लाल बहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालयाचे नेतृत्व गुण विकास शिबिर संपन्न

लाल बहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालयाचे नेतृत्व गुण विकास शिबिर संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई संचलित लाल बहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालयाचे,३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षाचे औचित्य साधून, विद्यार्थ्यांच्या अंगी नेतृत्वाचे गुण विकसित व्हावेत म्हणून ,उदगीरच्या किल्ल्यामध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे नेतृत्व गुण विकास शिबिर चार सत्रामध्ये घेण्यात आले.
उद्घाटनाच्या पहिल्या सत्रात अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे तर प्रमुख पाहुणे म्हणून सरोजा विश्वनाथे,डॉ. मोहिनी आचोले व अभ्यासपूरक मंडळ प्रमुख माधव केंद्रे उपस्थित होते. प्रमुख मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.सर्व मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
प्रमुख पाहुण्या सौ.सरोजा विश्वनाथे यांनी नेतृत्व म्हणजे सर्वांना पुढे घेऊन जाणारा नेता.नेतृत्व शिवाजी महाराजांसारखे हवे.स्वराज्याची कल्पना लक्षात आल्यानंतर जीवलग मावळ्यांना एकत्र करून शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले.आठ पात्र मंत्र्यांना वेगवेगळी प्रजेच्या हिताची कामे वाटून दिली.जातपात न पाहता,घराणेशाहीला महाराजांनी तिलांजली दिली होती.पात्रता निर्माण करण्यासाठी कष्ट करावे लागतात.आपल्या शाळेने अनेक चांगले उपक्रम सिध्द केले आहेत.मार्कवंत होण्यापेक्षा गुणवंत व्हा.वर्गमंत्रीमंडळाने सहकाऱ्यांच्या मदतीने आपला वर्ग कसा पुढे जाईल याचा विचार करावा.नेत्याने नेतृत्व करताना स्वत:चाही विचार करावा.ज्यांच नेतृत्व करत आहोत त्यांच्या मनापर्यंत पोचले पाहिजे.स्वयंशिस्तित राहून काम करवून घेण्याची कला शिकली पाहिजे.नेता म्हणजे नेणारा.भारत देश कसा पुढे जाईल हे आपल्या नेतृत्वातून दाखवावे.हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषकाचे ३५० वे वर्ष आहे.उदगीरच्या किल्ल्याचा वापर करून, नियोजनबध्द पानिपतच्या युध्दात. सदाशिवराव पेशवे यांनी नेतृत्व करून निजामांना पळवून लावले होते.नेतृत्व दृढनिश्चय करून निर्माण करता येते.नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण विश्वात भारत देशाची मान उंचावली आहे.खंबीर नेतृत्व असल्याने जगात भारताला विचारल्याशिवाय निर्णय होत नाहीत.नेतृत्व विकासासाठी योग्य व्यायाम,आहार,झोप,वाचन,खेळ हे गुण अंगिकारावेत.अश्या प्रकारे नेतृत्व कसं असावं व कसं करावं.याबद्दल विश्वनाथेबाईंनी सविस्तर मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्रात बाळाराम बानापुरे सरांनी बौध्दिक खेळ व पद्य घेतले.श्री श्याम गौंडगावे व तुकाराम पेद्दावाड यांनी विविध शारीरिक खेळ घेतले तसेच काही विद्यार्थ्यांनी तलवारबाजी,काठी चालवणे व कराटे यांचे प्रात्यक्षीक सादर केले.
तिसऱ्या सत्रात डॉ.मोहिनी आचोलेताईंनी मी लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळेचीच विद्यार्थिनी आहे.शाळेतील संस्कारामुळेच मी आज तुमच्यासमोर उभी आहे.त्यानी विद्यार्थ्यांना आहार व आरोग्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.आपले आरोग्य आणि आहार चांगले असेल तर, सर्व काही करता येते.उपाशीपोटी दूध पिऊ नका.पोटासाठी सकाळचा नाष्टा व बुध्दीसाठी अभ्यास,वाचन केले पाहिजे.मनन,चिंतन केले पाहिजे.वाचनाने बुध्दीची वाढ होईल.शिवाजी महाराजांसारखे गुण आपल्यात विकसित करण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा.दुसऱ्यांचे ऐकण्याची सवय असावी.सर्व मंत्रिमंडळाची कामे समजावून सांगितली.ध्यान,आरोग्याची काळजी कशी घ्यावी.ध्यान करून एकाग्रता कशी वाढवावी,याविषयी मार्गदर्शन केले.
चौथ्या समारोप सत्रासाठी शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे सर उपस्थित होते.आजच्या प्रमुख पाहुण्या सौ.सरोजाताई व डॉ.आचोले मॅडमनी केलेल्या मार्गदर्शनाचा सर्व विद्यार्थ्यांनी नेतृत्व‌ गुण विकासासाठी शाळेत व समाजामध्ये वापर करावा.आपल्या हातून जास्तीत जास्त चांगली कामे करण्याचा प्रयत्न करावा.असे मार्गदर्शन केले.
शिबिराचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी केले तर,स्वागत व परिचय सौ.श्रीदेवी कबाडे यांनी केले. सुत्रसंचलन श्रीमती निता वट्टमवारबाईंनी केले तर,आभार माधव केंद्रे यांनी मानले.
शिबीरामध्ये एकूण ९६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.सहभागी सर्व विद्यार्थ्यांना उदागिर बाबाचे दर्शन व उदगीरचा किल्ला दाखवण्यात आला.शिबिर यशश्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.

About The Author