शैक्षणिक साक्षरते बरोबरच आर्थिक साक्षरता ही काळाची गरज – अजय शिंदे
अहमदपूर (गोविंद काळे) : महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थी ज्ञानसंपन्न होतो परंतु ते ज्ञान व्यवहारिक नसेल तर ; जीवनात अपयश येते, त्यामुळे शैक्षणिक साक्षरते बरोबरच आर्थिक साक्षरता महत्वाची असल्याचे मत अहमदपूर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखाचे शाखा व्यवस्थापक अजय शिंदे यांनी केले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या सामाजिकशास्त्र विभागांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक शास्त्रे अभ्यास मंडळ उद्घाटन व भित्तीपत्रक प्रकाशन सोहळा प्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील होते.तर विचारमंचावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना अजय शिंदे म्हणाले की, विद्यार्थी जीवनात व्यावहारिक जगतातील आर्थिक घडामोडीचे अवलोकन विद्यार्थ्यांनी करणे आवश्यक आहे. आजच्या डिजिटल युगामध्ये आर्थिक व्यवहार करते वेळेस काळजी घेणे महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते अर्थशास्त्र विषयाच्या ‘अर्थ स्पंदन’, भूगोल विषयाच्या ‘वसुंधरा’, राज्यशास्त्र विषयाच्या ‘सार्वभौमत्व’, इतिहास विषयाच्या ‘संस्कृती’, तत्त्वज्ञान विषयाच्या ‘तत्व प्रकाश’, समाजशास्त्र विषयाच्या ‘संस्कार ‘ व क्रीडा विभागाच्या ‘ध्यानचंद’ या भित्तीपत्रकांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच थोर समाजसेविका मदर तेरेसा यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘जागतिक महिला समानता दिवसा’ निमित्त महाविद्यालयातील महिला प्राध्यापिका डॉ. सौ.एस. बी. उपलवाड, प्रा. प्रतीक्षा मंडोळे, प्रा. कल्पना कदम यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रारंभी मंडले पायल, मंडले वैष्णवी, देशमुख ऋतुजा, कदम ऋतुजा या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपाप्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, सामाजिक शास्त्राच्या अभ्यास मंडळाच्या माध्यमातून जीवनाचे तत्त्वज्ञान, संस्कृतीची ओळख, पर्यावरणाची जनजागृती, व्यक्ती स्वातंत्र्य, सार्वभौमता व स्वातंत्र्याची जाणीव होते. याकरिता विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक दृष्टीने समाजाचे, राष्ट्राचे अवलोकन करून चिकित्सक पद्धतीने विविध अभ्यास मंडळाच्या वतीने तयार करण्यात येणाऱ्या भित्तीपत्रकात मांडणी करावी, असे आवाहन केले. तसेच, ते पुढे बोलतांना म्हणाले की, खरे शिक्षण तेच असते ज्यातून शारीरिक व बौद्धिक विकास होतो आणि त्या शिक्षणातूनच राष्ट्राचा विकास होतो. असे संस्कारा सोबतच जीवनाचे धडे देणारे शिक्षण आमच्या महाविद्यालयात दिले जाते, असे ही ते म्हणाले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूगोल विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. सचिन गर्जे यांनी केले तर प्रास्ताविक उपप्राचार्य तथा अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. दुर्गादास चौधरी यांनी केले व प्रमुख पाहुण्यांचा परिचय भूगोल विभाग प्रमुख डॉ. डी. एन. माने यांनी करून दिला. तर, उपस्थितांचे आभार समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सतीश ससाणे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.