मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मारक प्रवेशद्वारासाठी ९७ लक्ष ७८ हजार रु. निधी मंजूर – संजय बनसोडे
उदगीर (एल.पी.उगीले) : स्वातंत्र्यपूर्व काळात मराठवाडा हा हैद्राबाद संस्थानचा एक भाग होता. मराठवाड्याच्या जनतेला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी हैद्राबादच्या निजामाविरोधात दीर्घ लढा द्यावा लागला. दि.१७ स्प्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा मुक्त झाला. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत वर्षानिमित्त दि. १७ सप्टेंबर २०२२ पासून राज्य शासनार्फत मराठवाडयात विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबविण्यात येत आहेत. मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मौ. तोंडचिर (रामघाट), ता. उदगीर जि. लातूर येथे मराठवाडा मुक्तीसंग्रामात हौतात्म्य पत्करलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ प्रवेशद्वार उभारण्यासाठी उदगीरचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी पुढाकार घेवुन प्रवेशव्दारासाठी निधीची मागणी केली होती. शासनाने त्यांच्या या मागणीचा विचार करुन मतदार संघातील तोंडचिर (रामघाट) येथील हुतात्मा स्मारकाच्या प्रवेशद्वार बांधकामासाठी ९७ लक्ष ७८ हजार रुपयाचा निधी मंजुर केला असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम हा स्वातंत्र्य लढ्याचा धगधगता इतिहास आहे. या लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे शौर्य आणि धाडस हे अवर्णनीय आहे. त्यामुळे हा लढा नव्या पिढीपर्यंत पोहोचणे काळाची गरज असुन तोंडचिर (रामघाट) येथे हुतात्मा स्मारकाच्या प्रवेशद्वाराचे बांधकाम हे मराठवाडा मुक्तीसंग्रामात हौतात्म्य पत्करलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ बांधण्यात येणार असुन यामुळे आपल्या पुढच्या पिढीला प्रेरणा मिळेल. अशी अपेक्षा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केली आहे.