धनगर आणि मुस्लिम समाजात आरक्षण द्या,अन्यथा तीव्र आंदोलन – एम आय एम चा इशारा
उदगीर (एल.पी.उगीले) भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून समता, बंधुता आणि स्वातंत्र्य ही त्रिसूत्री सांगितली आहे. समाजामधील सर्व घटकांना समान न्याय मिळावा, हा उद्देश सफल करण्यासाठी जे घटक कमवत असतील त्यांच्यासाठी विशेष आरक्षण ठेवले जावे. अशीही भावना त्यांनी व्यक्त केली होती. त्या भावनेचा आदर करून सामाजिक न्याय प्रस्थापित करून, सामाजिक समता निर्माण करण्यासाठी समाजातील मागास ठरत असलेल्या तसेच आर्थिक दृष्ट्या अत्यंत दुर्बल असलेल्या मुस्लिम आणि धनगर समाजाला महाराष्ट्र शासनाने आरक्षण देऊन विकासाच्या प्रवाहात घ्यावे, अशी आग्रही मागणी राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा एम आय एम चे मराठवाडा विभागीय सरचिटणीस, माजी नियोजन सभापती निवृत्तीराव सांगवे यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांना या आशयाचे निवेदन देऊन धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळवून द्यावे. अशी आग्रही मागणी केली आहे.
मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाचा अभाव असल्यामुळे लहान लहान मुले छोट्या-मोठ्या उद्योगाकडे लगेच वळू लागले आहेत, अज्ञानातून दारिद्र्य आणि दारिद्र्यातून अज्ञान अशा दृष्ट चक्रात सापडलेल्या या समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण आणि शैक्षणिक सुविधा मिळवून देणे अत्यंत आवश्यक आहे. गेल्या कित्येक वर्षापासून धनगर समाजाच्या आरक्षणाची ही मागणी शासन दरबारी धुळखात पडली आहे. त्या मागणीचा ही सहानुभूतीपूर्वक विचार करून तात्काळ आरक्षण द्यावे. अन्यथा ए आय एम आय एम च्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करावे लागेल. असा इशाराही पॅंथर नेते निवृत्तीराव सांगवे यांनी दिला आहे. महाराष्ट्राचे मंत्री संजय बनसोडे यांना निवेदन देताना राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे महाराष्ट्र अध्यक्ष तसेच एआयएमआयएमचे मराठवाडा सरचिटणीस निवृत्तीराव सांगवे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख हमीद, मुक्रम भाई जागीरदार, रवी जवळे,रोटी कपडा नियोजन कमिटीचे शेख समीर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सदरील आशयाच्या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच लातूरचे जिल्हाधिकारी उदगीरचे उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासन आणि प्रशासनाला देण्यात आले असल्याचेही माहिती निवृत्तीराव सांगवे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली आहे.