ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी 15 सप्टेंबरपासून ‘ज्येष्ठ नागरिक पंधरवडा’चे आयोजन करा-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
लातूर (एल.पी.उगीले) : ज्येष्ठ नागरिक म्हणजे अडगळीची वस्तू म्हणून त्यांना अतिशय वाईट वागनुक दिली जाते, ही अतिशय चुकीची बाब आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हास्तरीय ज्येष्ठ नागरिक समितीच्यावतीने 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत विशेष पंधरवडा आयोजित करून विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मिटिंग हॉलमध्ये झालेल्या जिल्हास्तरीय ज्येष्ठ नागरिक समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, सहायक आयुक्त समाज कल्याण एस. एन. चिकुर्ते, जिल्हा समाज कल्याण अधिकारी एस. टी. नाईकवाडी, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ए. सी. चंडगे यावेळी उपस्थितीत होते.
जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेवून त्यांचा निपटारा करण्यासाठी 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे. यासाठी सर्व संबंधित विभागांची मदत घेवून सूक्ष्म नियोजन करावे. ग्रामीण भागात विशेष ग्रामसभा आयोजित करून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच ज्येष्ठ नागरिकांशी कुटुंबातील व्यक्तींचा सुसंवाद राहील, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी दिल्या.
1 ऑक्टोबर 2023 रोजी लातूर शहर महानगरपालिकेचा आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करावे. तसेच त्यांना आवश्यक साधनांचे वितरण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी 14567 हा टोल फ्री क्रमांक असल्याची माहिती समाज कल्याण सहायक आयुक्त श्री. चिकुर्ते यांनी यावेळी दिली.