डेंगू दिनाच्या निमित्ताने काळजी घ्या – डॉ शरद कुमार तेलगाणे
उदगीर (एल .पी. उगिले ) : राष्ट्रीय डेंगू दिनाच्या निमित्ताने सर्व नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे तथा दक्षता बाळगणे गरजेचे झाले आहे. असे विचार उदगीर येथील सुप्रसिद्ध महिला रोग तज्ञ डॉ. शरदकुमार तेलगाणे यांनी व्यक्त केले आहेत.
केंद्र शासनाने गेल्या वर्षीपासून 16 मे 2022 हा दिवस राज्यात सर्वत्र डेंगू दिवस म्हणून साजरा करण्याविषयी आदेश दिले आहेत. डेंगू ताप विशिष्ट विषाणूमुळे होत असतो. डेंग्यूचा प्रसार हा एडीस इजिप्टॉय नावाच्या डासामुळे होतो. सदरील डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. कोणतेही पाणी आठ दिवसापेक्षा जास्त काळ साठवून ठेवल्यास, त्यामध्ये डास अंडी घालून त्यांचे रूपांतर प्रोढ डासा मध्ये होते. त्या अनुषंगाने कोणतेही साठवलेले पाणी आठ दिवसांपेक्षा जास्त काळ साठवून ठेवू नये, ही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. असे विचार डॉक्टर शरदकुमार तेलगाने यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, सध्या उन्हाळा सुरू आहे. जिल्ह्यात बऱ्याच गावांमध्ये पाण्याचा तुटवडा असल्याने पाणीपुरवठा पुरेशा प्रमाणात न झाल्याने, लोकांची पाणी साठवून ठेवण्याची प्रवृत्ती आढळून येत आहे. लोकांची ही भूमिका योग्य असली तरीही आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे गरजेचे आहे. कारण या साठवलेल्या पाण्यामध्ये डास अंडी घालून डान्स उत्पत्ती करत आहेत. सदरहू डासांची उत्पत्ती कमी करणे किंवा नियंत्रण ठेवणे यासाठी लोकांना आरोग्य शिक्षण देणे गरजेचे आहे. लोकसहभागाशिवाय या आजारावरचे नियंत्रण शक्य नाही. लोकांनी स्वतःहून काळजी घ्यावी. तसेच इतरांनाही या अनुषंगाने माहिती सांगावी, असे विचार डॉक्टर तेलगाणे यांनी सांगितले.
राष्ट्रीय डेंगू दिन 16 मे 2022 रोजी साजरा केला जातो आहे. यामागील प्रती वर्षाप्रमाणेच डेंग्यू विषयी जनतेमध्ये जागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाय योजनांच्या अंमलबजावणीसाठी जनतेचा सक्रीय सहभाग प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने विशेष उपक्रमाद्वारे नागरिकापर्यंत माहिती पोहोचवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी जनतेने सहकार्य करावे. गेल्या तीन वर्षात लातूर जिल्ह्यातील डेंगू आजाराचे परिस्थिती गंभीरच म्हणावी लागेल, 2019 मध्ये संशयित 132 पैकी दूषित 39 तर 13 मे 2022 पर्यंत संशयित 12 पैकी एक रुग्ण दूषित आढळून आला आहे .त्यामुळे जनतेने राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कीटकांमार्फत विशेषतः डासांमार्फत प्रसार होणाऱ्या हिवताप, डेंगू, चिकनगुनिया, हत्तीरोग, जे. ई. अशा रोगाच्या नियंत्रणासाठी नियमित कार्य आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. त्याला जनतेने सहकार्य करावे .जेणेकरून या रोगावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवणे शक्य होईल.
रोग प्रसारक डास व त्याची उत्पत्ती डासाच्या जीवन चक्रा मध्ये चार अवस्था असतात. ज्यामध्ये प्राधान्याने अंडी, अळी, कोष आणि प्रौढ डास अशी अवस्था असते. यापैकी तीन अवस्था या पाण्यातील आहेत. पाण्यातील अवस्था नष्ट केल्यास डासाची उत्पत्ती रोखणे शक्य होईल. अंडी पासून डास तयार होण्यासाठी सर्वसाधारणपणे आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागतो. डेंगू व चिकनगुनिया या रोगाचा प्रसार करणाऱ्या एडीस इजिप्टॉय या डासाची उत्पत्ती प्रामुख्याने आठ दिवसांपेक्षा जास्त काळ साठवलेल्या स्वच्छ पाण्याच्या साठ्यामध्ये होते.
उदाहरणार्थ रांजण, रिकामी टायर, नारळाच्या करवंट्या, कुलर मधील पाणी, भंगार सामान, घर व घराच्या परिसरातील सर्व पाणी साठे यामध्ये या डासांची उत्पत्ती होत असते. यासाठी उपाययोजना म्हणून किटकजन्य रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी जनते मार्फत आठवड्यातून एक दिवस पाण्याचे सर्व साठे रिकामे करून घासून पुसून स्वच्छ कोरडे करून पुन्हा वापरावीत. पाणीसाठे घट्ट झाकून ठेवावीत. डबकी व पाण्याच्या टाक्या यामध्ये डास, अळी भक्षक गप्पी मासे सोडावेत. पाणी वाहते करणे,
खडये बुजवणे डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे, साठलेल्या डबक्यात, नाल्यात तेल व वांगण टाकावे. झोपताना अगरबत्ती व मच्छरदाणीचा वापर करावा. अंगभर कपडे घालावेत. आवश्यकतेनुसार आबॅटींग करावी, धूर फवारणी करावी. अशी काळजी घेणे गरजेचे आहे. आरोग्य विभागाच्या मार्फत जिल्ह्यात घरोघरी शास्त्रीय सर्वेक्षण करण्यात येत आहे. गरजेनुसार आबॅटिंग करण्यात येत आहे.
ताप आल्यास तसेच उपरोक्त रोग लक्षणे आढळून आल्यास तात्काळ रक्ताची तपासणी करून घ्यावी. जिल्हा रूग्णालयाच्या स्तरावर डेंग्यूच्या निदानाची मोफत सोय उपलब्ध आहे. जेणेकरून दवाखान्यात जाऊन आवश्यक उपचार घेता येतो. तसेच जर ते शक्य नसेल तर आपल्या फॅमिली डॉक्टरला भेटून तात्काळ या संदर्भात माहिती कळवावी असे आवाहन प्रबोधनकार, कीर्तनकार तथा तज्ञ डॉ.शारडकुमार तेलगाने यांनी केले आहे.