मैनाताई साबणे यांचा संघर्ष आजच्या पीढीसाठी प्रेरणादायक – माजी खा चंद्रकांत खैरे
उदगीर (प्रतिनिधी) : संयुक्त कुटूंब पध्दतीत वावरत शिक्षण घेवून स्वतःच्या पायावर उभे राहत असतानाच शिक्षण, सामाजिक व राजकीय क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी प्राचार्य मैनाताई साबणे यांना मोठा संघर्ष करावा लागला. हा संघर्ष करीत असतानाच त्यांनी आपल्या कुटूंबालाही सांभाळण्याचे काम केले. त्यांचा संघर्ष आजच्या नवीन पीढीतील मुलींसाठी प्रेरणादायक असल्याचे मत संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केले.
उदगीर येथील शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या प्राचार्या मैनाताई साबणे यांच्या संघर्षयात्रा पुस्तकाचे विमोचन माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते रघुकुल मंगल कार्यालयात पार पडले. यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर माजी आ. गोविंद केंद्रे नांदेड येथील प्रसिध्द साहित्यिक देविदास फुलारी, डॉ. हंसराज वैद्य, शिवसेनेचे उध्दव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शिवाजी माने, बालाजी रेड्डी, महिला आघाडीच्या जिल्हा संपर्क प्रमुख संपदा गडकरी, सुनीता चाळक, लेखिका प्राचार्या मैनाताई साबणे, तुकाराम साबणे यांची उपस्थिती होती.
मैनाताई साबणे यांनी आपल्या विचाराशी निष्ठा कायम ठेवत राजकीय क्षेत्रात काम केले असल्याचे सांगत कोणते पद मिळाले म्हणून माणूस मोठा होतो असे नाही. त्यामुळे भविष्यातही मैनाताईनी विचाराची साथ न सोडता आपली वाटचाल चालूच ठेवावी. असे मत व्यक्त करून अलीकडच्या काळात लोकशाही टिकविण्यासाठी साहित्यिकांनी लेखन करण्याची गरजही यावेळी नागराळकर यांनी प्रतिपादित केली.
यावेळी बोलताना माजी खा. खैरे यांनी संयुक्त कुटूंबपध्दतीमुळे मुलांमुलीवर योग्य संस्कार होत असतात, मात्र अलीकडे विभक्त कुटूंबपध्दतीमुळे ते संस्कार होत नसल्याची खंत व्यक्त करून प्राचार्य मैनाताई साबणे यांनी संयुक्त कुटूंबपध्दतीच्या काळात आपल्या लहान मुलीला घरात ठेवून शिक्षकी पेशा सांभाळला. व परत घरी येवून कुटूंबाची सेवा केली. त्या परिस्थितीत त्यांनी केलेला संघर्ष आजच्या पीढीसाठी प्रेरणादायी असाच आहे. प्राचार्या साबणे यांनी राजकारणात काम करीत असताना महिलांच्या प्रश्नावर आवाज उठविण्याचे काम केले असल्याचे सांगितले. आजच्या राजकारणाचा स्तर खूप खालावला जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त करीत आजच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले.
यावेळी बोलताना साहित्यिक देविदास फुलारी यांनी मैनाताई साबणे यांनी आपल्या वागण्यातून माणसे जोडण्याचे काम केले, तर आपल्या कामातून बाणेदारपणा जपला असल्याचे सांगत त्यांनी संघर्षयात्रा या आत्मकथानातून जीवनप्रवास सहजपणे उलगडून दाखविला असल्याचे ते यावेळी म्हणाले. प्राचार्या मैनाताई साबणे यांच्या शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील संघर्ष हा मोठा होता असे सांगत हा संघर्ष त्यांनी अगदी निर्भयपणे केला असल्याचे ते म्हणाले. अतिशय सोप्या भाषेत व आपल्या आयुष्यातील वास्तव बाबींची माहिती मैनाताईनी आपल्या आत्मकथनातून व्यक्त केली असल्याचे यावेळी माजी आ. केंद्रे म्हणाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी राजमाता अहिल्यादेवी होळकर व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय डुणगे यांनी केले. तर आभार प्रदर्शन सचिन साबणे यांनी केले. या कार्यक्रमास महिला पुरुष मोठ्या संख्येनी उपस्थित होते.