पोलीस प्रशासनाच्या अपयशाचे खापर पत्रकारांच्या डोक्यावर ?

पोलीस प्रशासनाच्या अपयशाचे खापर पत्रकारांच्या डोक्यावर ?

उदगीर (प्रतिनिधी) : सध्या कोरोनाविषाणू च्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी लॉक डाऊन सुरू आहे. मात्र पोलीस प्रशासनाकडून फारशा गांभीर्याने या बाबीकडे पाहिले जात नसल्याची बातमी एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केली. ही बातमी प्रसिद्ध केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्या वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी प्रा. बिभीषण मद्येवाड यांना पोलिसांनी आपल्या पद्धतीने हिसका दाखवायचा केविलवाणा प्रयत्न केला. प्रा. मद्येवाड हे एक समाजसेवक, पत्रकार, समाजप्रबोधनपर लिखाण करणारे लेखक, एक रंगकर्मी,दिग्दर्शक, अनेक समाजसेवी संघटनांचे पदाधिकारी आहेत. असे असताना देखील लाॅक डाऊन नियंत्रणात आणणे, कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारांचा शोध घेणे यात सपशेल अपयशी ठरलेल्या पोलिसांनी आपला रुबाब पत्रकारावर दाखवण्याचा प्रयत्न केला! पत्रकारांनी उदगीर तालुका आणि ग्रामीण भागात चालू असलेल्या अवैध धंद्याच्या संदर्भात लेखणी चालवू नये, शहर आणि परिसरात चालू असलेल्या गोरख धंद्याकडे दुर्लक्ष करावे. याच उद्देशाने बहुदा दबावतंत्राचा प्रयत्न झाला असावा. अशी चर्चा पत्रकारांमध्ये चालू आहे. उदगीर शहर हे संवेदनशील शहर म्हणून पोलिस प्रशासनाकडे नोंद आहे. या ठिकाणी अत्यंत कर्तव्यदक्ष आणि सामाजिक जाणीवा ठेवणारे अधिकारी असावेत, अशी अपेक्षा असते.

 मात्र सध्या जे चालू आहे ते, “वड्याचे तेल वांग्यावर” म्हणतात, तसा प्रकार सर्रास चालू आहे. आपले अपयश झाकण्यासाठी या अपयशाची वाच्यता कुठेच होऊ नये म्हणून पत्रकारांना वेठीस धरण्याचा प्रयत्न चालू केला आहे. पत्रकारांचे मोबाईल काढून घेणे, पोलीस अधिकारी यांच्या समोर सावधान थांबणे, शर्टाची बटण लावण्याच्या सूचना देणे, असे प्रबोधनाचे धडे देण्याचा प्रयत्न डी बी चे कार्यकर्ते करत आहेत. उदगीर शहर आणि ग्रामीण भागासाठी चांगले अधिकारी हवेत म्हणून दोन्ही पो.स्टे.च्या अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या, मात्र “नव्या बाटलीत जुनीच दारू” तशी अवस्था झाली! “ये रे माझ्या मागल्या–” म्हणतात तशीच अवैध धंद्याची चलती चालू आहे. पोलीस प्रशासन या बाबीकडे का कानाडोळा करते? हे न समजणारे कोडे आहे.

 लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी उदगीर कडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. एकाबाजूला महसूल प्रशासनान, नगरपालिका प्रशासन जीव तोडून कोरोना काळात कायदा सुव्यवस्था टिकवून ठेवावी, नागरिकांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची जबाबदारी घ्यावी. या उद्देशाने काम करत असताना पोलीस प्रशासन वेगळ्याच कामात गुंतले याची चर्चा आहे.

 डी बी मुळे जनतेच्या मनात घोरपडे!

 गोरगरीब जनता पोलीस म्हटले की घाबरून जाते. कुठे फिरायचे असेल तर त्याच्या मनामध्ये घोर पडत असतो. सध्या वर्षानुवर्ष एकाच ठिकाणावर कब्जा करून आपणच सर्वेसर्वा आहोत. असे दाखवणारे काही पोलीस कर्मचारी आपल्या कर्तव्य पेक्षा जनतेमध्ये आपली दहशत कशी निर्माण होईल? आणि आपला उद्देश साध्य करून कसा घेता येईल? यासाठीच प्रयत्न करत असल्याची जोरदार चर्चा आहे. शहरात आणि शहरालगत असलेल्या ग्रामीण भागात खुलेआम मटका, गुटखा, जुगार चालू असून त्याकडे पोलीस फक्त अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी पाहत असल्याचेही बोलले जात आहे.डी.बी.पथकाच्या कामाचे आॅडिट होणे गरजेचे आहे,केवळ अधिकार्‍यांची हुजरेगीरी आणि दडपशाही हेच निकष डिबी पथकाचे आहेत कि काय? कर्तव्य सोडून इतर गोष्टी करणाऱ्या पोलिसांना राजकीय वरदहस्त आहे की काय? अशीही चर्चा आता जोर धरू लागली आहे.

भीक नको पण कुत्रा आवर

 पोलीस प्रशासनाने आपले काम नाही केले तरी चालेल! मात्र आपले वर्चस्व दाखवण्याच्या नादात सर्वसामान्य नागरिकाला चिरडण्याचा प्रयत्न करू नये. पत्रकारावर दबावतंत्र वापरून आम्ही काहीही करू शकतो, आम्हाला कायदा माहिती आहे! कोणत्याही कायद्यात तुम्हाला आत टाकू शकतो. अशा पद्धतीची दर्पयुक्त भाषा वापरून पत्रकारांना घाबरून टाकण्याचा प्रयत्न करू नये. असेही बोलले जात आहे.तसा प्रयत्न होवूही शकतो!वरिष्ठांनी वेळीच समज द्यावी,पोलिस-जनता संबंध चांगले राहिल्यास पोलिसांचेच काम चांगले होते!हा पुर्वीच्या अधिकार्‍यांनी दाखवून दिलेला इतिहास आहे!

About The Author