार्य केले आहे असेही ते म्हणाले.
या चर्चासत्राच्या दुसऱ्या सत्रात निबंध वाचन पार पडले.या सत्राच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या इतिहास अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा.डॉ. रामभाऊ मुटकुळे हे होते. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात औरंगाबाद येथून प्रा. डॉ. सुनीता सावरकर, सांगली येथून प्रा. सुरेश दांडगे तर पुणे येथून प्रा. डॉ. गणेश भामे यांनी शोधनिबंधाचे वाचन केले. या सत्राचा अध्यक्षीय समारोप प्रा. डॉ. रामभाऊ मुटकुळे यांनी केला. या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या अध्यक्षीय समारोपा प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील म्हणाले की, आशिया खंडातील पहिले शिक्षण तज्ज्ञ, समाज सुधारक क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांनी अस्पृश्य सामाजाच्या आणि स्त्रियांच्या शिक्षणाचा पुरस्कार केला. त्याचबरोबर त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह चालविले, विधवा पुनर्विवाह, केशवपन प्रथा बंद करण्याचे कार्य कार्य करून त्यांनी सावकारशाही च्या विरोधामध्ये आंदोलन करून शेतकऱ्यांच्या कल्याणाचे कार्य देखील त्यांनी केले. महात्मा फुले हे प्रखर विचारवंत लेखक, संपादक व समाजसुधारक होते. त्यांना सावित्रीबाई फुले यांनी खंबीरपणे साथ देऊन स्त्री शिक्षण आणि समाजसुधारणेचे कार्य केले व त्या उत्तम साहित्यकार ही होत्या, असेही ते म्हणाले.
यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत आभासी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ‘भारतीय स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा फुले व सावित्रीबाई फुले ‘ या शोध निबंध ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. या चर्चासत्राचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय इतिहास विभाग प्रमुख तथा आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे संयोजक डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले तर सूत्रसंचालन मराठी विभागाचे जेष्ठ प्रा. डॉ. अनिल मुंढे यांनी व आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी मानले यावेळी देश-विदेशातून बहुसंख्येने अभ्यासक, प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते.