विशाखा समितीच्या वतीने कायदे विषयक मार्गदर्शन शिबीर.
उदगीर (प्रतिनिधी): तालुक्यातील एकुर्का रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विशाखा समितीच्या वतीने कायदे विषयक मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले.
अध्यक्षस्थानी संस्थासचिव प्राचार्य प्रमोद चौधरी उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून परभणी येथील दिवाणी न्यायाधीश तथा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मेहताब वाडीवाले, उदगीर येथील महिला वकील संघाच्या उपाध्यक्षा ॲड. रुक्मिणी सोनकांबळे, देवणी महिला वकील संघाच्या सहसचिव ॲड. पुनम टाकळे, संस्था सहसचिव प्रणयन प्रमोद चौधरी, पर्यवेक्षक सिद्धार्थ बोडके, धनंजय नरवाडे, बालाजी बाबळसुरे, रसूल पठाण आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना न्यायाधीश मेहताब वाडीवाले म्हणाले, मुलींसाठी शासनाने स्वतंत्र कायदे केले आहेत. या कायद्यान्वये मुलींना संरक्षण व न्याय मिळण्यास मदत होणार आहे. तेंव्हा न घाबरता गुड टच व बॅड टच या विषयी आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगता आले पाहिजे. तसेच शिक्षणाने माणूस प्रगल्भ व सक्षम बनत असल्याने मुलींनी शिक्षण घेऊन आत्मनिर्भर व्हावे. असा सल्ला दिला. विधिज्ञ रुक्मिणी सोनकांबळे यांनी मुलींना पोस्को कायदे विषयक जागृती केली. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य प्रमोद चौधरी म्हणाले, ग्रामीण भागातील मुलीत आत्मविश्वास निर्माण करून समाजात ताठ मानेने उभे राहण्यासाठी आमची शाळा सदैव प्रयत्नशील असते. म्हणून विशाखा समितीच्या वतीने कायदे विषयक जन-जागृती शिबीर घेण्यात येत आहे. यावेळी विविध मैदानी व सांघिक खेळात जिल्हा व तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत प्रथम आलेल्या मुलांना सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रास्ताविक विशाखा समिती समन्वयक अमर जाधव यांनी केले. माया जाधव हिने सूत्रसंचालन केले तर मोनिका भालके हिने आभार मानले.