मानवकेंद्री विकासाचा आग्रह धरणारी साहित्यकृती म्हणजे पृथ्वीचं आख्यान होय – अतुल देऊळगावकर

मानवकेंद्री विकासाचा आग्रह धरणारी साहित्यकृती म्हणजे पृथ्वीचं आख्यान होय - अतुल देऊळगावकर

उदगीर (एल.पी.उगीले) : विश्वाचा स्थळ-काळ मर्यादित व चिमुकला भाग हा मानव प्राणी असला तरी इतरांपेक्षा आपण वेगळे आहोत, अशा अविर्भावात व विवेक बुद्धीच्या दृष्टीभ्रमातून सहनशील धरतीवरती चालवलेले अनन्वित अत्याचार, अतिव वृक्षतोड, नद्या-नाल्यांवरील वाढती वस्ती, यामुळे पाणी व जंगल संपवून त्या जागेचे वाळवंट करत आहेत. मानवाचं हे एक प्रकारचं निसर्गाविरुद्धच आत्मघातकी युद्धच आहे. या युद्धाला सहनशील धरती कडून दिला जाणारा निर्वाणीचा इशारा लक्ष्यात घेत मानवकेंद्री विकासाचा आग्रह धरणारी साहित्यकृती म्हणजे पृथ्वीचं आख्यान होय, असे मत अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केले.

जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या २७५ व्या वाचक संवाद मध्ये प्रसिद्ध लेखक,पर्यावरण तज्ञ व व्याख्याते अतुल देऊळगावकर यांनी स्वलिखित पृथ्वीचं आख्यान या साहित्यकृतीवर सविस्तर असा संवाद साधताना पुढे म्हणाले की, निसर्गाची जपणूक करणारी जीवनशैली अवलंबली पाहिजे. प्रदूषणकर्त्याला दंड न लावल्यामुळे निसर्गावरील मानवी अत्याचारात वाढ होते. वृक्षतोडीशिवाय घरात फर्निचर येत नाहीत. जर अर्थशास्त्र हिंसेवर आधारित असेल तर माणूस हिस्त्रच बनणार.

माणसाने चालवलेल्या अनन्वित अत्याचारामुळे आजपर्यंत जवळपास दहा लक्ष सजीवांच्या प्रजातींचे उच्चाटन झाले आहे. या सर्वांसाठी मानवी कृत्येच जबाबदार आहेत. शुभ्रतेच्या शोधात काळवंडलेली मानवी पात्रे उघडी पाडण्याचा प्रयत्न या साहित्यकृतीतून केलेला आहे.

अध्यक्षीय समारोप करताना जयदेव डोळे म्हणाले की,पर्यावरण संतुलनाच्या संदर्भात राजकीय लोकांची जबाबदारी मोठी आहे. त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. उदगीर सारख्या तालुक्याच्या ठिकाणी वाचन संस्कृती रुजविण्यासाठी इतक्या सातत्याने हा उपक्रम चालू आहे, हे अत्यंत कौतुकास्पद आहे.या कार्यक्रमाचे संचालन प्रा. बालाजी सूर्यवंशी यांनी केले, प्रास्ताविक मुख्य संयोजक अनंत कदम यांनी मांडले तर आभार कु.प्रतीक्षा लोहकरे हीने मानले.

About The Author