श्रीकृष्ण भगवंताच्या सेवेतूनच सुख समाधान प्राप्त होते – एच.जी.बलदेव प्रभु
अहमदपूर (गोविंद काळे) : भगवान श्रीकृष्णांचा जन्मदिवस देशात व विदेशात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो भारतात व विदेशात अनेक कृष्ण मंदिरे आहेत येथे हजारो भाविक नित्यनियमाने दर्शनाला येत असतात इस्कॉन (आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ) मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो आज अहमदपूर येथेही अशाच पद्धतीने श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. आज झालेल्या कार्यक्रमात सकाळच्या सत्रात मंगल आरती, संकीर्तन, अभिषेक तसेच दुपारच्या सत्रात बलदेव प्रभू इस्कॉन चौपाटी, मुंबई यांचे प्रवचन झाले व सांस्कृतिक कार्यक्रम, महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमाद्वारे ” हरे कृष्ण ” महामंत्राच्या सूर तालात विराज गार्डन, अहमदपूर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव संपन्न झाला.
एच. जी. बलदेव प्रभू (इस्कॉन चौपाटी, मुंबई) यांनी आपल्या प्रवचनात भक्तांना मार्गदर्शन करताना सांगितले की सर्व भौतिक गोष्टी प्राप्त झाल्या तरी मनुष्याच्या मनाला शांती नाही सगळे मिळाले तरीही अडचण व काही मिळाले नाही तरीही अडचण आहेच . माणसाला सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त करता येते पण सुख समाधान हे भगवंताच्या सेवेतूनच प्राप्त होते. पाच हजार वर्षांपूर्वी भगवान कृष्णाचा जन्म झाला तरी आज आपण कृष्णजन्माष्टमी साजरा करतो कारण कृष्ण भगवान हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत ज्या घरात भगवान आहेत ते भवन आहे ज्या घरात भगवान नाहीत त्या घराचे नाव भवन असूच शकत नाही भवन मधील “भ” म्हणजेच भगवंत आहेत . श्रीकृष्णभगवान यांची सेवा व हरिनाम संकीर्तन याचे जीवनात अनुकरण केले पाहिजे व मनुष्य जन्माचा मूळ उद्देश साध्य करायला पाहिजे यासाठी त्यांनी वेगवेगळी उदाहरणे दिली. पाच हजार वर्षांपूर्वी लिहिलेली भगवद्गीता यात बदल झालेले नाही कारण ती अप टू डेट आहे म्हणून अपडेट करायची गरज नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले. जन्माष्टमीनिमित्त अहमदपूर तालुक्यातील विविध ठिकाणावरून भाविकभक्त आले होते तसेच नांदेड, लातूर, उदगीर व शेखराजुर येथूनही आवर्जून आलेल्या भक्तगणांचे इस्कॉन संयोजन समितीतर्फे तीन वेळा “हरी बोल” म्हणून स्वागत करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अधोक्षजकृष्ण प्रभू (डॉ. अमोल पागे) यांच्या मार्गदर्शनाखाली इस्कॉन संयोजन समिती, अहमदपूर यांनी विशेष परिश्रम घेतले.