हिंदी भाषेच्या जागतिकतेचे दार संस्कृतीच्या हृदयातून उघडले गेले आहे – चीनचे अभ्यासक डॉ. विवेक मणी त्रिपाठी

हिंदी भाषेच्या जागतिकतेचे दार संस्कृतीच्या हृदयातून उघडले गेले आहे - चीनचे अभ्यासक डॉ. विवेक मणी त्रिपाठी

अहमदपूर (गोविंद काळे) : जगातील प्रमुख चार प्राचीन संस्कृती पैकी भारतातील सिंधू संस्कृती ही जगातील महान संस्कृती आहे व हिंदी भाषा या संस्कृतीला जोडलेली असल्यामुळे या भाषेला जागतिक भाषा म्हणून मान्येतेचे दार उघडले गेले आहे. ती आज विश्वाच नेतृत्व करीत जागतिक आहे, असे प्रतिपादन चीन येथील ग्वाँगटोंग विद्यापीठाचे प्रोफेसर डॉ. विवेक मणी त्रिपाठी यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘जागतिक दृष्टिकोनातून भारत’ या एक दिवशी आंतरराष्ट्रीय अंतरविद्याशाखीय परिषदेत ते बीजभाषक म्हणून बोलत होते भारताला जी – 20 चे अध्यक्ष पद मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या अध्यक्षस्थानी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे श्रीरंगराव पाटील एकंबेकर हे होते तर, उद्घाटक म्हणून तेलंगणा राज्यातील वरंगल येथील सातवाहन विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. मोहम्मद इकबाल अली यांची उपस्थिती होती. यावेळी विचारमंचावर किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे माधवराव पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, संयोजक तथा ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे यांच्यासह महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. आर. काबरा, महात्मा फुले प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भागवत मुसने आदींची उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना बीजभाषक प्रोफेसर डॉ. विवेक मनी त्रिपाठी म्हणाले की, भारतीय भाषा आणि साहित्याच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीची ओळख विश्वाला होते, कुठल्याही देशाच्या सीमेवर सैनिक उभे न करता भारतीय संस्कृतीने चीनसह अर्ध्या जगावर मागील दोन हजार वर्षापासून राज्य केले आहे. या संस्कृतीचा प्रभाव जागतिक जनजीवनावर मोठ्या प्रमाणावर दिसून येतो, असेही ते म्हणाले.
या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी सातवाहन विद्यापीठ वारंगल चे माजी कुलगुरू डॉ. मोहम्मद इकबाल अली म्हणाले की, १९९० साली भारत सरकारने खुले आर्थिक धोरण स्वीकारले इतर सर्व व्यवसायांना उद्योग म्हणून मान्यता मिळाली मात्र शेती हा प्रचंड मोठा व्यवसाय असूनही त्याला उद्योगाची मान्यता मिळाली नाही. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या योजना शासनाने आणल्या पाहिजेत तरच शेतीचा, शेतकऱ्यांचा पर्यायाने देशाचा विकास होईल, असेही ते म्हणाले. उद्घाटन सत्रा नंतर दोन निबंध वाचन सत्राचे आयोजन करण्यात आले.
यावेळी प्रतिनिधिक स्वरूपात कणकवली कॉलेज, कणकवली येथील डॉ. सोमनाथ कदम, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय राणीसावरगाव चे डॉ. बालाजी गव्हाळे, शिवजागृती महाविद्यालय नळेगावचे डॉ. बालाजी डिगोळे, शिवाजी महाविद्यालय उदगीरचे डॉ. सुरेश शिंदे, दयानंद कला महाविद्यालय लातूरचे डॉ. बालाजी घुटे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील संशोधन विद्यार्थी मेघा ढवळे यांनी प्रथम सत्रात शोधनिबंधाचे वाचन केले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूरच्या हिंदी विभाग प्रमुख डॉ. राजश्री भामरे या होत्या तर, या सत्राचे सूत्रसंचालन डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले तर, आभार भूगोल विभाग प्रमुख डॉ. डी. एन. माने यांनी मानले.
द्वितीय सत्रामध्ये स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय अंबाजोगाई चे डॉ. सोनवलकर, संभाजी महाविद्यालय मुरुडचे डॉ. माधव गायकवाड, महात्मा फुले महाविद्यालय किनगावच्या डॉ. दर्शना कानवटे, स्वामी विवेकानंद महाविद्यालय मुक्रमाबादचे डॉ. सकनोरे, नेताजी सुभाष चंद्र बोस महाविद्यालय नांदेडचे डॉ. शशिकांत दर्गू आदींनी शोधनिबंधाचे वाचन केले तर, या सत्राच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. रत्नाकर लक्षेटे हे होते तर साधन व्यक्ती म्हणून डॉ. गणपत कारिकंटे यांची उपस्थिती होती. या सत्राचे सूत्रसंचालन समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सतीश ससाणे यांनी केले तर, आभार संस्कृत विभाग प्रमुख डॉ. प्रशांत बिरादार यांनी मानले.
उद्घाटन सत्राची प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले तर, सूत्रसंचालन इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. अतिश आकडे यांनी केले व आभार संयोजक प्रा . परमेश्वर इंगळे यांनी मानले . या परिषदेत महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, केरळ, उत्तर प्रदेश आदी राज्यातून दोनशेहून अधिक प्राध्यापक,संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author