हेर येथील ग्रामसेवक मुसळे बाबुराव शंकरराव यांची तात्काळ बदलीची मागणी
हेर (एल.पी.उगीले): हेर ता. उदगीर येथे गेल्या आठ वर्षापासून कार्यरत असलेले ग्रामसेवक मुसळे बाबुराव शंकरराव यांची तात्काळ बदली करावी, म्हणून आठ ग्रामपंचायत सदस्यासह ग्रामस्थांची गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
हेर येथील ग्रामसेवक वेळेवर ग्रामपंचायतला उपस्थित राहत नाहीत. ते लातूरहून येणे जाणे करीत असल्यामुळे वेळेत ग्रामपंचायतला उपस्थित राहत नसतात. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेकांना रोजगार बुडवून आपल्या कामासाठी ग्रामपंचायतला थांबावे लागते. तसेच ते सर्वसामान्य नागरिकांना अरेरावीची भाषा वापरतात, त्यांनी घरकुल, सिंचन विहीर, जनावराचा गोठा या कामासाठी गटविकास अधिकारी यांना पैसे द्यावे लागतात म्हणून सर्वसामान्य नागरिकाडुन सरास पैसे घेतात,असा आरोपही केला जात आहे. मासिक बैठकीमध्ये ग्रामपंचायत सदस्यांना उडवाउडवी ची उत्तरे देतात. व्यवस्थित माहिती देत नाहीत, तसेच ग्रामपंचायतीच्या पंधरावा वित्त आयोग ग्रामनिधी खात्याचा हिशोब व्यवस्थित देत नसतात. तसेच एखाद्या कामाबाबत काम व्यवस्थित झाले नाही किंवा पूर्ण झाले नाही. अशा एजन्सीस बिल आदा करू नका असा सभागृहात ठराव झाल्यानंतर सुद्धा ते मी बिल देणार तुम्ही माझे काय वाकडे करायचे ते करा. असा शब्दप्रयोग वापरतात. म्हणून अशा कामचुकार ग्रामसेवकाची तात्काळ बदली करावी. अशी मागणी आठ ग्रामपंचायत सदस्यासह ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी लातूर, गटविकास अधिकारी पंचायत समिती उदगीर यांच्याकडे केली आहे.