राजपाल बिराजदार इतर तरुणांसाठी आदर्श – प्रा.डॉ.भिकाने
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यातील नेकनाळ येथील रहिवासी, राजपाल बिराजदार हे तरुण तसे कोरडवाहू शेतीवर अवलंबून होते. मात्र कोरडवाहू शेतीत उत्पन्न मिळत नसल्यामुळे 2016साली त्यांनी एक म्हैस विकत घेऊन शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केला. त्यांना हा व्यवसाय व्यवस्थित करण्यासाठी व विकसित करण्यासाठी उदगीरच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयातून डॉक्टर प्रफुल्ल पाटील आणि सहकाऱ्यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. त्याच धर्तीवर मोठ्या जिद्दीने आणि चिकाटीने दुग्ध व्यवसाय करायचा निर्धार राजपाल बिराजदार यांनी घेतला, आणि त्यातूनच मग त्यांनी आपल्या कोरडवाहू शेतीमध्येच 40# 100 फूट आकाराचा बंदिस्त गोठा व गाई साठी 65# 75 फूट आकाराचा मुक्त संचार गोठा बनवला. त्यांच्याकडे उत्कृष्ट अशा 14 गाई व सोळा म्हैस असून रोज जवळपास 200 लिटर दूध निघते. त्यांच्याकडे वाळलेला चारा साठवण्यासाठी पावन बाय पन्नास फुटाचे पत्र्याचे शेड आहे.
धारवाड नेपियर सारखी चारा पीक ते घेतात, मुराघासही बनवतात. दूध काढण्यासाठी मिल्किंग मशीन आहे. चारा कुट्टी मशीन चा वापर करून हिरवा व वाळलेला चारा कुट्टी करून मिसळून एकत्र जनावरांना देतात. ते गोठ्यातील मलमूत्र एका खड्ड्यात संकलित करून शेतीसाठी वापरतात.
त्याच बरोबर बायोगॅस निर्मिती ही करतात. त्यांनी पाच लाख रुपये खर्च करून चाळीस बाय चाळीस फूट आकाराचा गांडूळ खत निर्मिती प्रकल्प उभा केला आहे. शेण व कचरा, वाया गेलेला चारा याचा वापर करून ते गांडूळ खत तयार करतात. त्यांनी गेल्या सहा महिन्यात बारा रुपये किलो दराने बारा टन 90 हजाराचे गांडूळ खत विक्री केले आहे. दरवर्षी साधारणतः दीड ते दोन लाख रुपयांचे 60 ते 70 ट्रॉली शेणखत विकतात.
एकंदरीत दुग्ध व्यवसायातून मजूर, खाद्य, औषधी व सर्वावरील खर्च वजा जाता एक लाख रुपये राहतात. अमोलचे दूध संकलन केंद्रही ते चालवतात. पशुखाद्य विक्री पण करतात.
दूध व्यवसायातील उत्पन्नातून एका भावाचे शिक्षण, दुसऱ्याचा व्यवसाय उभारण्यास मदत करून चांगले घर बांधले आहे. व स्वतःसाठी कार घेतली आहे. नव्या पिढीसमोर आपला एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. सुशिक्षित बेकार, बेरोजगार तरुणांनी राजपाल बिराजदार यांचा आदर्श घ्यावा. असे आवाहन प्राध्यापक डॉक्टर भीकाने यांनी केले आहे.