‘क्रांतिशाली लातूर’ चित्ररथाला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांनी दाखवली हिरवी झेंडी
लातूर (एल.पी.उगीले) : मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यातील महसूल मंडळांच्या गावांमध्ये चित्ररथाद्वारे मुक्तिसंग्रामाचा जागर होणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने तयार केलेल्या ‘क्रांतिशाली लातूर’ या चित्ररथाला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे हिरवी झेंडी दाखवली.अपर जिल्हाधिकारी सुनील यादव, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुचिता शिंदे, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, संगीता टकले, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका कांबळे, जिल्हा नियोजन अधिकारी एम. एस. दुशिंग, नगरपालिका प्रशासनचे सहायक आयुक्त रामदास कोकरे यांची उपस्थिती होती. जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले.मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहे. या अंतर्गत मुक्तिसंग्रामावर आधारित चित्ररथाची निर्मिती करण्यात आली असून हा चित्ररथ जिल्ह्यातील महसूल मंडळांच्या गावांमध्ये जाणार आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा लढ्यावर आधारित चित्रफित ह्या चित्ररथाद्वारे दाखविण्यात येणार आहे.