मुलींना दिलेल्या मेंदी प्रशिक्षणामुळे मुलींचे चांगले सक्षमीकरण होऊ शकेल – सौंदर्य तज्ञ अंजली वांगे
लातूर (प्रतिनिधी) : दयानंद कला महाविद्यालयाच्या महिला तक्रार निवारण समिती तर्फे आयोजित ‘बेसिक ते ब्रायडल ‘ या मेहंदी कार्यशाळेचा समारोप सौंदर्य तज्ञ अंजली वांगे यांच्या हस्ते करण्यात आला. या समारोप प्रसंगी दयानंद शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळाचे सन्माननीय सदस्य सागर मंत्री यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना श्री सागर मंत्री यांनी महिला तक्रार निवारण समिती आणि मेहंदी प्रशिक्षक प्रिया कदम यांचे कौतुक केले. महिला तक्रार निवारण समितीने विद्यार्थिनी सक्षमीकरणाचे अत्यंत चांगले उदाहरण घालून दिले आहे असे सांगून त्यांनी दयानंद कला महाविद्यालय हे संस्थेच्या विचारांना पुढे घेऊन जाण्याचे कार्य उत्तम करत असल्याचे मत मांडले. कोणत्याही चांगल्या कामासाठी दयानंद शिक्षण संस्था ही आपल्या मागे उभी असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. अंजली वांगे यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थिनींना प्रयत्न आणि चिकाटी कोणत्याही कलेचे आवश्यक अंग असल्याचे सांगून या मेहंदी प्रशिक्षणाच्या माध्यमातून मुली खूप चांगल्या पद्धतीने सक्षम होउ शकतात असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला तक्रार निवारण समिती अध्यक्ष डॉ.अंजली जोशी यांनी मांडताना हे प्रशिक्षण मुलींना देण्यामागचे प्रयोजन स्पष्ट केले. कला महाविद्यालयाच्या बहुतांश मुली या करियर कडे फारसे लक्ष देत नाहीत. त्यांच्याकडे आर्थिक स्वावलंबनासाठीची कोणतीही डिग्री नसते. अशावेळी मेहंदी सारखे कौशल्य त्यांना शिकवल्यास त्या स्वतः आर्थिक सक्षम होऊ शकतात. नववधू ची मेहंदी काढण्याच्या ऑर्डर्स घेण्या साठी ही या मुलींना मार्गदर्शन केले गेले. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड यांनी मुलींना मेहंदी प्रशिक्षणाचा फायदा सरकारी नोकरीपेक्षा अधिक असल्याचे सांगून स्वबळावर उभे राहण्याची मानसिकता आणि आत्मविश्वास या प्रशिक्षणातून दिला गेला असे मत व्यक्त केले. याप्रसंगी सहभागी मुलींनी आपले अनुभव सांगताना आत्मविश्वास आणि जगण्याचे साधन प्राप्त झाल्याचे मत मांडले. एक महिन्याच्या या कार्यशाळेसाठी 39 मुलींनी सहभाग नोंदवला होता. त्यांना प्रिया कदम या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीने मेहंदी प्रशिक्षण दिले. या प्रसंगी एक मेहंदी स्पर्धा घेण्यात आली. त्यातून मुलींना बक्षिसे व सहभाग प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुवर्णा लवंद यांनी केले. तर आभार प्रा.दुर्गा शर्मा यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रा.अंजली बनसोडे तसेच अश्विनी सुरवसे,नवनाथ भालेराव,विकास खोगरें यांनी परिश्रम घेतले.