निजामाची विक्षिप्त, धूर्त, कटकारस्थानी आणि जुलमी राजवट होती – डॉ. भूषणकुमार जोरगुलवार

निजामाची विक्षिप्त, धूर्त, कटकारस्थानी आणि जुलमी राजवट होती - डॉ. भूषणकुमार जोरगुलवार

अहमदपूर (गोविंद काळे) : निजाम राजवटीचा संस्थापक शहाबुद्दिन ने पराभवाच्या मालिकेतून हैदराबाद संस्थानाची निर्मिती केली. त्यामुळे निजामांची राजवट नेहमीच विक्षिप्त, पातळयंत्री, कटकारस्थानी व जुलमी राहिल्याचे दिसून येते,असे स्पष्ट प्रतिपादन महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. भूषणकुमार जोरगुलवार यांनी केले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयात इतिहास विभाग, सम्राट मित्र मंडळ लातूर व अहमदपूर व नगरपरिषद अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी व्याख्यान ‘ कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील होते तर , विचार मंचावर उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर, पोलीस निरीक्षक सुधाकर देडे, नगरपरिषद अहमदपूरचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, सम्राट मित्र मंडळाचे अध्यक्ष व या कार्यक्रमाचे संकल्पक डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, इतिहास विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी पुढे बोलतांना डॉ. भूषणकुमार जोरगुलवार म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याच्या सत्याग्रही आणि सशस्त्र आंदोलना पेक्षाही अधिक तीव्रता हैदराबाद मुक्तिसंग्रामामध्ये होती. तरी पण द्रव्य लोभी निजाम भारतीय स्वातंत्र्यानंतर ही एक वर्ष स्वतंत्र राष्ट्र निर्मितीची मागणी समोर करून लढत राहिला. या जुलमी राजवटीला उलथून टाकण्याचे कार्य महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सहकार्यातून स्वामी रामानंद तीर्थ, गोविंद भाई सराफ, अनंतराव भालेराव या ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानींनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले, असे ही ते म्हणाले.

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त इतिहास विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘ संस्कृती’, इंग्रजी विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘डॅपोडील्स’ राज्यशास्त्र विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘सार्वभौमत्व ‘ अर्थशास्त्र विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘अर्थस्पंदन ‘ या भितीपत्रकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर, पोलीस निरीक्षक सुधाकर देडे, डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांनी ही आपल्या मनोगतातून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी हैदराबाद संस्थानात मराठवाडा, तेलंगणा आणि कर्नाटकाचा काही भाग होता. तो १३महिन्याच्या संघर्षातून मुक्त झाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी एक समिती नेमली. व मराठवाड्यातरा एक मोठा जिल्हा म्हणून औरंगाबाद येथे १७सप्टेंबर रोजी झेंडावंदन करून मराठवाडा मुक्ती दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. मराठवाडा हैदराबाद संस्थानातून मुक्त झाला पण मराठवाड्याचा विकास झाला का?हा खरा प्रश्न असून त्यासाठी व मराठवाड्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी स्वतंत्र मराठवाडा राज्याच्या निर्मितीची आवश्यकता असल्याचे म्हटले. तसेच, पुढे बोलतांना ते म्हणाले की, मराठवाडा स्वतंत्र झाला हे खरे पण स्वतंत्र मराठवाड्यासाठी आपले प्रयत्न कमी पडत आहेत असे म्हणून राज्य निर्मितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर,भाई केशवराव धोंडगे, श्रीहरी अणे, शरद जोशी, माधवराव चितळे, डॉ. सुनील गायकवाड,विजया रहाटकर, ॲड. गुणरत्न सदावर्ते आदींनी केलेल्या प्रत्नांचा आढावाही घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले तर ; सूत्रसंचालन मराठी विभागातील ज्येष्ठ प्रोफेसर ह. भ.प .डॉ.अनिल मुंढे यांनी केले व आभार आई क्यू ए सी चे समन्वयक तथा इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. अतिश आकडे यांनी मानले. यावेळी नगरपरिषद अहमदपूर येथील कर्मचारी, अहमदपूर शहरातील नागरिक, महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author