महात्मा बसवेश्वरांनी विश्वाच्या कल्याणाचा विचार मांडला – प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे

महात्मा बसवेश्वरांनी विश्वाच्या कल्याणाचा विचार मांडला - प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे

अहमदपूर (गोविंद काळे) : समाजवाद, धर्मनिरपेक्षता, समता, बंधुत्व व न्याय हे लोकशाही पूरक विचार विश्वमानवाच्या कल्याणासाठी महात्मा बसवेश्वरांनी मांडली. तेच विचार आपल्या संविधानाचा महत्त्वाचा गाभा आहे. असे स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ इतिहासकार व माजी प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे यांनी केले.

या बाबतचे सविस्तर वृत्त असे की, ग्लोबल संस्कृत फोरम दिल्ली, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व किसान शिक्षण प्रसारक मंडळ, उदगीर द्वारा संचलित महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूरच्या इतिहास विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘ क्रांतिकारी संत महात्मा बसवेश्वरांचे कार्य ‘ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय अंतरविद्याशाखीय ई – चर्चासत्रा प्रसंगी ते बोलत होते. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील हे होते. तर, किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर व सचिव ज्ञानदेव झोडगे गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटक म्हणून चीन येथील गाँगडाँग विद्यापीठाचे प्रा.डॉ.विवेक मनी त्रिपाठी तर बीजभाषक म्हणून गुलबर्गा विद्यापीठ कर्नाटक येथील प्रा. डॉ. वीराशेट्टी मैलूरकर हे उपस्थित होते व प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ इतिहासकार व माजी प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे यांच्यासह या चर्चासत्राचे संयोजक डॉ. बब्रुवान मोरे, सहसंयोजक डॉ. संतोष पाटील यांची आभासी पद्धतीने पद्धतीने उपस्थिती होती. प्रारंभी किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे सचिव ज्ञानदेव झोडगे गुरूजींनी या चर्चासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पुढे बोलताना माजी प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे म्हणाले की, बुद्धाच्या समतेचा विचार महात्मा बसवेश्वरांनी पुढे चालवला आणि हाच विचार फुले, शाहू, आंबेडकरांनी स्वीकारला. तसेच महात्मा बसवेश्वरांनी स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला आणि जनसामान्यांमध्ये जो अंधविश्वास होता त्या अंध:श्रद्धेचे निर्मूलन करण्याचे कार्य महात्मा बसवेश्वरांनी केली.त्यांनी त्यावेळी समाजाला सांगितले की, सदविचारात आणि सद् आचरणातच परमेश्वर आहे. देहालय हेच देवालय आहे, अशी शिकवण महात्मा बसवेश्वरांनी समाजाला दिली, असेही ते म्हणाले.

या चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी प्रा. डॉ. विवेक मणी त्रिपाठी म्हणाले की, जेव्हा -जेव्हा भारतामध्ये अशांती ,सामाजिक विषमता निर्माण होते, अन्याय अत्याचार वाढतो तेव्हा -तेव्हा असे महान संत जन्म घेतात. त्यापैकीच महत्मा बसवेश्वर एक होते. महात्मा बसवेश्वरांनी मानवतावादी कार्य केले, असेही ते म्हणाले. तसेच बीजभाषणा प्रसंगी प्रा. वीराशेट्टी मैलूरकर यांनी महात्मा फुले यांच्या समग्र जीवन कार्यावर प्रकाश टाकला.

या चर्चासत्रात प्रा.डॉ. सदाशीव दंदे – अध्यक्ष, इतिहास अभ्यास मंडळ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली शोधनिबंध वाचन सत्र घेण्यात आले. या सत्रात डॉ. नलिनी वाघमारे, पुणे, प्रा.डॉ. मंजुश्री डोळे, ठाणे व ज्येष्ठ पत्रकार श्री. राम तत्तापुरे, अहमदपूर यांनी प्रातिनिधिक स्वरूपात शोधनिबंधाचे वाचन केले. तसेच या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या अध्यक्षीय समारोपा प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी बसवेश्वरांचे समतावादी विचार आज ही प्रासंगिक आहेत आणि त्या विचारांचा अंगिकार प्रत्येक व्यक्तींनी केला तर, खऱ्या अर्थाने समाजामध्ये समता निर्माण होईल, असे म्हणाले. या चर्चासत्रा प्रसंगी ‘क्रांतीसूर्य जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर ‘ या पुस्तकाचा आभासी पद्धतीने मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले.

या आंतरराष्ट्रीय ई चर्चासत्राचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय संयोजक तथा इतिहास विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी करून दिला तर सूत्रसंचालन इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.ए.सी.आकडे यांनी व आभार उपप्राचार्य डॉ.दुर्गादास चौधरी यांनी मानले. यावेळी प्राचार्य डॉ.महेश बेटकर, औसा यांच्या देश- विदेशातून झूम व यु-ट्युब या आभासी माध्यमातून दोनशेहून अधिक इतिहासाचे अभ्यासक, प्राध्यापक तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व शोधार्थी मोठ्या उपस्थित होते.

About The Author