अज्ञान काळात सत्य सचोटीची शिकवण देणारे प्रेषित महंमद पैगंबर – डॉ. नीलकंठ पाटील

अज्ञान काळात सत्य सचोटीची शिकवण देणारे प्रेषित महंमद पैगंबर - डॉ. नीलकंठ पाटील

उदगीर (एल.पी.उगीले) : प्रेषित पूर्व काळ हा अज्ञान काळ मानला जायचा. कारण या काळात स्वतः हाताने घडवलेल्या मूर्तीच्या अहंकारामुळे आपआपसात हाणामाऱ्या होऊन अन्याय अत्याचारात वाढ होत होती. त्यामुळे लोक व्यसनी व व्यभिचारी बनून स्वैराचारी वागत होते. अशा काळात लोकांना सत्य, आत्म्याची जाणीव करून देत एकेश्वर वादाची ओळख करून दिली. अशा पद्धतीने मानवतेच्या सचोटीवर उतरणारे विचार देत अज्ञान काळात सत्यसचोटीची शिकवण देणारे प्रेषित महंमद पैगंबर होत असे मत डॉ. नीलकंठ पाटील यांनी व्यक्त केले.
चला कवितेच्या बनात या साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक, व शैक्षणिक चळवळी अंतर्गत च्या 295 व्या वाचक संवाद मध्ये सय्यद इफतिखार अहमद लिखित प्रेषित मुहम्मद पैगंबर नवयुगाचे प्रणेते या साहित्यकृतीवर डॉ. नीळकंठ शंकरराव पाटील यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि प्रभावी वक्तृत्वाने परिपूर्ण असा संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, प्रेषित मुहम्मद पैगंबरांनी जगातील सर्व माणसे एकमेकांचे बंधू आहेत. सकल विश्वाचा स्वामी एकच आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टींच्या गर्व अहंकारात स्वतःचे अधःपतन ओढवून घेऊ नका. देवाने स्वतःची स्वभावना व ज्ञान मानवाला दिल्या मुळे पुन्हा तुमचा कैवार घेण्यासाठी आता कोणीही येणार नाही, त्यामुळे माणुसकीचा व्यवहार करा. कोणाचेही हक्क हिरावून घेऊ नका. वायफळ खर्च टाळा, हत्या करू नका, दिलेले वचन पाळा, ऐटीत मिरवू नका. एकमेकांशी चुरस करत स्वतःचा नाश करून घेऊ नका. असे महत्त्वाचे संदेश दिले आहेत. त्याचे पालन सर्वानीच केले पाहिजे.
यावेळी झालेल्या चर्चेत मोहीब कादरी, सारंग भंडारे, वीरभद्र स्वामी, शेख अहमद, मुरलीधर जाधव, हाश्मी सय्यद, गोविंद सावरगावे आदींनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक द.मा. माने हे होते. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. राजपाल पाटील यांनी केले, तर आभार प्रा. अंतेश्वर चलवा यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी संयोजक अनंत कदम, आनंद बिरादार आणि तुळशीदास बिरादार आदींनी परिश्रम घेतले.

About The Author