अवैद्य मुरुमाच्या अवजड वाहतूकीमुळे रस्त्याची प्रचंड दुरावस्ता; अवैद्य मुरुम उपसा कायमस्वरुपी थांबवा
साखरा ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामस्थांची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
लातूर (प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील मौजे साखरा – मुरुड अकोला – चिखुर्डा या शिवरस्त्याने सतत अवैद्य मुरुम वाहतूक होत असल्याने रस्त्याची प्रचंड दुरावस्ता झाली आहे व तसेच अवैद्य मुरुम उपसामुळे तलावाचे व संरक्षण भिंतीचे अतोनात नुकसान झाले आहे. सदरील मुरुम माफिया यांची चौकशी करून योग्य ती दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी साखरा ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामस्थांनी दि. 7 रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
अनेक वेळा संबंधीत अधिकार्यांना तक्रार देऊन सुध्दा कसलीही कारवाई केली जात नाही. तसेच शेतकऱ्यांनी उत्पादन केलेला शेतातील माल, शेतातील धान्य साठा, दुध, भाजीपाला इ. बाजारात ने-आण करण्यासाठी जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. याबाबत मुरुम माफिया कडे विचारणा केली असता कत्ती घेऊन अंगावर येणे, मी अधिकाऱ्यांना महिन्याला लाखो रुपये देतो, माझे कुणी काहीही वाकडे करू शकत नाही अशी आर्वाच्य भाषा वारुन उलट सुलट बोलत आहेत.
मौजे साखरा शिवारातील तलावाच्या संरक्षण भिंतीच्या लगत मुरुम उपसा केल्यामुळे संरक्षण भिंत कमकूवत झाली आहे. संरक्षण भिंत फुटून शेती वाहून जाण्याची दाट शक्यता आहे व या तलावावर चार गावांच्या शेतकऱ्यांची शेती अवलंबून आहे व चार गावांना पाणी पुरवठा केला जातो. ती संरक्षण भिंत कोसळली तर अतोनात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी जिल्हाधिकारी मॅडम साहेबांनी संबंधीतावर योग्य ती कार्यवाही करून लवकरात लवकर आम्हा शेतकऱ्यांच्या हक्काचा शिवरस्ता पुर्ववत करुन द्यावा व सदरील मागण्या पूर्ण नाही झाल्या तर दि. 14/08/2023 रोजीपासून आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार आहे.
सदरील निवेदनावर साखरा गावच्या सरपंच सारिका पांडुरंग मोटे, उपसरपंच तुकाराम ग्यादेव गोडसे, शेतकरी मारुती बस्तापुरे, शिवाजी कासले, नामदेव कासले, नरसिंग बस्तापुरे, सुर्यकांत गोडसे, राम कासले, चंद्रकांत गोडसे, शहाजी राव गोडसे, विजयसिंह रोंगे, नारायण देवकते, बिरुदेव देवकते, विद्यादर मस्के, हनुमंत बनसोडे आदी ग्रामस्थ व शेतकरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.