माणसाची सामाजिक जबाबदारी… ! गृहविलगीकरणाचे कटाक्षाने पालन करावे – डॉ.जयप्रकाश केंद्रे
अहमदपूर ( गोविंद काळे ) : होम आयसोलेशन अर्थात गृह विलगीकरण हा शब्द आता सर्वांच्या चांगलाच परिचयाचा झालेला आहे.करोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना गृह विलगीकरणाचा पर्याय सूचवला जातो.गृह विलगीकरणात असताना करोना रुग्णाने योग्य ती काळजी घेतल्यास करोनामुळे रुग्णाच्या प्रकृतीत पुढे होणारी संभाव्य गुंतागुंत टाळता येऊ शकते.तसेच गृहविलगीकरणाचे योग्य तऱ्हेने पालन केल्याने करोनाचा प्रसार थांबवता येऊ शकतो. दुर्दैवाने असे निदर्शनास येते की गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांनी विलगीकरणाला पुरेसे गांभीर्याने न घेतल्यामुळे ते स्वतःसाठी घातक ठरू शकणाऱ्या आरोग्यविषयक गुंतागुंती ओढवून तर घेतातच त्याबरोबरच हे रुग्ण करोनाचे सुपर स्प्रेडर असल्यामुळे जाणते अजाणतेपणी करोनाच्या फैलावास कारणीभूत ठरतात. गृहविलगीकरणात असणाऱ्या रुग्णांनी स्वत:ची काळजी कशाप्रकारे घ्यावी आणि करोनाचा प्रसार थांबवण्यासाठी कोणती काळजी घ्यावी हे समजून घेणे आवश्यक आहे.
स्वतःच्या प्रकृतीतील संभाव्य गुंतागुंत टाळण्यासाठी तसेच आपल्यामार्फत होणारा करोनाचा प्रसार रोखण्यासाठी गृहविलगीकरणात असणाऱ्या रुग्णांनी पुढील काळजी घ्यावी.
गृहविलगीकरणात असताना रुग्णाने रक्तातील ऑक्सिजनची पातळी दर सहा तासांनी तपासावी.रक्तातील ऑक्सिजनची पातळी ९५% पेक्षा कमी आढळल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
विलगीकरणाच्या काळात फुफ्फुसांचे आरोग्य तपासण्यासाठी दररोज ६ मिनीटे वॉक टेस्ट करावी. ताप कमी होत नसेल किंवा अधूनमधून ताप येत असेल तसेच तीव्र स्वरुपाचा थकवा,डोकेदुखी जाणवत असेल तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
करोना आजार बरा होण्यात आहाराची भूमिका खूप महत्त्वाची आहे.अंडी,चिकन सूप, उडीद दाळ,पनीर,सोया वडी इ.प्रथिनयुक्त पदार्थांचा आहारात आवर्जून समावेश करावा.तसेच दुध, फळे, फळांचा रस,भाज्या, सुकामेवा इ.पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करावा.
करोना रुग्णाच्या शरिरातील पाण्याचे प्रमाण सामान्य राखणे महत्त्वाचे असते. डिहायड्रेशन टाळण्यासाठी रुग्णाने भरपूर पाणी प्यावे. सौम्य स्वरूपाचे श्वसनसंबंधी व्यायाम उदा.दीर्घ श्वसन,प्राणायाम अवश्य करावे.
करोना आजारातून बरे होण्यासाठी आराम हा अत्यंत आवश्यक घटक आहे.त्यामुळे गृहविलगीकरणाच्या काळात रुग्णाने कोणत्याही प्रकारचे शारिरीक व मानसिक श्रम टाळावेत.
गृहविलगीकरणाच्या काळात चालू असलेली औषधे नियमीतपणे घ्यावीत. काही नवीन त्रास जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.मनाने औषधे घेणे टाळावे. गृहविलगीकरणाच्या काळात रूग्णाने शारिरीक स्वास्थ्याबरोबरच मानसिक आरोग्य सांभाळणे सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे.या काळात नकारात्मक बातम्या ऐकू नयेत.नेहमी सकारात्मक विचार करावा, आशावादी असावे.ध्यानधारणा, संगीत ऐकणे,वाचन इ. मार्गांनी मन प्रसन्न आणि स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करावा. रोग प्रतिकारशक्ती उत्तम राहण्यासाठी मानसिक स्वास्थ्य उत्तम असणे अत्यंत गरजेचे असते.
तंबाखू खाणे, धुम्रपान करणे टाळावे. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार,एडस् इ.आजार असणाऱ्या करोना रुग्णांनी तसेच वयाने ज्येष्ठ करोना रुग्णांनी गृहविलगीकरणात राहणे टाळावे. गृहविलगीकरणात असणाऱ्या रुग्णांनी रोगाची लक्षणे दुरूस्त झाल्यानंतर सुद्धा चौदा दिवस पर्यंत गृहविलगीकरणाचे कटाक्षाने पालन करावे कारण रोगाची लक्षणे दिसत नसतील तरीही त्या रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या इतर व्यक्तींना रुग्णापासून रोगाची लागण होऊ शकते.
सर्वात शेवटी एक बाब महत्त्वाची की लवकर निदान, योग्य उपचार, सकारात्मक विचार या माध्यमातून आरोग्यविषयक फारशी गुंतागुंत निर्माण न होता करोनावर मात करता येते.शिवाय करोनाच्या प्रसाराला आळा घालणे ही प्रत्येक माणसाची सामाजिक जबाबदारी आहे त्यासाठी सुद्धा गृहविलगीकरणाचे कटाक्षाने पालन करणे आवश्यक आहे.
– डॉ.जयप्रकाश केंद्रे, शासकीय ग्रामीण रुग्णालय , अहमदपूर.