अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघासाठी ३५० ते ४०० कोटींच्या विकासकामांची होणार घोषणा – आ. बाबासाहेब पाटील

अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघासाठी ३५० ते ४०० कोटींच्या विकासकामांची होणार घोषणा - आ. बाबासाहेब पाटील

अहमदपूर (गोविंद काळे) : १७ सप्टेंबर रोजी साजरा होत असलेल्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने अहमदपूर – चाकूर विधानसभा मतदारसंघासाठी विविध घोषणा करण्यात येणार आहे. यामध्ये अंदाजे ३५० ते ४०० कोटींच्या विकासकामांची घोषणा होणार असल्याची माहिती आमदार बाबासाहेब पाटील यांनी प्रसिद्धी पत्रिकाद्वारे दिली.

अहमदपूर तालुक्यातील मानार नदीवरील ९ कोल्हापूर बंधाऱ्यांच्या सर्वच कामाचे विशेष दुरुस्ती अंदाज पत्रकास प्रशासकीय मान्यता, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत अहमदपूर भुयारी गटार योजनेच्या सविस्तर प्रकल्प अहवालास मान्यता, अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील अहमदपूर व शिरुर ताजबंद बसस्थानक बांधकामास निधी, अहमदपुर व चाकूर येथे ट्रामा केअर सेंटर सुरु करणे, चाकूर येथे औद्योगिक क्षेत्र निर्माण करणे, किनगांव येथील ग्रामीण रुग्णालयास मंजुरी मिळेल, अशी माहिती आमदार पाटील यांनी दिली आहे.

उपरोक्त विकासकामांसाठी आमदार बाबासाहेब पाटील यांनी शासन दरबारी पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून मतदारसंघात भरघोस निधी उपलब्ध होणार आहे. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा या प्रामाणिक हेतूने मी सत्तेत सहभागी झालो. विकासकामे सर्वोच्च स्थानी ठेवून मतदारसंघाच्या विकासात कुठलाही अनुशेष राहू देणार नाही, असे मत यानिमित्ताने आमदार बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.

About The Author