ॲड.निवृत्तीराव रेड्डी यांचे हैदराबाद मुक्ती संग्रामात अविस्मरणीय योगदान

ॲड.निवृत्तीराव रेड्डी यांचे हैदराबाद मुक्ती संग्रामात अविस्मरणीय योगदान

अहमदपूर (गोविंद काळे) : अॅड निवृत्ती रेड्डी यांनी निजाम राजवटीत उमरगा येथे तहसीलदार पदावर कार्यरत असताना निजामच्या जुलमी शेतसारा वसुलीचे धोरण, रझाकार संघटनेचा अन्याय,अत्याचार या विरोधात बंड करत तहसीलदार पदाचा राजीनामा देऊन मराठवाडा मुक्ती संग्रामात उडी घेतली व समाजाला संघटित करून सशस्र निकराने लढा दिला त्यामुळे त्यांचे हे योगदान अविस्मरणीय आहे असे उद्गार प्रा.डॉ जयद्रथ जाधव यांनी काढले.ते मराठवाडा मुक्ती संग्राम व क्रांतिवीर ऍड निवृत्ती रेड्डी या विषयावर आयोजित कार्यक्रमात ज्ञानदीप अकॅडमी अहमदपूर येथे बोलत होते.व्यापीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष उध्दवराव इप्पर,प्रमुख पाहूणे मनसे जिल्हाध्यक्ष डॉ.नरसिंह भिकाणे,क्रांतिवीर निवृत्ती रेड्डी यांचे सुपुत्र राजेंद्र रेड्डी,नरेंद्र रेड्डी,प्रेमकलाबाई भिकाणे,आशाताई रेड्डी, मनसेचे शहराध्यक्ष उमेश रेड्डी,मनवीसे जिल्हासंघटक डॉ यश भिकाणे आदी उपस्थित होते.पुढे बोलताना ते म्हणाले की ॲड.निवृत्ती रेड्डी यांनी त्याकाळात प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत उस्मानिया विद्यापीठात कायद्याची पदवी घेतली,त्यांना शासकीय नौकरी ही लागली परंतु त्यात न रमता त्यांनी निजामी राजवटीच्या विरोधात अहमदपूर येथे स्वातंत्र्य सैनिकांच्या गुप्त बैठका घेणे, रोकडा सावरगाव,वडवळ , नळेगाव या गावी निजामा विरोधात झेंडे जाळून घोषणाबाजी करणे असे अनेक कार्यक्रम सदोदित घेतले त्यामुळे निजामाने त्यांना अकरा महिने जेल केली.मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की ऍड निवृत्ती रेड्डी यांना जेलमध्ये लोखंडी काटेरी पिंजऱ्यात चोवीस तास उभे केले जायचे,ते थोडेही हलले की रक्ताच्या धारा पडायच्या. वेगवेगळ्या प्रकारे त्यांचा निर्दयपणे छळ केला जायचा.एवढे कमी की काय म्हणून रक्तबंबाळ झालेल्या ऍड रेड्डी यांना जेवण म्हणून सिमेंट मिश्रित भाकरी खायला दिल्या जायच्या, त्यामुळे त्यांचे दातही पडले होते.ते मृत्यू समीप पोहचले होते परंतु भारत सरकारच्या पोलिस ॲक्शने त्यांची सुटका झाली व नंतर अहमदपूरला हत्तीवरून भव्य मिरवणूकही काढण्यात आली.१९५२ च्या निवडणुकीत अहमदपूर तालुक्याचे ते पहिले आमदार झाले व या माध्यमातून त्यांनी सामाजिक,शैक्षणिक आर्थिक उन्नतीत मोठे योगदान दिल्याचे डॉ भिकाणे यांनी सांगितले.या कार्यक्रमाचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हासंघटक डॉ यश भिकाणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजय तुपकर,अतिष गायकवाड,चंद्रकांत सांगुळे,प्रमोद नारागुडे, व्यंकट कदम, नितीन गायकवाड, व्यंकट तुपकर, बालाजी दौंडगावे, गोविंद तेलंगे, बाळासाहेब आढाव, पुंडलिक पवळे आदींसह मनसे कार्यकर्त्यांनी परिश्रम केले.

About The Author