फुले दाम्पत्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मार्गक्रमण करा – प्रा. डॉ. रामकृष्ण बदने

फुले दाम्पत्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मार्गक्रमण करा - प्रा. डॉ. रामकृष्ण बदने

मुखेड (गोविंद काळे) : महात्मा फुले व सावित्रीबाई फुले हे आदर्श दाम्पत्य होते. दोघांनाही स्वतःच मुलं नसताना ही त्यांनी दत्तक मुलाला घेऊन समाजसेवा केली. स्त्रियांना शिक्षण देताना अंगावर शेणा खड्यांचा मारा झेलला पण सामाजिक कार्य सोडले नाही. समाज सेवेसाठी संपन्न जीवन सोडून कफल्लका सारखे जीवन व्यतीत केले. एक संवेदनशील मन घेऊन सावित्रीबाई समाजसेवा करत राहिल्या. समाजाचे काम करताना पती सोडून घरातून त्यांना विरोधही पत्करावा लागला. तरीही तो त्यांनी सहन केला. प्लेगच्या साथीत गोरगरीब रुग्णांची सेवा करतानाच प्लेगचा संसर्ग होऊन त्यांनी शेवटचा श्वास घेतला. काव्यलेखनातून समाजाचे दुःख समाजा समोर मांडले. अंध्दश्रध्देतून समाजाला बाहेर काढण्यासाठी कृतीशील प्रयत्न केले. उभ आयुष्य समाजासाठी वेचणाऱ्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले या दाम्पत्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण मार्गक्रमण करावे असे प्रतिपादन प्रा. डॉ. रामकृष्ण बदने यांनी ग्रामीण (कला,वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय वसंतनगर ता. मुखेड जि. नांदेड येथील इतिहास विभाग व लैंगिक अत्याचार निर्मुलन समितीच्या वतीने सावित्रीबाई फुले स्मृतिदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणुन बोलताना केले.

अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे उपप्राचार्य अरुण कुमार थोरवे म्हणाले की देशाच्या एकूण उत्पन्नात स्त्रियांचा अर्धा वाटा असतानाही त्यांना सन्मान दिला जात नाही. ही चिंतेची बाब आहे.मुलींसाठी या फुले दाम्पत्याने शाळा काढल्या नसत्या तर स्त्रियांच्या शिक्षणाची आजची परिस्थिती आपणास पहावयास मिळाली नसती. स्त्री ही चूल व मूल यातच अडकून राहिली असती. स्त्रियांना समानतेचा दर्जा त्यांच्या कार्यामुळे मिळाला. स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता आहे हे आपण लक्षात घेऊन त्यांना सन्मान दिला पाहिजे. या आदर्श अशा कार्यक्रमातून आपण चांगला आदर्श घेतला पाहिजे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख प्रा. निवृत्ती नाईक यांनी केले. ते आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की महापुरुषांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या या त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मार्गक्रमण करावे यासाठी असतात. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करून सावित्रीबाई फुलेंनी इतिहास घडवण्याचं काम केले. एक स्त्री म्हणून त्या कधीही खचल्या नाहीत. आपल्या पतीच्या समर्थ साथीने त्यांनी नव समाज घडविण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन लैंगिक अत्याचार निर्मुलन समितीच्या सदस्या तथा इंग्रजी विभागाच्या प्रा. सौ. शिल्पा शेंडगे यांनी केले तर आभार इतिहास विभागाचे प्रा. सुनील पवार यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author