शेतक-यांनी सोयाबीन पिकामध्ये सद्यपरिस्थिती यूरिया खताचा वापर टाळावा – कृषीदूतांचा संदेश
उदगीर (एल.पी.उगीले) : कृषि महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा, ता. उदगीर जि. लातूर येथील कृषी पदवीच्या ७ व्या सत्रातील ” ग्रामीण कृषि जागरुकता कार्यानुभव आणि कृषि औद्योगिक संलग्नता २०२३ – २४ या शैक्षणिक उपक्रमांच्या कृषिदुतांनी मौजे अवलकोंडा येथे आयोजित मार्गदर्शनात संबोधित केले की,सद्यपरिस्थिती शेतक-यांनी सोयाबीन पिकामध्ये युरिया खताचा वापर करणे टाळावे. लातूर जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात बहुतांश भागात सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड केलीली आहे. म्हणजेच सध्या सोयाबीन पिक हे 30 ते 35 दिवसाच्या कालावधीचे झालेले आहे.
पेरणीनंतर सर्वत्र सततचा पाउस व ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनच्या शेतामध्ये अतिरिक्त पाणी साचून राहिले आणि त्याचा विपरीत परिणाम होऊन सोयाबीन पिकाची वाढ खुंटलेली आहे. आणि त्याचबरोबर या पिकाची पाने पिवळी पडल्याची समस्या शिवारातील सोयाबीन पिकावर दिसून येत आहे. या अशा समस्येवर तत्कालीन उपाय म्हणून अशा सोयाबीन पिकास युरिया खताची अतिरिक्त मात्रा देण्याच्या मानसिकतेत शेतकरी बांधव आहेत.
कृषी शास्त्रज्ञांच्या अनेक प्रयोगांती सिद्ध केलेल आहे की, एक महिना वयोमानाच्या सोयाबीन पिकामध्ये त्यांच्या मुळांवर गाठी तयार होतात , ज्यामधील रायझोबियम अनुजिवी वातावरणातील नत्र स्थिरीकरण करून पिकासाठी आवश्यक त्या नत्राची उपलब्धता करतात.त्यामुळे , प्राप्त परिस्थितीत सोयाबीन पिकामध्ये नत्रयुक्त युरिया खताचा वापर अयोग्य आहे.
या अनुषंगाने , कृषिदूतांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एकत्रित मार्गदर्शन केले की , युरिया खताचा वापर न करता सोयाबीन पिकाच्या संतुलित वाढीसाठी 19:19:19 या विद्राव्य खताचा वापर / फवारणी ( १ % ) करावी आणि कोवळ्या पानावरील पिवळसरपणा जाणवल्यास दुसऱ्या फवारणीमध्ये फेरस सल्फेट (0.5%) सूक्ष्म अन्नद्रव्यांचा मिसळून फवारणी करावीअसे आवाहन केले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा.अंगदराव सुर्यवंशी , कार्यक्रम समन्वयक डॉ. दिपाली कोकाटे , कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रशांत राठोड आणि विषय विशेषज्ञ प्रा.नवनाथ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदुत अनिकेत चामले, प्रथमेश देशमाने,दिग्विजय चव्हाण,निखिल चव्हाण,जयराज देशमुख,पृथ्वीराज देशमुख,किरण बोये,प्रताप बिरादार,व कृष्णा दळवे या कृषीदितांनी सदरील कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन केले.