मानवतेचे उपासक : प्रा. शाम आगळे सर

मानवतेचे उपासक : प्रा. शाम आगळे सर

०५ सप्टेंबर २०२२ रोजी माझे गुरू कै.शाम आगळे सरांचा द्वितीय पुण्यस्मरण दिन.त्या निमीत्त त्यांना वाहीलेली ही शब्दपुष्पांजली

 मानव हा या पृथ्वीवर सर्वश्रेष्ठ मानला गेला आहे. मानव व पशुकडे चार गोष्टी समान असल्याचे सांगितले जाते. आहार, निद्रा,भय आणी मैथुन ह्या त्या होत पण माणूस पशूपेक्षा यासाठी वेगळा आहे की त्याच्याकडे इतरांसाठी अतीव संवेदना आहेत, श्रद्धा आहे,परोपकाराची भावना आहे. ही भावना घेऊन जगणारी माणसे खरी माणसे असतात अन्यथा वरवर माणसाचे शरीर धारण करणारी सगळी माणसे माणसे असतीलच असे नाही.म्हणून तर साहित्यिकांना म्हणावे लागले की 'गर्दीत माणसांच्या l माणूस शोधतो मी' किंवा ' हरवला रे हरवला lमाणसातला माणुस हरवला ll'  माणसातले माणूसपण हरवणे हा त्या माणसाचा एका अर्थाने पराभवच आहे पण समाजात बरीचशी असी ही माणसे अनुभवायला मिळतात.ज्यात माणूसपण  भरून उरलेले असते व ते मानवतेचे उपासक असतात.असेच मानवतेचे उपासक म्हणजे माझे परमश्रध्देय गुरुवर्य प्रा.श्याम आगळे सर होत.
 सरांचा जन्म २४ जून १९४५ रोजी अकोला ता.आंबेजोगाई जि.बीड येथे झाला.अनेक अडचणींना तोंड देत देत त्यांनी एम.ए.(हिंदी)बी.एड.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.सुरूवातीस २८जून १९७१ ते १९७६ या कालावधीत ज्ञानेश्वर विद्यालय,लातूर येथे सहशिक्षक म्हणून कार्य केले.त्यानंतर १९७६ ते सप्टेंबर १९७८ या कालावधीत मास्टर दिनानाथ मंगेशकर महाविद्यालय,औराद (शहा).येथे कनिष्ठ महाविद्यालयात हिंदी या विषयाचे प्राध्यापक म्हणून सेवा दिली तर  २८ सप्टेंबर १९७८ ते  ३०जून २००३ पर्यंत महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर जि.लातूर येथे कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवा केली व याच महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले.
आगळे सर हे केवळ चार भिंतीच्या आत मुले घडविण्यात अडकून पडणारे शिक्षक नव्हते त्यांनी महाविद्यालयात तर माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना घडवले पण त्याबरोबरच महाविद्यालयाच्या बाहेर ही लोक शिक्षक म्हणून खूप मोठे काम केले. अनेक चळवळीत योगदान दिले, सरांवर समाजवादी विचारसरणीच्या राम मनोहर लोहिया यांचा प्रभाव होता.तसेच राष्ट्र सेवा दलाचा  प्रभाव ही पदोपदी त्यांच्यावर असल्याचे जाणवत असे. छात्रभारती, युवक क्रांतीदल,अंधश्रद्धा निर्मूलन,भारत जोडो अभियान,साने गुरुजी कथामाला  यासारख्या सामाजिक चळवळीत ते अग्रभागी असत. सर,साने गुरुजींचा कृतिशील वारसा पुढे चालवण्याचे काम करत होते.श्याम या साने गूरुजीच्या नावाला साजेसे नाव धारण करणा-या आगळे सरांनी गूरुजींप्रमाणेच मातेवर व विद्यार्थ्यांवर जिवापाड प्रेम केले.आपली माता हीच त्यांची आराध्यदेवता होती.त्यांनी तिची आयुष्यभर सेवा केली व आई या विषयाचा जागर महाराष्ट्रभर आपल्या व्याख्यानातून घातला व आईचे महत्व अनेक पिढ्यांच्या मनावरती बिंबविण्याचे काम केले.साने गुरुजी सारखेच सर ही मनाने अत्यंत हळवे होते.परंतु विचारांप्रती खंबीर होते. त्यांच्या मनात गरीब विद्यार्थ्यांविषयी अतीव कणव होती. याचा अनुभव मी स्वतः अनेक वेळेस घेतला आहे. आपला विद्यार्थी शिकावा,सूसंस्कारी बनावा,मोठा व्हावा  यासाठी त्यांची सततची तळमळ असायची.विशेषता गरिबांची मुले शिकावीत,शिकून नोकरीला लागावीत व त्यांच्या आयुष्यातून अज्ञान व दारिद्र्य कायमचे निघून जावे असे त्यांना सतत वाटायचे.सरांची नियूक्ति जरी कनिष्ठ महाविद्यालयात असली तरी विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे व त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे ते वरिष्ठ महाविद्यालयाच्या बऱ्याच तासिका घ्यायचे.ते मला बारावी ते बी.ए.तृतीय पर्यंत शिकवायला होते.सरांचे राहणीमान अत्यंत देखने असायचे.मी जेंव्हा महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर येथून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. तेंव्हा त्यांनी मला पुढे काय करायचे आहे याबद्दल विचारणा केली असता मी एम.ए. हिन्दी करायचे असे म्हटल्याबरोबर त्यांनी लागलीच गुरूवर्य प्रा.डॉ.सूर्यनारायण रणसुभे सरांना पत्र लिहीले व रणसुभे सरांच्या सहकार्यानेच मला दयानंद कला महाविद्यालय लातूर येथे प्रवेश मिळाला व माझ्या आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली.अशा कितीतरी विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देण्याचे काम सरांनी आपल्या आयुष्यात केले.केवळ शिक्षणा पुरतेच नाही तर त्यानंतर नोकरी प्राप्त करेपर्यंत व नोकरी मिळाल्यानंतर  त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते माझी सतत चौकशी करत राहायचे आणि वेळोवेळी मार्गदर्शन करायचे. सर म्हणजे मनाने निर्मळ व वाचेने रसाळ असे व्यक्तिमत्त्व होते.अनेक समविचारी लोकांशी मैत्री करणे व ती मैत्री कसोशीने पाळणे हा त्यांचा गुणधर्म होता. भ्रमंती हा त्यांचा जणू छंदच बनून गेला होता.सतत व्याख्यानाच्या संबंधाने ते भ्रमंती करायचे.  आई,राष्ट्रीय एकात्मता, अंधश्रद्धा निर्मूलन,महापुरुषांची चरित्रे,राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विविध युवक शिबिरातील व्याख्याने व अनेक शाळा व महाविद्यालयातील स्नेहसंम्मेलनतील मार्गदर्शन व प्रासंगिक विषयांवर व्याख्याने ते अत्यंत चिंतनशील व मन ओतून  द्यायचे. त्यांचे आपल्या मातेइतकेच मातृभुमीवर ही नीतांत प्रेम होते.ते नेहमी आंबेजोगाईला येत असत इथल्या विविध चळवळीत ते सक्रिय होते. त्यांचा गौरव ही मातृभूमीने केला. यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समिती आंबेजोगाई कडून त्यांना २००३ साली आदर्श शिक्षक पुरस्कार  देण्यात आला होता.या शहरांमध्ये त्यांचे अनेक मित्र होते. सेवानिवृत्तीनंतर सर्वाधिक काळ ते लातूरला राहत असायचे,इथे ही त्यांनी  विविध चळवळींच्या मध्ये सक्रिय सहभाग नोंदवला.

सूरुवातीपासूनच प्राचार्य डॉ.ना.य. डोळे,बाबा आढाव, यदुनाथ थत्ते,माजी कुलगुरु डॉ.जनार्दन वाघमारे, डॉ.सूर्यनारायण रणसुभे, महावीर जोंधळे, बापूसाहेब काळदाते,माजी आमदार वसंतराव काळे,प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार व अन्य अनेक लोकांशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते.अश्या अनेक विचारवंतांच्या सहवासात ते सतत वावरत असत. कुटुंबवत्सल व्यक्तिमत्व म्हणूनही सरांकडे पाहता येईल.आपले दोन मुले व एक मुलगी जावई, नात, नातु यावरती ते नितांत प्रेम करत असत. मोठ्या सचिन या मुलाला व क्रांती या मुलीला डॉक्टर बनवले तर छोट्या अमर नावाच्या मुलाला शिक्षक बनवले. मृत्यूपुर्वी काही दिवसा अगोदरच आपले ज्येष्ठ चिरंजव डॉ.सचिनचे दुःखद निधन झाल्यामुळे सरांचे मन खूप व्यथित झाले होते.साने गुरुजी कथामाला छोट्या छोट्या गावात रुजविण्याचे काम त्यांनी केले. चारित्र्याला त्यांनी अत्याधिक महत्व देऊन आपले जीवन जगले.हिंदी हा त्यांच्या अध्यापनाचा विषय होता. आपल्या विषयाची सेवाही त्यांनी पाठ्यपुस्तक निर्मिती असो की विविध परिषदांचे आयोजन किंवा सहभाग असो त्यातून केलेली दिसते. मराठवाडा साहित्य परिषदेत ही त्यांनी काम केले.
कुठल्याही चळवळीत काम करणाऱ्या व्यक्तिला तितक्याच ताकदीने घर सांभाळणारी अर्धांगिनी लाभल्याशिवाय चळवळीत पुर्णवेळ काम करणे अशक्य असते.माझ्या गुरुमाता अनुराधाताईंनी घराची पुर्ण जबाबदारी स्विकारल्यामुळेच सरांना हे सर्व काम करणे शक्य झाले.ताईंचा स्वभाव अत्यंत शांत व संयमी आहे.
एक चांगुलपण जपून अध्यापन करणाऱ्या गुरुजींचा किती मोठा प्रभाव विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वावर पडू शकतो याचे उदाहरण म्हणजे माझे गुरु व मी आहे. सरांची विद्यार्थ्यांबद्दलची असलेली तळमळ,विषयाचा असलेला सखोल अभ्यास, शिकवितानाची तळमळ, भाषेवरील प्रभुत्व,तासिका संपल्यावर विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक अडी-अडचणीकडे विशेष लक्ष या गोष्टींमुळे मी आगळे सरांकडे विद्यार्थीदशेतच आकर्षिला गेलो.मुळात माझ्या घरात लहानपणापासूनच वारकरी सांप्रदायाचे वातावरण त्यामुळे रामायण, पांडवप्रताप या ग्रंथांचे व संत साहित्याचे वाचन होत असायचे त्यामुळे मी लहानपणापासूनच संत साहित्याच्या प्रेमात पडलेला म्हणून मी सुरुवातीला मराठी हा विषय निवडला व सोबतीला मित्रांच्या आग्रहामुळे हिंदी हा विषय ही ठेवला होता परंतु काही दिवसात आगळे सरांचे शिकवणे व अन्य गुणवैशिष्ट्य्यांनी इतके आकर्षित केले की पुढे मराठी हा विषय सोडून हिंदी विषयात पूर्ण शिक्षण घ्यायचे हा नीर्णय घेतला व संकल्प केला की आपण ही एक दिवस आगळे सरांसारखे हिंदी या विषयाचेच प्राध्यापक व्हायचे तो विचार पूर्णत्वास नेण्यासाठी अथक प्रयत्न केले आणि या कामी सरांचा आदर्श तर डोळ्यासमोर होताच पण मार्गदर्शन ही वेळोवेळी लाभत गेले आणि झाले तसेच पुढे मी हिंदीचा प्राध्यापक झालो.नंतर एकदा आमच्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात आगळे सरांचे आई या विषयावरील व्याख्यान ऐकले व ऐकताना कित्येकदा डोळे पाणावले व आईची सेवा करायची असा संकल्प तर केलाच पण आपण सरांसारखे आई या विषयावर बोलायचे असा संकल्प केला व सरांचा आशीर्वाद घेतला व या विषयावर बोलायला सुरुवात केली.आज जवळपास महाराष्ट्रभर पाचशेपेक्षा अधिक व्याख्याने या विषयावर दिली आहेत. मी माझ्या भाषणात नेहमी सांगत असे की मी जे काही घडलो आहे तो आगळे सरांच्यामुळेच.आई या विषयाची मांडणी ही सरांमुळेच करायला शिकलो. हे माझे भाषणातले बोलने सरांना दुस-या दिवशी कोण्ही सांगितले की सर मला फोन करायचे,त्यात सूरुवातीला ते सगळ्या परिवाराची खुशाली विचारायचे,काल छान भाषण दिले म्हणे,असेच काम करत राहा, मला तुझा अभिमान वाटतो असे म्हणायचे.अनेकांकडे माझा विषय काढायचे.त्यांना आपल्या विद्यार्थ्यांचा अभिमान वाटायचा.त्यांच्या फोनमुळे मला शंभर हत्तीचे बळ यायचे, वाटायचे आपल्या पाठीमागे गुरूंचा आशीर्वाद आहे. त्यामुळे आपण पुढे चालतच राहायचे. हा संकल्प करून काम करत राहिलो. मागच्या वर्षी जूलैमध्ये सरांना बरे नाही कळाल्यामुळे जाऊन भेटून व बोलून आलो,तब्येत तशी खालावलेलीच होती पण छान बोलणे झाले,सरांचे दर्शन घेतले आणी नीघालो. ०५ सप्टेंबर २०२० हा दिवस जवळ येत होता.गुरुजींना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्याचा विचार मनात होताच पण तेवढ्यात अचानक मन सुन्न करणारी बातमी वाचली.आगळे सर गेले.क्षणभर या गोष्टीवर विश्वासच बसला नाही.साने गुरुजींचा क्रियाशील वारसा चालवणारा माझा गुरु शिक्षक दिनाचे औचित्य साधून हे जग सोडून गेला हे पाहुन एक लक्षात आले की सरांच्या नसानसात शिक्षण किती भिनलेले होते.ज्यामुळे त्यांनी हे जग सोडताना ही हाच दिवस निवडला. विद्यार्थी हे त्यांचे खरे दैवत होते.त्यांनी आयुष्यभर मानवतेची उपासना केली.
त्यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.कधी न भरुन नीघणारी पोकळी निर्माण झाली आहे.असे असले तरीही त्यांनी दिलेले विचार व केलेले कार्य अमलात आणून आपण त्यांना जिवंत ठेवण्याचे काम करूयात या अपेक्षेसह माझ्या शब्दांना पुर्णविराम देतो व सरांना द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त ही शब्दांजली अर्पण करतो.

       प्रा.डॉ.रामकृष्ण बदने

ग्रामीण महाविद्यालय,वसंतनगर,
ता.मुखेड जि.नांदेड.
भ्रमणध्वनी -९४२३४३७२१५

About The Author