बीट अंमलदार नाना गेले, शिरसे आले!!
अवैध दारू अन हातभट्टीवाल्यांचे चांगभले !!
उदगीर (एल.पी.उगीले) उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत अवैद्य दारू आणि हातभट्टीवाले यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. वास्तविक पाहता लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे तसेच आयपीएस निकेतन कदम हे सतत अवैध दारूच्या विरोधात धाडी टाकून अवैध, विषारी आणि बनावट दारू विक्रीवर प्रतिबंध आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. मात्र असे असतानाही उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत असलेले कर्मचारी झारीतले शुक्राचार्य बणून जणू काही सर्व अलबेल आहे, असे दाखवण्यात मश्गुल आहेत. उदगीर तालुक्यातील कुमठा ग्रामपंचायतच्या वतीने आणि महिलांच्या वतीने दारू विक्रेत्यावर मोर्चा काढून अवैध दारू विक्रीचे धिंडवडे काढले होते, त्याच्या पाठोपाठ लोणी ग्रामपंचायतच्या वतीने देखील लोणी मोड ते लोणी या तीन किलोमीटरच्या अंतरात अनेक ठिकाणी अवैधरित्या देशी दारू, हातभट्टी, बनावट दारू विक्री होत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या.
त्यानंतर बीट अंमलदार यांची बदली झाली, त्या ठिकाणी नवीन बीट अंमलदार शिरसे आले! मात्र परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही. जणू काही, “जुन्या बाटलीत नवी दारू” म्हणतात. तसेच बीट अंमलदार बदलले मात्र परिस्थिती बदलली नाही. अशी स्थिती निर्माण झाली आहे, या बीट आमदारांना फोन करून अवैध धंद्याच्या संदर्भात माहिती दिली असता, तशा पद्धतीची लेखी तक्रार द्या. अशा सूचना केल्या जात आहेत. तसेच, “मी नवीन असल्याने मला नेमके ठिकाण माहिती नाही” असे नाटक करून या अवैध धंद्यावर पांघरून घालण्याचे रीतसर कामही केले जात आहे. उदगीर तालुक्यातील अनेक धाब्यावर आणि अवैध दारू विक्रेत्याकडे बनावट आणि विषारी देशी दारू, हातभट्टीची दारू इतकेच नाही तर नवसागर मिश्रित ताडी हेही विक्रीसाठी उपलब्ध होत असल्याने तळीरामांच्या आरोग्याचा विचार कोण करणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. बरेच कष्ट करणारे कामगार मजूर श्रम परिहार म्हणून स्वस्तातल्या दारूचा आधार घेतात. मात्र त्यांच्या जीवनाशी खेळत चार पैशाच्या लालसेपोटी अवैध दारूवाले आणि त्यांच्याकडून मिळणारी चिरीमिरी यासाठी प्रशासनातील कर्मचारी या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात, अशी चर्चा आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी तोंडार येथील ग्रामस्थांनीही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र दुर्दैवाने पोलिस अधिकाऱ्यांनी म्हणावे त्या गांभीर्याने या विषयाकडे पाहिले नाही. त्यामुळे विषारी दारूमुळे तरुण दगावले होते. हे सर्व झाले असले तरीही बीट अंमलदारांना त्याबाबत फारसे गांभीर्य दिसून येत नसल्याने, नागरिकांमध्ये प्रचंड चीड निर्माण होत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमाणिकपणे या अवैध धंद्याच्या विरोधात मोहीम काढत असून देखील, स्थानिक पोलीस मात्र वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत अवैध धंदेवाल्यांना पाठीशी घालत आहेत, अशी ओरड चालू आहे. काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या असताना देखील लोकप्रतिनिधीच्या आशीर्वादाने त्यांना पुन्हा येथेच मुदतवाढ देण्यात आली असल्याने आता आपले कोण काय वाकडे करणार? अशा पद्धतीची हिम्मत त्या कर्मचाऱ्यांमध्ये आल्याने आणि झटपट श्रीमंत होण्याच्या लालसेने अवैध धंदेवाल्यांना हाताशी धरून ते मनमानी तर करत नाहीत ना? याचाही तपासणी गरजेचे आहे. इतर अवैध धंद्यापेक्षा सर्वात घातक असलेल्या या अवैध आणि विषारी बनावट दारूचा विषय गांभीर्याने घेतला जावा, केवळ चिरीमिरीच्या लालसेपोटी नागरिकांच्या आरोग्याशी खेळले जाऊ नये, असेही बोलले जात आहे.
उदगीर हे कर्नाटका, आंध्रा, तेलंगणा आणि महाराष्ट्र या चार राज्याच्या सीमेवर असल्यामुळे, दुसऱ्या राज्यातून कमी किमतीच्या दारू आणून त्यामध्ये रसायन आणि इसेन्स मिसळून वेगवेगळ्या कंपन्यांची चव त्यात टाकून, जुन्या रिकाम्या बॉटलमध्ये भरून, सीलबंद करून, महाराष्ट्रात बनवलेल्या दारूच्या किमतीत किंवा वेळप्रसंगी मोठी सूट देऊन, विक्री करण्याचा व्यवसाय गतिमान झाला आहे. देवणी तालुक्यात गोवा राज्यातून दारू आणून सर्रासपणे महाराष्ट्रीयन दारू बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न राज्य उत्पादन शुल्क विभागाने केला होता. मात्र तोच “येरे माझ्या मागल्या कालच्याच ताक कन्ह्या चांगल्या….”या म्हणी प्रमाणे पुन्हा गतिमान होऊन त्याची विक्री उदगीर तालुक्यातील अनेक धाब्यावरून आणि अवैद्य दारू विक्रेत्यामार्फत केली जात असल्याचे बोलले जात आहे. आता यावर कोण प्रतिबंध आणावा? हाही संशोधनाचा विषय बनला आहे.