आई-वडिलांनी मुलांना पुर्ण स्वातंत्र्य द्यावे त्यांच्यावर स्वतःचेनिर्णय लादु नये – युवा वक्ते अॅड. अविनाश धायगुडे
धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न
लातूर (प्रतिनिधी) : जीवनात कितीही संकटे आली तरी त्यांना कसे सामोरे जायचे हे अहिल्याबाईंच्या जीवनातुन शिकले पाहिजे. अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या आयुष्यात खुप संकटांचा सामना केला पण त्यांनी कधीच हार मानली नाही. ज्या मनगटात बळ, बुध्दी आणि चातुर्य आहे तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनु शकतो असा संदेश लोकमाता अहिल्याबाई होळकर यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे आई- वडिलांनी मुलांना पुर्ण स्वातंत्र्य द्यावे त्यांच्यावर स्वतःचे निर्णय लादु नये असे प्रतिपादन प्रसिध्द युवा वक्ते अॅड. अविनाश धायगुडे यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सर्वांगिण विकास मंडळाच्यावतीने धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम विरशैव समाज सांस्कृतिक सभागृह आयोजित करण्यात आला होता यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणुन बोलत होते. या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणुन लातूरचे प्रसिध्द न्युरोसर्जन डॉ.हणुमंत किनीकर, अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त अप्पर जिल्हाधिकारी अॅड. मा.गो.मांडूरके हे होते तर विचारपीठावर डॉ. एस. बी. सलगर, अॅड. मंचकराव डोणे, बाळकृष्ण धायगुड हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
पुढे बोलताना अॅड.अविनाश धायगुडे म्हणाले की, शंभर टक्के गुण मिळाले म्हणजे मला सर्वकाही येते असा त्याचा अर्थ नाही. ज्याला कमी गुण मिळाले त्यांना पुन्हा सिध्द कण्याची संधी मिळाली आहे. या संधीचा त्यांनी उपयोग करावा. दहावीतील टक्केवारी तुमचे आयुष्य ठरवत नाही. तर तुम्ही काय केले हे जग विचारते. श्रमाला प्रतिष्ठा देण्याची गरज आहे. हे माझे करिअर आहे हे ओळखुन स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करा. तुम्ही ज्या काळात जन्मला आहात हा काळ विविध क्षेत्रात संधी देणारा आहे. पण कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला स्पर्धा ही करावीच लागणार ही खुणगाठ मनाशी बांधुन घ्या. तुम्ही शिकलेल्या शाळेत तुमच्यावर अतिशय चांगले संस्कार झाले आहेत. हेच संस्कार भविष्यात तुम्हाला तुमचे करिअर घडविण्यास उपयोगी पडणार आहेत. आई वडिलांची सेवा करणार्या मुलांची समाजाला गरज आहे. मग हा मुलगा सेवक असला तरी चालेल, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सिद्राम सलगर यांनी केले.
अध्यक्षीय समारोप करताना अॅड. मा.गो.मांडूरके म्हणाले की, अहिल्यादेवीमध्ये जो आत्मविश्वास होता तो आत्मविश्वास त्यांनी आपल्या सैनिकांमध्ये निर्माण केला. त्याप्रमाणे आपल्यामध्ये क्षमता आहे पण आत्मविश्वास कमी पडतो हा आत्मविश्वास दृढ असला पाहिजे असे बहुमोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करून यावेळी त्यांनी समाजातील गुणवंतांच्या कौतुकासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सर्वांगिण विकास मंडळ सातत्याने पुढाकार घेण्यास कटीबध्द असल्याचे स्पष्ट केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्येष्ठ कवी महादेव ढमने यांनी केले तर आभार अॅड. मंचकराव डोणे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संभाजी सुळ, मनोज राजे, संपतराव गंगथडे, रामचंद्र मदने, अॅड. सिध्देश्वर धायगुडे, रामकिशन मदने, सुभाष लवटे, रामराव रोडे, राम पाटील बडुरकर, संभाजी बैकरे, सुरेशराव अभंगे, नवनाथ कवितके, अॅड.राजेश बनसोडे, दगडू हजारे, उध्दव बापू दुधाळे, अॅड. जीवन करंडे, सुजित वाघे यांनी परिश्रम घेतले. यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.