शिक्षक व शिक्षण महर्षी/ कर्मयोगी निश्चयाचा महामेरू/ कर्मयोगी दीपस्तंभ डी.बी.लोहारे गुरुजी

शिक्षक व शिक्षण महर्षी/ कर्मयोगी निश्चयाचा महामेरू/ कर्मयोगी दीपस्तंभ डी.बी.लोहारे गुरुजी

कपिल बिरादार

“शिक्षण महर्षी, दलित मित्र, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक, शिस्तप्रिय प्रशासक, उत्तम शेतकरी, आदर्श संस्थाचालक असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले अहमदपूर पॅटर्नचे जनक डी.बी. लोहारे गुरुजी यांचा आज 87 वा वाढदिवस”. डी.बी.लोहारे गुरुजी यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1934 साली अमदपुर तालुक्यातील मुळकी उमरगा या गावी झाला. अगदी लहानपणीच वडिलांचे छत्र हरवले, ग्रामीण भागात शिक्षणाची काहीच सोय नव्हती. आई स्वतः निरक्षर पण, आपल्या मुलानी खूप शिकावं ही प्रचंड इच्छाशक्ती होती म्हणून पाचवी च्या पुढील शिक्षणासाठी अंधोरी, अहमदपुर, अंबाजोगाई,नांदेड या ठिकाणी पाहुण्यांच्या मदतीने वसतिगृहात राहून शिक्षण पूर्ण केले. विद्यार्थी जीवनातच स्वातंत्र सेनानी गोविंद भाई श्राफ, स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे यांची भाषणे ऐकून त्यांच्या विचाराचा प्रभाव गुरुजीवर पडला, आपण शिकलो पण आपल्या गावातील, परिसरातील मुलांना शिक्षणाची सोय नाही ही व्यथा मनाला खात होती. याच प्रेरणेतून नांदेड येथे नोकरीला असतानाच वयाच्या 28 व्या वर्षी स्वामी रामानंद तीर्थ यांना विनंती करून 1962 साली आपल्या मूळ गावी मुळकी उमरगा येथे पहिली शाळा काढून ज्ञानगंगेचे तोरण बांधले. पुढे अध्यात्मिक गुरु राष्ट्रसंत वसुंधरा रत्न डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज, माजी आमदार कै. महालिंगाप्पा सांगवीकर,कै. शिवराज आप्पा चवंडा, डॉ. मनोहरराव रेड्डी, अँड.कृष्णराव देशमुख यांच्या सहकार्याने कुमठा, रोकडा सावरगाव, अहमदपूर, धनेगाव, कबन सांगवी, धामणगाव,येस्तार, मुरढव अशा ग्रामीण भागात शाळा व सोबतच विद्यार्थ्यांना निवास व उत्तम भोजनाची व्यवस्था व्हावी यासाठी वस्तीगगृह काढून शेतकरी, शेतमजुरांच्या मुलांना मोफत शिक्षणाची दारे खुली केली.
चांगल्या विचारांचे, चांगल्या व्यक्तीचे व चांगल्या वातावरणाचे सानिध्य मिळाले की जीवनात स्वतःहून काहीतरी प्रचंड ओढ, त्यासाठीची प्रबळ इच्छाशक्ती, स्वतःमधील आत्मविश्वास दाखवण्याचा जोश व नकारात्मक भाव संपवून सकारात्मक विचार करण्याची जिद्द लहानपणापासूनच गुरुजींच्या मध्ये होती. यामुळे मनात कुठलाही न्यनगंड न बाळगता सामर्थ्यानिशी, न थांबता न थकता कार्य करण्याची सवय याच काळात लागली.
थोर तपस्वी, त्यागी राष्ट्रसंत परमपूज्य डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे प्रबळ असे अध्यात्मिक अधिष्ठान संस्थेला लाभले. ईश्वरावर अठळ श्रद्धा ठेवून, मानवता धर्माची पूजा केली. आपल्याजवळ असेल ते दुसऱ्याला द्यावे दुसऱ्यांचे अश्रू थांबवावे त्याला हसवावे, सुखवावे हे साधे तत्वज्ञान स्वीकार करून गुरुजींनी कार्य केले. याच कार्यकर्तत्वातुन अहमदपूर पॅटर्न निर्माण झाला.
गुरुजीनी शाळेतील वस्तीगृहातील विद्यार्थ्यासाठी व संपूर्ण संस्थेतील शिक्षकासाठी योगासने, योगा शिबिर, खादी गणवेश, संस्काराचे शिक्षण, सूचना पेटी, आदर्श पाठ, संस्था अंतर्गत तपासणी, माता-पिता आधार योजना, मान्यवरांच्या भेटी, मुल्यशिक्षणाची धडे, व्यसनमुक्ती कार्यक्रम, असे अनेक उपक्रम स्वतः शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक म्हणून राबवले. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव गुरुजींच्या विचारातून व कार्य पद्धतीतून दिसून येतो. “आधी केले मग सांगितले” या उक्तीप्रमाणे गेली 65 वर्षापासून स्वतः खादी वापरतात व सर्वांना खादी वापरण्यास सांगतात. गांधीजींच्या खेड्याकडे चला या संदेशात प्रमाणे गुरुजींचे लक्ष नेहमी खेड्यातील शाळा व विद्यार्थी यांच्याकडे असते.
संस्था ही कुटुंब समजून कुटुंब प्रमुखाची जबाबदारी गुरुजी पार पाडत आहेत प्रत्येक कर्मचारी हा माझ्या कुटुंबाचा अंश आहे. असे समजून सर्वासाठी समानतेची वागणूक ते देत असतात. गुरुजींच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत ,- 1989 राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार- 1995 राज्य शासनाचा दलित मित्र पुरस्कार- 2002 टागोर शिक्षण संस्थेला आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार- 2012 एम.आय. टी. चा शिक्षण रत्न पुरस्कार- 2015 जन्मगावी मुळकी भूषण पुरस्कार- 2018 साली वसंतराव काळे प्रतिष्ठानचा जीवन गौरव पुरस्कार.. राष्ट्रभाषा सभा पुणे, भारत स्काऊट गाईड, खादी ग्रामोद्योग मंडळ नांदेड, मराठवाडा जनता विकास परिषद, सिद्धेश्वर सहकारी बँक, लातूर रोटरी क्लब अहमदपूर या कमिटी वर कार्यरत आहेत. साप्ताहिक सेवाभाव चे संपादक म्हणून काम पाहिलेले आहेत तर अहमदपूर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व जिल्हा पत्रकार संघाचे पाच वर्षे सदस्य म्हणून राहिले आहेत
गुरुजींनी आपल्या आयुष्यात नेहमी मानवतावादाची भूमिका चोख बजावली आहे जगत कल्याणाची प्रार्थना करत जयजगत् हा भाव मनात जोपासला आहे. संताचा विचार व सत्तसंघामुळे माणसाचे आयुष्य फुलत जाते. त्याप्रमाणे महान विभूती च्या सानिध्यात लोहारे गुरुजींचे पर्यायाने संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांचे आयुष्य फुलत जात आहे.
गुरुजींच्या अर्धांगिनी सौ. पुष्पाताई या मितभाषी असून गुरुजींना त्यांची खंबीर साथ आहे. सरांच्या प्रत्येक शैक्षणिक व सामाजिक कार्याला त्यांची खंबीर साथ आहे. गुरुजींच्या प्रकृतीची काळजी घेणे, त्यांचा आहार, दिनचर्या यांची काळजी घेणे व शैक्षणिक कार्यात कुठलीच तक्रार न करता गुरुजींच्या खांद्याला खांदा लावून साथ देणे हीसुद्धा गुरुजींच्या जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग आहे.
आज गुरुजींच्या 87 व्या वाढदिवसानिमित्त गुरुजींना उदंड व निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

About The Author

error: Content is protected !!