वडिलांचा राजकीय वसा आणि वारसा उचलणारे गजानन भोपणीकर
देवणी सारख्या ग्रामीण भागात शैक्षणिक क्रांती घडवून आणणारे आणि राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवणारे शिक्षण महर्षी गोविंदराव भोपणीकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गजाननराव भोपनीकर हे कार्य करत आहेत.
गोविंदराव भोपणीकर यांनी आपल्या तरुण वयातच युवक काँग्रेस पासून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. तसा फारसा राजकीय वारसा नसताना देखील विकासाची दृष्टी असल्यामुळे त्यांना पक्षांतर्गत वेगवेगळी पदे भूषवण्याचे योग आले. या तरुण वयात दूरदृष्टी आणि विकासाची जाण लक्षात येताच उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला. त्यावेळी उदगीरचा भविष्यात होणारा विकास विचारात घेऊन त्यांनी मार्केट यार्ड साठी शंभर एकर जमीन मिळाली पाहिजे, यासाठी लोकनेते स्व. विलासराव देशमुख यांच्याकडे हट्ट धरला होता. कर्मधर्म संयोगाने त्यांनी मंजुरी देऊन या विकासात्मक कामासाठी टोकन अमाऊंटही टाकली होती. मात्र दुर्दैवाने “दैव देते आणि कर्म नेते” म्हणतात. तशी अवस्था उदगीरकरांची झाली.
एवढा मोठा प्रकल्प जर गोविंदराव भोपणीकर यांनी यशस्वी करून दाखवला तर उदगीरच्या इतिहासात त्यांचे नाव अजरामर होईल, अशा पद्धतीच्या कूटनीतीच्या राजकीय डावपेचातून त्यावेळच्या लोकांनी या विकासात्मक कामाला खीळ घातली. कोट्यावधी रुपयांची उलाढाल आणि त्या उलाढालीतून बाजार समितीचा सर्व खर्च निघाला असता, मात्र विरोधासाठी विरोध करणाऱ्यांनी पावलो पावली गोविंदराव भोपणीकर यांची अडवणूक करणे आणि विकासाला अडथळा निर्माण करणे. अशा पद्धतीचे राजकारण खेळले गेले. तरीदेखील तत्कालीन उदगीरचे नेते माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांनी त्यांना वेगवेगळ्या पदावर काम करण्याची संधी दिली. बाळासाहेब जाधवांचे अत्यंत निकटवर्ती म्हणून ते ओळखले जायचे, देवणी तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर त्यांचे गाव देवणी तालुक्यातील म्हणून त्यांना देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीवर देखील काम करण्याची संधी देण्यात आली.
या ठिकाणी देखील त्यांनी आपल्या अनुभवी नेतृत्वाचा ठसा उमटवला. कृतिशील आणि सकारात्मक राजकारण हे त्यांचे वैशिष्ट्य राहिले आहे.
ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक क्रांती घडली पाहिजे. असा उदात्त हेतू ठेवून भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी यांनी भावी काळात संगणक महत्त्वाचे असल्याचे भाकीत सांगितले होते. त्याची आठवण ठेवून गोविंदराव भोपणीकर यांनी देवणी सारख्या ग्रामीण भागात गोरगरीब, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना देखील दर्जेदार शिक्षणाचा लाभ व्हावा. म्हणून रसिका महाविद्यालय सुरू केले. निसर्गरम्य वातावरणात सुसज्ज इमारत आणि सर्व सोयींनी युक्त महाविद्यालय असल्याने अल्पावधीतच या महाविद्यालयाचे नावलौकिक झाले.
विद्यमान स्थितीत गजानन भोपणीकर हेच या महाविद्यालयाचे व्यवस्थापन पाहत आहेत. अर्थात गोविंदराव गोपनीकर त्यांना मार्गदर्शन करतात. या शैक्षणिक क्रांती सोबतच, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात. तशा पद्धतीने निलंगा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष पद भूषवून त्यांनी आपल्या कार्य कर्तुत्वाचा वेगळा ठसा उमटवला. परिणामतः पक्ष श्रेष्ठींनी त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांच्यातील संघटनकुशल गुण ओळखून, त्यांना व्यापक स्वरूपात काम करता यावे. यासाठी महाराष्ट्र पातळीवरील महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव पदी नियुक्ती करून मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.
आज तागायत त्यांनी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक या सर्वच क्षेत्रात आपल्या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून व्यापक स्वरूपात कार्य केले आहे. त्या कार्याची दखल काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी घेतली आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अशाच कर्तबगार कार्यकर्त्यांच्या खांद्यावर जर जबाबदारीचे ओझे दिले तर ते दुप्पट जोमाने कामाला लागतील, आणि काँग्रेसची धुरा सांभाळतील. असा विश्वास पक्षश्रेष्ठींनी गजानन भोपणीकर यांच्यावर सोपवला आहे. ज्या पद्धतीने गोविंदराव भोपणीकर यांनी राजकीय आणि सहकार क्षेत्रात प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील कर्तबगारिने आणि निस्वार्थ भावनेने आपला कार्यकाळ गाजवला, तोच वसा गजाननराव देखील उचलतील असे पक्षश्रेष्ठींना वाटते.
काही प्रमाणात काँग्रेस पक्षासाठी सध्याची परिस्थिती पूर्वी सारखी अनुकूल नाही, त्यामुळे कर्तबगार युवकांना संधी देऊन त्यांना कार्य करायला पुढे आणले पाहिजे. अशा हेतूने ही नियुक्ती करण्यात आली असावी, अशी चर्चा देवणी परिसरात चालू आहे. “बाप से बेटा सवई” म्हणतात. तशाच प्रकारे गजानन भोपणीकर यांनी आपल्या युवा अवस्थेतच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस वर स्थान मिळवून आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे! त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात देखील उत्कृष्ट कार्य केले आहे. त्यांच्या रसिका महाविद्यालयाला आयएसओ नामांकन मिळवून दिले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देता येते आणि खरी गुणवत्ता ही ग्रामीण भागातच असते, हे सिद्ध करणारे हे महाविद्यालय त्यांनी गतिशील करून दाखवून दिले. या महाविद्यालयाच्या प्रगतीमध्ये त्यांचे योगदान फार मोठे आहे.
तसा त्यांना राजकीय वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला असला तरी पक्षश्रेष्ठींची जवळचे नाते ठेवणे आणि पक्ष श्रेष्ठींचा आदेश पाळणे हे गुण गजाननरावामध्ये पाहायला मिळतात. आपल्या वडिलांनी शून्यातून विश्व निर्माण केले. याची जाणीव त्यांना आहे. त्यामुळेच शैक्षणिक क्षेत्रातून आपल्या परिसराचा विकास घडवून, निसर्गरम्य वातावरणामध्ये शिक्षणाची गंगा सर्वसामान्य लोकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचे तसेच गोरगरिबांच्या मुलांना देखील उच्च शिक्षण घेता आले पाहिजे. असा हेतू ठेवून रसिका महाविद्यालयाच्या माध्यमातून विज्ञान, कला, वाणिज्य या सर्वच क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी संधी उपलब्ध करून देता यावी अशा पद्धतीचे भव्य शैक्षणिक संकुल त्यांनी उभारले आहे.
शेकडो विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयाचे नावलौकिक करत असतानाच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपलेही करिअर करून दाखवले आहे. इतकेच नाही तर आपल्या भागातील शेतकऱ्यांची होत असलेली हेळसांड आणि शेतात पिकलेल्या मालाला लगेचच्या लगेच विक्रीला काढल्यास कमी भाव येणे, परिणामतः शेतकऱ्यांची होणारी आर्थिक गोची लक्षात घेऊन शेतकऱ्यांना माल साठवून ठेवण्यासाठी वेअर हाऊस ची व्यवस्था त्यांनी करून ठेवली. यामुळे जेव्हा शेतीमालाला रास्त भाव असेल त्याच वेळेस या वेअर हाऊस मधून शेतकऱ्यांना माल बाजारात नेता येऊ शकेल. शेतमाल सुरक्षित राहणे हे देखील अत्यंत गरजेचे असल्यामुळे आणि देवणी सारख्या ग्रामीण भागात सर्वसामान्य शेतकऱ्यांना आपल्या घरी किंवा शेतात माल सुरक्षित ठेवणे शक्य नसल्याने, या वेअरहाऊसचा लाभ हजारो शेतकरी घेत आहेत.
काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे ग्रामीण भागातील जनतेच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी घराघरात आणि घरातल्या प्रत्येकाच्या मनामनापर्यंत सर्वधर्मसमभाव आणि राष्ट्र एक संघ ठेवण्याच्या उद्देशाने काँग्रेस शिवाय पर्याय नाही. हा विचार जनतेच्या मनात पोहोचवण्याचे कार्य जसे वडिलांनी केले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून गजानन भोपणीकर हे देखील राजकारणात सक्रिय होत आहेत. महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसच्या कार्यकारणीत त्यांना संधी मिळाली, सचिव पद मिळाले! यामुळे संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये त्यांचे कौतुक केले जात आहे.