‘आल्या’ ‘गेल्या’ ‘जेवलालाव’ या सारख्या भाषिक शब्दकळेवर भौगोलिक घटकांचा प्रभाव – प्रा. डॉ. सचिन गर्जे
अहमदपूर (गोविंद काळे) : भाषेचे मार्दव हे प्रदेश, विभाग निहाय व भाषिक प्रांत रचनेनुसार होत असले तरी नांदेड जिल्ह्याची ‘आल्या’ ‘गेल्या’ तर लातूरची ‘आलाव’ ‘गेलाव’ या सारख्या साद शब्दकळेंची भाषाशैली वेगळी उमटून पडते. तिच्या या वेगळेपणाच्या उच्चार शैलीवर भौगोलिक घटकांचा प्रभाव असून त्याचे रहस्य भूगोलात दडले असल्याचे सप्रमाण प्रा. डॉ. सचिन गर्जे यांनी आपल्या संशोधन लेखातून सिद्ध केले आहे. अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयातील प्रा. डॉ. सचिन गर्जे हे भूगोल विभागात मागील बारा वर्षापासून कार्यरत आहेत. यांनी नुकताच एक संशोधन लेख मध्ये प्रकाशित केला असून यांच्या या संशोधनात नांदेड ‘टच’ असलेली ‘आल्या’ …’गेल्या’…बसल्या, जात्या, जेवल्या ही वैशिष्ट्यपूर्ण शब्दकळा असलेल्या भाषा शैलीसाठी प्रसिद्ध आहे. तर लातूरची ‘आलाव’… ‘गेलाव’ ही भाषा राज्यात परराज्यात गेलं की या उच्चार शैलीवरून समोरचा माणूस तुम्ही नांदेडचे काय? तसेच उदगीर वा लातूर जिल्ह्याचे आहात काय..? म्हणून विचारतो. अशी शब्दकळा अस्तित्वात येण्यामागे कोणता घटक कारणीभूत आहे? याचा भौगोलिक व भाषिकतेचा शोध घेत असताना त्यांनी उदगीर हे उंचावरील ठिकाण आहे तर नांदेड हे कमी उंचावरील ठिकाण आहे. हे दोन्ही ठिकाणं निवडून त्यांचा तौलनिकदृष्टया अभ्यास डॉ. सचिन गर्जे यांनी केला आहे. या संशोधनात त्यांना असे आढळून आले आहे की, ‘वायुभार’ हा घटक ध्वनी उच्चार शैलीवर प्रभाव टाकत असतो हे जाणवून आले.
आपल्या संशोधनामध्ये त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, उदगीर तालुका वा लातूर जिल्हा हे उंचावरील ठिकाणं असून येथे वायुभार हा कमी आहे. तर नांदेड जिल्हा हा कमी उंचावरील ठिकाण असल्याने येथे वायुभार हा जास्त आहे.. या कारणांमुळे उच्चार करत असताना नांदेडच्या व्यक्ती जास्त वायुभाराच्या दाबामुळे कमी वेळेत उच्चार पूर्ण करतात व उच्चारांच्या शेवटी ‘ल्या’ हा प्रत्यय लावतात. तर या उलट उदगीरच्या व्यक्ती ह्या उच्चाराच्या शेवटी कमी वायुभारामुळे ‘आलाव’, गेलाव, करू लावाव, जेवलालाव हा दीर्घ उच्चाराचा ‘प्रत्यय’ लावून उच्चार पूर्ण करण्यासाठी दीर्घ वेळ घेतात. प्रा. डॉ. सचिन गर्जे यांनी आपल्या संशोधनात स्थानिक ‘भाषा’आणि ‘उच्चार’ यावर भौगोलिक घटक परिणाम करत असतात याबाबत महत्वपूर्ण असे विस्तृत विवेचन केले आहे.