“उदगीर नगरपरिषदे कडून एक विद्यार्थी एक झाड मोहिम सुरु”
उदगीर (एल.पी.उगीले) : शहर व परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने उदगीर नगरपरिषदे कडून यावर्षी वृक्षलागवड मोहीम सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या आदेशाने मुख्याधिकारी शुभम क्यातमवार यांचे मार्गदर्शनाखाली या वर्षी वृक्ष लागवड मोहिमे मध्ये शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग घेण्याचे ठरले आहे.
त्यानुसार उदगीर शहरातील प्राथमिक व माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांना वृक्षलागवडीचे महत्व सांगून त्यांना नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी यांनी विविध प्रजातीच्या बिया त्यात लिंब, करंज, भावा, हेळा, अंबा, जांभूळ, व चिंच लागवड करण्यासाठी विविध भागातून बिया गोळा करून ठेवलेल्या होत्या. प्रति विद्यार्थी एक पिशवी व दोन बिया देवून विद्यार्थ्यांनी सदर पिशवी व बिया घरी घेवून जावून किंवा शालेय परिसर अभ्यास म्हणून त्याची लागवड करत सदर रोप मोठे करून त्याची आपल्या शाळा, घर, अंगण किंवा मोकळी जागा याठिकाणी लागवड व संवर्धन करावी. असा नवीन उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमात उदगीर शहरातील विद्यालय व विद्यार्थी संख्या पुढील प्रमाणे विद्यावर्धनी माध्यमिक विद्यालय ३२०१, विद्यावर्धनी प्राथमिक विद्यालय १०२०, विद्यावर्धनी इंग्लीश स्कूल २३०, लालबहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालय ७५०, लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालय २३८९, जमहुर उर्दू विद्यालय ९८०, अल अमीन उर्दू विद्यालय १००४, सरदार वल्लभभाई पटेल ७००, असे एकूण १०२७४ विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक पिशवी आणि विविध प्रजातीच्या दोन बिया वितरीत करण्यात आल्या आहेत.
सदर वृक्षलागवड मोहीम यशस्वी होण्याच्या अनुषंगाने शालेय समन्वय, पिशवी व बिया वितरण याकामी नगरपरिषदेचे वृक्ष विभाग प्रमुख अतुल तोंडारे यांच्यासह माधव शिंदे, इस्माईल शेख, अनिल महापुरे , शिवशंकर मटके, मिस्बाह सिद्दिकी, महारुद्र गालट, विशाल गुडसूरकर आदींनी मेहनत घेतली.