ज्ञान, कर्म, भक्ती व योग सूत्रांचा स्वीकार करा – डॉ. माशेलकर
सद् गुणांची पूजा हिच ईश्वर पूजा – विश्वनाथ कराड
पुणे (रफिक शेख) : “आजचा दिवस स्फूर्तिदायी आहे. त्यामुळे संयम, चिकाटी,धैर्य, शिस्तबद्धता, कामात झपाटणे, विश्लेषणात्मकता, संशोधनात्मवृत्ती, प्रतिभा आणि वकृत्व कलासारख्या गुणांना विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात उतरवावे. तसेच ज्ञान, कर्म, भक्ती आणि योग हे सूत्र कायम लक्षात ठेवावेत.” असा सल्ला जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी दिला.डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्व शांती विद्यापीठ, पुणे, तर्फे थोर कीर्तनकार, प्रज्ञाचक्षु ह.भ.प.श्री. गणपत महाराज जगताप यांना डी.लिट(डॉक्टर ऑफ लेटर्स) ही सन्माननीय पदवी प्रदान करण्यात आली. तसेच युगपुरुष छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या चरित्राचे गाढे अभ्यासक, शिवशाहीर, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांना समर्पित जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत हेाते.यावेळी नालंदा विद्यापीठाचे कुलपती व सुप्रसिद्ध संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी विश्व शांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होत. याप्रसंगी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ.एन.टी.राव, प्र कुलगुरू डॉ.मिलिंद पांडे आणि कुलसचिव डॉ. प्रशांत दवे हे उपस्थित होते.डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले,“ एआयटी डब्ल्यूपीयू ने आज ज्या व्यक्तिला डी.लिट पदवी बहाल केली ती सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखी आहे. गणपत महाराज हे नेत्रहीन असूनही त्यांनी समाजाला आणि या देशाला दृष्टी दिली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी हे सिद्ध केले. तीर्थ क्षेत्र हे ज्ञानक्षेत्र व्हावे. अशी इच्छा बाळगणारे डॉ. कराड यांनी आज हे करून दाखविले आहे. तसेच, विश्ववंदनीय युगपुरूष बाबासाहेब पुरंदरे हे वयाच्या १४व्या वर्षापासून शिवचरित्राशी एकरूप होऊन तपश्चर्या केली. अशा महान व्यक्तीच्या सर्व गुणांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा.”“आज कोरोनाचे 3 लाखांपेक्षा अधिक रूग्ण सापडले आहेत,वेळीच दक्षता नाही घेतली तर काही महिन्यांमध्ये याची संख्या दुप्पट होईल. त्यामुळे विज्ञानाने तयार केलेली वैक्सिन हे अमृतासारखे आहे. तसेच सर्वांनी मास्कचा वापर करावा. त्याचप्रमाणे मानसिक मजबूती बरोबरच अध्यात्माचे अनुकरण व ध्यान धारणा करावी.”असे सांगीतले.डॉ. विजय भटकर म्हणाले,“ संतांच्या ग्रंथांचे अध्ययन करणे जीवनात महत्वाचे आहे.त्यांने जीवनाचा उध्दार होतो. आज एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने ह.भ.प.जगताप महाराज यांना डी.लिट. बहाल करून नवा पायांडा घातला आहे. कारण जगताप महाराज हे नेत्रहीन असून त्यांना संपूर्ण ज्ञानेश्वरी, गाथा यासारख्या ग्रथांचे मुखोद्गत पठण केले आहे. ते प्रज्ञाचक्षू आहेत. जगासमोर हे मोठे उदाहरण आहे.“आमचे भाग्य आहे आपला जन्म महाराष्ट्रात झाला, कारण येथे संत ज्ञानेश्वर, शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद मिळाला आहे. आज बाबासाहेब पुरंदरे यांनी जाणता राजाचे कार्य युवकांच्या मनामनात पेरले आहे.”प्रज्ञाचक्षू ह.भ.प.श्री. गणपत महाराज म्हणाले,“ ज्ञानेश्वर माऊलींच्या आशीर्वादाने आज सोन्याचा दिवस आला आहे. मी प्रतिकुल परिस्थितीमध्ये असतांनाही मला विद्यापीठाकडून पदवी बहाल करण्यात आली आहे. समर्थाच्या मनात आल्यावर सर्व काही सिद्ध होते. माऊलीच्या आशीर्वादाने संपूर्ण ज्ञानेश्वरी ब्रेल लिपीतून लिहून नेत्रहिनांसाठी उपलब्ध करून दिली आहे.”शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणाले की“ सर्वांनी शिवचरित्राचे सतत चिंतन आणि मनन करावे. ते आपल्या कणाकणात भिणविण्याचा प्रयत्न करावा. कोणाचाही कधी द्वेष आणि राग करू नका. सर्वांवर प्रेम करा हा शिवचरित्राचा संदेश आहे.”डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले.“सद्गगुणांची पूजा हीच ईश्वराची पूजा. प्रज्ञाचक्षू गणपत महाराज जगताप यांना डी.लिट ही पदवी आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याला अभिवादन करण्याच्या हेतूने हा सन्मान करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच डी.लिट ही पदवी नेत्रहिन व्यक्तीला दिली गेली आहे. त्यामुळे भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानाचा संदेश जगभर पसरला जाईल.”राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“ विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय घडवून आमच्या विद्यापीठामध्ये सर्वगुण संपन्न चारित्र्यवान विद्यार्थी घडविले जातात. विद्यापीठातून पहिली डॉक्टर्स ऑफ लेटर्स ही पदवी अध्यात्मिक क्षेत्रातील गणपत महाराज यांना देऊन गौरव केला आहे. त्यांच्या जीवन कार्याचा आदर्श विद्यार्थ्यांनी आत्मसात करावा.”प्रा.डॉ.एन.टी.राव यांनी प्रास्ताविक केले. प्रा.गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.डॉ. प्रशांत दवे यांनी आभार मानले.