संस्कृत भाषेने माणसाला देवत्व व मनुष्यत्व प्राप्त करून दिले – प्रा. गणेश पेटकार
अहमदपूर (गोविंद काळे) : वैश्विक ज्ञानाचा ज्ञानकोश संस्कृत भाषेतच आहे, कारण याच भाषेने ज्ञान, विज्ञान, संस्कृतीला जन्म दिला असून, आचार – विचार आणि व्यवहारातून माणसाला देवत्व व मनुष्यत्व प्राप्त करून देणारी संस्कृत भाषा आहे, असे स्पष्ट प्रतिपादन चापोली येथील संजीवनी महाविद्यालयातील संस्कृत विभाग प्रमुख प्रा. गणेश पेटकार यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘संस्कृत दिन व शिक्षक दिन ‘ कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर ; विचारमंचावर प्रमुख पाहुणे प्रा. गणेश पेटकार,प्रमुख मार्गदर्शक डॉ.बब्रुवान मोरे, उपप्राचार्य डॉ.दुर्गादास चौधरी यांच्यासह कार्यक्रमाचे संयोजक संस्कृत विभाग प्रमुख डॉ. प्रशांत बिरादार आदींची प्रमुख उपस्थिती होती.या प्रसंगी पुढे बोलतांना प्रा.पेटकार म्हणाले की, माणसाला माणूसपण देणारी भाषा म्हणजे संस्कृत आहे. संस्कृत भाषा ही केवळ भाषा नसून आपली संस्कृती आहे,असे ही ते म्हणाले.
यावेळी डॉ. बब्रुवान मोरे यांनी संस्कृत दिन आणि शिक्षक दिनानिमित्त मार्गदर्शन करतांना म्हणाले की, समाजाचा विकास आणि विनाश शिक्षकांच्या हाती असतो. शिक्षक हाच नव राष्ट्र व नव समाज निर्मितीचा अभियंता आहे, असेही ते म्हणाले. तसेच यावेळी उपप्राचार्य डॉ. चौधरी यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी स्वागतगीताच्या माध्यमातून कु. ऋतुजा देशमुख, कु. वैष्णवी मंडाले आदी विद्यार्थिनींनी स्वागत केले. तसेच, शिक्षक दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी एचडीएफसी बँकेचे कर्ज सल्लागार हुसेन पठाण यांनी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांचा सर्वपल्ली राधाकृष्णन यांची प्रतिमा देऊन सन्मान केला. यावेळी संस्कृत विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘संस्कृती ‘ व इंग्रजी विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘डॅपोडील्स’ या भितीपत्रकाचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांनी म्हणाले की, संस्कृत ही माहिती तंत्रज्ञानाला जन्म देणारी विज्ञाननिष्ट भाषा आहे. संस्कृत भाषेतील वेद,शास्त्र उपनिषदे, पुराण यातूनच खऱ्या अर्थाने औद्योगिक क्रांती झाली व विज्ञानाने विविध क्षेत्रांमध्ये प्रगती केली. तसेच,पुढे बोलतांना म्हणाले की, आचार,विचार, संस्काराची संस्कृत भाषा ही माणसाला सुसंस्कृत बनवणारी भाषा आहे, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागातील ज्येष्ठ प्रोफेसर ह. भ. प.डॉ. अनिल मुंढे महाराज यांनी केले तर ; प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय संस्कृत विभाग प्रमुख डॉ.प्रशांत बिरादार यांनी करून दिला. तर, आभार इंग्रजी विभाग प्रमुख तथा आई. क्यू.ए.सी. चे समन्वयक प्रा. अतिश आकडे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी -विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.