स्वातंत्र्याला ७६ वर्षे पूर्ण झाल्यामुळे गरजू विद्यार्थ्यांना ७६ सायकलींचे वाटप
राज्यातील सामाजिक संघटनांनी ‘आदर्श मैत्री फाउंडेशन’च्या सामाजिक कामाचे अनुकरण करावे – क्रीडा मंत्री संजय बनसोडे
लातूर (प्रतिनिधी) : लातूरच्या आदर्श मैत्री फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचे अनुकरण राज्यातील इतरही सामाजिक संघटनानी करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी केले. ते आदर्श मैत्री फाउंडेशनच्या वतीने आयोजित सायकल वाटप कार्यक्रमात बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम काळे यांची उपस्थिती होती. तर मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे व्यंकट बेद्रे, प्रशांत पाटील, आदर्श मैत्रीचे अध्यक्ष संतोष बिराजदार, रमेश बिरादार, तुकाराम पाटील, बाबुराव जाधव, ओमप्रकाश झुरुळे, अंकुश नाडे यांची उपस्थिती होती.
ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी आजही अनेक किलोमीटर पायी चालत शाळेत जातात. अशा गरीब होतकरू विद्यार्थ्यांचा शोध घेऊन फाउंडेशनच्या सायकल बँक उपक्रमात सायकल दान देण्याचे आवाहन आदर्श मैत्री फाउंडेशनतर्फे करण्यात आले. ज्यात अनेक दानशूर व्यक्तींनी जमेल त्या पद्धतीने सहकार्य केले . ज्यात स्वतः क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनीही आपल्या आईच्या २१ व्या पुण्यतिथी निमित्त २१ सायकल व फौंडेशन चे अध्यक्ष संतोष बिराजदार व संचालकाच्या सहकार्यातून . स्वातंत्र्याला ७६ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ७६ गरजू विद्यार्थ्यांना ७६ सायकलींचे वाटप क्रीडा मंत्री संजय बनसोडे, शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी पुढे बोलताना क्रीडा मंत्री बनसोडे म्हणाले की, आदर्श मैत्री फाउंडेशनचा या उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांच्या जीवनात निश्चितच शैक्षणिक क्रांती येऊ शकेल. त्यामुळे फाउंडेशनच्या वतीने चालणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांचे अनुकरण राज्यातील इतरही सामाजिक संस्थांनी करण्याचे आवाहन केले.तसेच भविष्यात आपल्यालाही फाउंडेशनचा सदस्य संचालक होण्यास आवडेल असे ते यावेळी म्हणाले. शिक्षक आमदार विक्रम काळे म्हणाले की, गरजू विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने मोफत सायकल वाटप करणारी आदर्श मैत्री फाउंडेशन ही बहुधा मराठवाड्यातील पहिली सामाजिक संस्था आहे. मात्र फाउंडेशनने फक्त ७६ सायकल पर्यंतच मर्यादित न राहता हा उपक्रम येत्या काळातही असाच सुरु राहावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
तत्पूर्वी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदर्श मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष बिराजदार यांनी केले. सायकल बँक उपक्रम राबविताना कशा अडचणी यावर प्रकाश टाकला. तसेच उपक्रमावर विश्वास टाकणाऱ्या सर्व दानशूरांचे आभार मानित फाउंडेशनच्या उपक्रमाची माहिती दिली. याप्रसंगी पत्रकार शशिकांत पाटील, उद्योजक तुकाराम पाटील यांची भाषणे झाली. तर गरजू विद्यार्थी आणि शिक्षकांनीही यावेळी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवलिंग नागापुरे सर व शुभांगी राऊत यांनी केले. तर आभार ओमप्रकाश झुरळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सायकल बँकचे समन्वयक प्रमोद भोयरेकर, राजेश मित्तल, संतोष बालगीर यांनी परिश्रम घेतले. यावेळी निलेश राजमाने, सोनू डगवाले, शशिकिरण भिकाने, असिफ शेख, इस्माईल शेख, सुधाकर तोडकर, दासराव शिरुरे, वसंतराव कातळे, श्रावण चव्हाण, अमोल जानते, संभाजी माळी, सूर्यकांत कटारे, संपत जगदाळे, संभाजी माळी, सतीश पवार, महादेव पांडे, नागनाथ आगवाणे, राम स्वामी, संभाजी नवघरे, नरसिंग कातळे, मदन भगत, आदित्य उटगे, आदींची उपस्थिती होती.