छत्रपती शिवराय आजच्या तरूणाईला कळतील का – प्रा.मारोती बुद्रुक पाटील
निश्चयाचा महामेरू
बहुत जनांसी आधारू
अखंड स्थितीचा निर्धारु
श्रीमंत योगी…
यशवंत,कीर्तिवंत,
सामर्थ्यवंत,वरदवंत
पुण्यवंत,नीतिवंत
‘जाणता राजा’
महाराष्ट्राचे आराध्यदैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८० व्या जयंतीनिमित्त हा लेखनप्रपंच !
छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आजच्या तरुणांना कितपत समजला हे आवर्जून समजावून घेण्यासारखे आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची तोडमोड केली जात आहे. महाराष्ट्रात अनेक संघटनांनी आपापल्या परीने शिवचरित्र जगा समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कोणी 19 फेब्रुवारी 1630 तर कोणी 8 एप्रिल 1627 तर कोणी तिथीप्रमाणे जयंती साजरी करावी. यासारखे वाद घातले जातात. यातून नेमका कोणता संदेश आणि कोणत्या इतिहासकारांचा इतिहास आजच्या तरुणांसमोर दिला जातोय?
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे खरे खुरे रयतेचे राजे होते. राजकीय पक्ष मात्र आपल्या सत्तेसाठी त्यांचा उपयोग करताना दिसत आहेत. तारीख, तिथीचा वाद महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात घुमतो आहे, दुर्दैव या मातीच आज त्यांच्याच मातीत, त्यांच्याच स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराज हा एक राजकीय पोळी भाजण्यासाठी उपयोगी पडणारे समीकरण ठरले आहेत. शिवरायांच्या नावाने मतपटीत मतांची भीक मागत फिरकत आहेत.
मावळ्यानो छ. शिवाजी महाराज हे राजकीय लढवय्ये नक्कीच होते. परंतु, विशिष्ट एखाद्या पक्षांसाठी मर्यादित नव्हते. छ.शिवाजी महाराज हे एखाद्या विशिष्ट जाती धर्मासाठी संघर्ष करणारे राजेे नव्हते.
आपल्याच महाराष्ट्रात जन्म घेतलेल्या महापुरुषांच्या जन्मतारखेवरून वाद पेटवला जातो, जाती धर्मात शिवरायांना गुंतवून ठेवतो, ही लाजिरवाणी बाब आहे.
छ.शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आजच्या तरुणांनी आत्मसात करणे काळाची गरज आहे. शिवरायांची नीती, जिजाऊंचे संस्कार व शिवरायांचा संघर्ष या सर्व बाबी बारकाईने समजावून शिवशाही अमलात आणणे काळाची गरज आहे. शिवाजी महाराजांच संघर्ष हा कुठल्या जात व धर्म संघर्ष नव्हता तर शिवाजी महाराजांचा संघर्ष हा रयतेच्या राज्यासाठी संघर्ष होता.
आजचा तरुण पूर्वीपासून फक्त नावीन्य स्वीकारत आलेत. परंतु, नावीन्य शोधण्याचा प्रयत्न मात्र केलेला दिसत नाही, धार्मिक गोष्टीत शिवरायांना गुरफटून, राजेंना एखाद्या विशिष्ट जातीच्या, धर्माच्या चौकटीत गुंतवणूक ठेवण्यासाठी ती कोणाच्या घरची मक्तेदारी नव्हे, शिवराय अठरापगड जातीचे, सर्व धर्माचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या स्वराज्यात जाती धर्माला थारा नव्हता, तर मग आपण त्यांना जातीच्या राजकारणात का बांधून ठेवतो? तर मग या मावळ्यांना शिवराय समजले तरी कसे, हा गंभीर प्रश्न आहे.
जगात शिवनीतीचा वापर करून अनेक योद्धे लढाया जिंकल्याची उदाहरणे आहेत, अमेरिकेचे माझी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणतात, जर शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले असते, तर आम्ही त्यांना सूर्य संबोधले असते. या महाराष्ट्रात शिवरायांचा गौरवशाली इतिहास पुसण्याच्या प्रयत्न सुरू आहे.
इंग्रजांनी भारतावर 150 वर्षे राज्य केले. परंतु, जाता जाता इंग्रज गव्हर्नर म्हणतात, छ.शिवाजी महाराज जर अजून 10 वर्षे जगले असते, तर इंग्रजांना हिंदुस्थानचा चेहरा पाहता आला नसता. असे रयतेचे राजे होते छत्रपती शिवराय!
शिवरायाने स्वराज्यातल्या प्रत्येक मावळ्यांना मराठा हे नाव दिले होते. मराठा ही कोणती जात नव्हती, तो कोणता धर्म नव्हता, जो या महाराष्ट्रात राहतो, जो या स्वराज्यात राहतो तो मराठा, आपल्या राष्ट्रगीतातही उल्लेख आलाच आहे, या मराठा नावाचा, पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, मग यातील मराठा हा जातीचा किंवा धर्माचा नसून महाराष्ट्राला संबोधित केलेला मराठा आहे, आजच्या युवा वर्गानी वरील गोष्टीचा चिंतन करावे. केवळ दाढी मिशी वाढवून कपाळी चंद्रकोर लावून कोणी शिवाजी होत नसते, तर त्यासाठी जिजाऊंचे संस्कार पाहिजेत. जर तस झालंच असतं तर आज या महाराष्ट्रात महिला वर्ग सुरक्षित राहिला असता.
गोंदियामधील जातपंचायतीत विधवा महिलेस जाळून मारलेच नसते. हे सर्व का घडत आहेत? आबालवृद्ध आज या महाराष्ट्रात स्वतंत्रपणे वावरू शकत नाहीत, या सर्व गोष्टींना एकमेव कारण आहे तो म्हणजे आम्ही आमचा इतिहास विसरत चाललो आहोत.
डॉ.बाबासाहेबांनी म्हटले आहे, जो समाज स्वतःचा इतिहास विसरतो, तो कधी इतिहास निर्माण करू शकत नाहीत, अगदी तेच झाले. आम्ही आमचा इतिहास विसरलो आणि मनुवाद्यांकडे आमचे डोके गुलाम ठेवले. म्हणून तर महाराष्ट्रात स्त्री स्वातंत्र्याचा मुद्दा वेळोवेळी चव्हाट्यावर येत आहे. शिवरायांच्या स्वराज्यात शत्रूंची महिलादेखील सुरक्षित घरी परतत होती.
शिवचारित्र्यात सुभेदारच्या सुनेचा उल्लेख आहे. शत्रूच्या सुनेलादेखील ममतेने आपल्या मातेसमान दर्जा देऊन, सांस्कृतिकदृष्ट्या अथितीचे साडीचोळीने सन्मान करून सुखरूप घरी पोहोचवणारा माणुसकीचा, मानवतेचा जगाच्या पाटीवर असा एकमेव राजा झाला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
शिवरायांचे कार्य समस्त देशाला प्रेरणा देणारे आहे.परंतु खरच हिंदुस्तानातील लोकांनी विशेषता तरुणानी महाराजांकडून प्रेरणा घेतली का ?
ज्या शिवाजी महाराजांनी मुठभर तरुणांना हाताशी घेऊन इस्लामी राजवट नेस्तनाबूत केली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ती कोणत्या बळावर याचा विचार केला पाहिजे.हाताशी अपुरे संख्याबळ,अपुरी शस्त्रसामुग्री ,अपुरा पैसा असताना बलाढ्य असणार्या मुघलांचा मुकाबला केला.आपला गनिमी कावा,कल्पक डावपेच,निर्भयता याच बरोबर हिंदू धर्माचे बळ आणि तेज मोघालाना दाखवले.
हे बळ त्यांना कुलदैवत आई जगदंब तुळजाभवानी यांच्या कृपेने आणि माता जिजाऊ यांच्या आशीर्वादाने आले होते.कुलदेवतेची उपासना आणि आईचे मार्गदर्शन हि एक मोठी शक्ती आहे हे महाराजांनी जाणले होते परंतु आपण हे आता विसरलो आहोत.
आजच्या तरुणांसमोर योग्य मार्गदर्शन नसल्याने तरुण पिढी वैयक्तिक स्वार्थात गुंतलेली दिसत आहे.करियर च्या नावाखाली झटपट पैसा मिळवणे आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमात सध्याची तरुण पिढी रममाण आहे. आपल्या राष्ट्रात घडत असलेल्या गैरकृत्याविरुद्ध विचार व कृती करण्याची तसदी घेणारे तरुण सध्या दुर्मिळ झाले आहेत.
तसेच सध्याच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात आत्मबळाचा अभाव प्रखरतेने जाणवत आहे त्यामुळे तरुण आत्महत्यासारख्या दृष्टचक्रात ओढले जात आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील तरुणासारखा राष्ट्राभिमान आणि धर्मभिमान सध्याच्या तरुणात दिसत नाही.कारण आजची निधर्मी बोलली जाणारी शिक्षणपद्धती आणि पाश्च्यात्य संस्कृतीचा वाढता प्रभाव यामुळे नवीन पिढी बुद्धीने हुशार;परंतु मानाने दुबळी व स्वार्थी बनली आहे.
देशातील तरुणानी आपली मानसिकता आणि कृतीत अमुलाग्र बदल घडवून आणायची गरज आहे.शिवाजी महाराज,स्वातंत्र्यवीर सावरकर,स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या राष्ट्रपुरशांचे आदर्श तरुणांसमोर हवेत.परंतु आजच्या तरुण पिधेचे आदर्श हे अभिनेते,खेळाडू यांच्यापर्यंत सीमित झाले आहेत. हे आदर्श योग्य आहेत का ?
हे चुकीचे आदर्श आपल्याला शेजारील शत्रूराष्ट्राशी,अतिरेक्यांशी लढण्याचे बळ देणार आहेत का ? अशा चुकीच्या आदर्शामुळे जम्मू काश्मीर चा भाग गिळंकृत करणारा देशात स्पोट घडवणारा पाकिस्तान,पूर्व भारताकडे वक्रदृष्टीने पाहणारा चीन आणि घुसखोरी करणारा बांगलादेश यांच्यापासून सध्याचे तरुण अनभिज्ञ राहत आहेत.
त्यामुळे तरुणांना योग्य आदर्श दाखवण्याची जबाबदारी पालकांचीही आहे.
तरुणांनी आपल्यातील सुप्त सामर्थ्य जाणण्याची गरज आहे तसे केल्यानेच शिवाजी महाराज बालवयात बलाढ्य शत्रूचे आव्हान पेलू शकले. माता जिजाऊ यांनी त्यांच्यासमोर भगवान श्रीकृष्ण,प्रभू श्रीराम यांच्यासारखे आदर्श ठेवले होते आणि धर्मनिष्ठेचे बाळकडू पाजले होते.आजच्या तरुणांनीही आपले शिवतेज जागृत केले पाहिजे आपले आध्यात्मिक बळ वाढीवले पाहिजे. आपल्या सण-उत्सवाचे पावित्र्य थाळू न देता सह्स्त्रानुसार साजरे करायला हवेत.आपल्यातील मानसिक दुर्बलता कमी करून राष्ट्राचे नेतृत्व तरुणांनी करण्याची गरज आहे.
आजच्या तरुणांमध्ये राष्ट्र घडवण्याचे व चालवण्याची क्षमता आहे.पण इच्छाशक्तीचा अभाव आणि सातत्याने चुकीचे आदर्श यामुळे तरुण आपले सुप्त सामर्थ्य हरवून बसले आहेत.
प्रा.मारोती बुद्रुक पाटील.
संस्थापक अध्यक्ष जगद्गुरू तुकोबाराय प्रबोधन प्रतिष्ठान
