करोना विरूद्धची ही लढाईसुद्धा आपण लवकरच जिंकू – डॉ.जयप्रकाश केंद्रे
या युद्धातला आपापला खारीचा वाटा उचलू या
अहमदपूर ( गोविंद काळे ) : सभोवताली उसळलेला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप पाहता आपण एका भितीदायक, अनिश्चिततेने ग्रासलेल्या कालखंडात जगत आहोत असंच म्हणावं लागेल.अलीकडच्या काही दिवसांत दररोज अगदी न चुकता कुणीतरी परिचीत,नातलग किंवा मित्र परिवारापैकी कुणाचातरी करोनाने बळी घेतल्याच्या बातम्या कानावर पडत आहेत.काही जणांच्या कुटूंबातील कुणीतरी किंवा अगदी जीवाभावाचंही कुणीतरी करोनाच्या प्रकोपाला बळी पडलेलं असू शकतं फक्त इथं ते स्पष्टपणे नमूद करण्याचं धैर्य होत नाही.
एक माणूस म्हणून आणि वैद्यकीय व्यावसायिक म्हणूनही सध्याची परिस्थिती प्रचंड हादरवून टाकणारी आहे.वैद्यकीय व्यावसायिक म्हणून करोना रूग्णांवर उपचार करताना किंवा करोना रूग्ण व त्यांचे नातेवाईक यांना आवश्यक ते वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी मदत करताना जे माझ्या निदर्शनास येत आहे त्यावरून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की करोनाइतकाच लोकांचा करोनाकडे पाहण्याचा बेपर्वाई, निष्काळजीपणाचा दृष्टिकोन घातक आहे.करोनामुळे होणारं मृत्यूचं थैमान आटोक्यात ठेवायचं असेल तर लोकांमध्ये प्रचंड जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे.त्याअनुषंगाने काही बाबी मी इथे आवर्जून नमूद करू इच्छितो:
करोनाच्या पहिल्या लाटेत करोना रुग्णांत आढळून येणाऱ्या लक्षणांपेक्षा करोनाच्या दुसऱ्या लाटेत आढळणारी करोनाची लक्षणे वेगळी आहेत.करोनाच्या नेहमीच्या लक्षणांशिवाय अंग दुखणे, सांधे दुखणे,डोके दुखणे,पाय दुखणे,अशक्तपणा, संडास लागणे, थकवा अशा प्रकारची लक्षणं रुग्णात आढळल्यास करोना विषाणूचा संसर्ग झालेला असू शकतो हे आपण पहिल्यांदा लक्षात घेणं गरजेचं आहे.
दुसरी महत्त्वाची बाब ही की करोनाचे निदान लवकरात लवकर झाल्यास पुढे रुग्णाच्या प्रकृतीसंदर्भात होणारी गुंतागुंत टळते.त्यामुळे रुग्णाचा जीव वाचण्याची शक्यता अनेक पटीने वाढते.त्यामुळे करोनाच्या सर्वांना माहीत असणाऱ्या लक्षणांबरोबरच वर नमूद केलेल्या लक्षणांतली एक किंवा त्यापेक्षा जास्त लक्षणे आढळल्यास त्याकडे डोळेझाक न करता करोना तपासणी करून घ्यावी.
करोना चाचणी करून घेण्याबाबतीत लोकांच्या मनात एक प्रकारची भीती असल्याचे अनेकदा रुग्णांशी बोलताना जाणवते.खरंतर ही अतिशय साधी तपासणी असून ही तपासणी करताना रुग्णाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही.उलट ही तपासणी वेळेवर करून घेतल्याने वेळीच रोग निदान होते त्यामुळे योग्य वेळी योग्य औषधोपचार करवून घेतल्याने आपला अमूल्य जीव वाचतो.
गंभीर स्वरुपाची करोना लक्षणे असणाऱ्या रुग्णांशी बोलताना हे जाणवते की त्यांनी सुरुवातीला आजाराची लक्षणे सौम्य असल्याने उपचार घेण्यात चालढकल तरी केलेली असते किंवा त्यांच्या वर करोनासाठी आवश्यक असणारे योग्य उपचार तरी केले गेलेले नसतात.मित्रांनो ,अशा प्रकारे आजार अंगावर काढणे म्हणजे एक प्रकारे स्वत:चा जीव धोक्यात घालणेच नव्हे काय ? उपचार करण्यात चालढकल करणे जीवावर तरी बेतू शकते किंवा आजार गंभीर झाल्याने महागडे उपचार घ्यावे लागून प्रचंड आर्थिक हानी तरी होते.म्हणूनच आजाराची लक्षणे जाणवल्यास तातडीने ‘योग्य’ उपचार करून घेणे गरजेचे आहे. आपल्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडे करोना चाचणी करवून घेण्याविषयी अवश्य आग्रह धरावा.सर्व सरकारी दवाखान्यांमध्ये करोना चाचणी मोफत केली जाते.
करोना चाचणी संदर्भात आणखी एक महत्त्वपूर्ण बाब लक्षात ठेवणे गरजेचे आहे की करोना पॉझिटिव्ह रूग्णाशी जवळून संपर्क आल्यानंतर शक्यतो पाचव्या दिवशी करोना चाचणी केल्यास मिळणारे निष्कर्ष अधिक बिनचूक मिळतात.त्याअगोदर चाचणी केल्यास मिळणारे निष्कर्ष चुकीचे ( false negative) असू शकतात म्हणून करोना चाचणी करोना पॉझिटिव्ह रुग्णाशी संपर्क आल्यानंतर पाचव्या दिवशी करावी.
रुग्णाच्या रॅपीड अॅंटीजन आणि RTPCR या दोन्ही चाचण्या नेगेटीव आल्या उपचार चालू असूनही रुग्णाची लक्षणे कमी होत नसतील किंवा आणखी श्र्वास घेण्यास त्रास होत असेल तर रुग्णाची HRCT तपासणी डॉ.च्या सल्ल्याने करून घ्यावी.
करोनाची लक्षणे गंभीर होण्यासाठी कारणीभूत ठरणारी आणखी एक बाब ही की लक्षणांच्या सुरूवातीला काही रुग्ण स्वत:च स्वत:वर उपचार करून घेतात ( कुणाच्या तरी सल्ल्याने औषधगोळ्या घेणे किंवा गावठी स्वरुपाचे उपचार करणे ) त्यामुळे सुरूवातीचे दिवस वाया गेल्याने गुंतागुंत वाढत जाते.त्यामुळे उशिरा योग्य उपचार सुरू करण्यात येऊन आर्थिक हानी व प्रसंगी जीवावर बेतण्याचा धोका कायम राहतो.
करोनाच्या दुसऱ्या लाटेतील करोनाग्रस्त रुग्णांबाबतीत आणखी एक बाब प्रकर्षाने जाणवते की सर्वच वयोगटातील लोकांना करोनाच्या संसर्गाचा धोका जवळपास सारख्याच प्रमाणात आहे.त्यामुळे केवळ आपण तरूण आहोत या सबबीखाली बिनधास्त राहणे किंवा गाफील राहणे तरूणांना परवडणारे नाही ही बाब तरूणांनी आवर्जून ध्यानात घ्यावी.
करोना विषाणुच्या संरचनेत झालेल्या बदलामुळे करोनाच्या या दुसऱ्या लाटेत संसर्गाचा वेग अतिप्रचंड आहे.शिवाय फुफ्फुसांना या विषाणूचा संसर्ग ( निमोनीया )अगदी लक्षणे सुरू झाल्यापासून कमी वेळात होत आहे त्यामुळे पहिल्या लाटेपेक्षाही ही दुसरी लाट अधिक घातक असल्याचे निदर्शनास येत आहे.
असे असले तरीही करोनाला घाबरून जाण्याचे कारण नाही.मास्क योग्य पद्धतीने वापरणे, सुरक्षीत सामाजिक आंतर राखणे, वारंवार हात धुणे या त्रीसुत्रीचा वापर करून करोनाला आपल्या पासून दूर ठेवता येऊ शकते.त्यातूनही करोना झालाच तर लवकरात लवकर निदान आणि आजाराच्या अगदी सुरुवातीला योग्य उपचार मिळाल्यास आजाराशी संबंधित गुंतागुंत आणि मृत्यू दोन्हीही टाळता येते.
करोनाची ही दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा मोठी आहे तरीही वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणारी आम्ही सगळी मंडळी या संकटाशी नेटाने लढतोय.मित्रांनो,घरीच रहा, सुरक्षीत रहा, सुरक्षाविषयक त्रिसुत्रीचा अवलंब करा.त्यातूनही करोनाने गाठलेच तर लवकर निदान, योग्य उपचार , खात्रीशीर इलाज हे तथ्य ध्यानात घेऊन आजार अंगावर काढू नका.आम्ही लढतोय; आम्हाला साथ द्या.स्वत:चे,स्वत:च्या कुटुंबाचे,पर्यायाने संपूर्ण समाजाचे म्हणजेच अखिल मानवजातीचे रक्षण करा.आणि हो करोनाशी लढा यशस्वी होण्यासाठी ‘लसीकरण’ करून घेणेही अत्यंत महत्वाचे आहे ! लवकरात लवकर नजिकच्या लसीकरण केंद्रात जाऊन लसीकरण करून घ्या.
अखिल मानवसमूहाने अशा अनेक संकटांवर मात केलेली आहे.करोना विरूद्धची ही लढाईसुद्धा आपण लवकरच जिंकू.या युद्धातला आपापला खारीचा वाटा उचलू या.आपली जबाबदारी जबाबदारीने पार पाडू या.
डॉ.जयप्रकाश केंद्रे
वैद्यकीय अधिकारी शासकीय ग्रामीण रूग्णालय अहमदपूर