बापूसाहेब एकंबेकर सीमा भागातील नरशार्दुल होते – डॉ. मारोती कसाब

बापूसाहेब एकंबेकर सीमा भागातील नरशार्दुल होते - डॉ. मारोती कसाब

अहमदपूर, ( गोविंद काळे) : कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतीसिंह नानापाटील, राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या प्रेरणेने बापूसाहेब पाटील एकंबेकर यांनी संपूर्ण आयुष्यभर समाजकार्य, लोकप्रबोधन आणि शिक्षणाच्या माध्यमातून बहुजनांच्या आणि सीमा भागातील मराठी भाषिकांच्या उद्धाराचे कार्य केले, ते खऱ्या अर्थाने सीमा भागातील नरशार्दुल होते, असे प्रतिपादन बापूसाहेब पाटील एकंबेकर जीवन चरित्र ग्रंथाचे लेखक डॉ. मारोती कसाब यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, येथील महात्मा फुले महाविद्यालयात कै. बापूसाहेब पाटील एकंबेकर यांच्या तिसाव्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. कसाब बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्रातील ख्यातनाम साहित्यिक, समीक्षक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्व. बापूसाहेब पाटील एकंबेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पुढे बोलतांना डॉ.कसाब म्हणाले की, बापुसाहेब पाटील एकंबेकरांनी आपल्या आमदारकी च्या काळात सीमा भागात विकासाची गंगा आणली आणि कायम दुष्काळी असणाऱ्या या भागाचा विकास केला. असे ही ते म्हणाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपाप्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी बापूसाहेब पाटील एकंबेकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले तर ; आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी मानले. यावेळी प्रो. डॉ. अनिल मुंढे, डॉ. सतीश ससाणे, डॉ. अभिजीत मोरे, डॉ. डी. एन. माने, डॉ. संतोष पाटील, शिवाजी चोपडे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक,कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author