स्वामी विवेकानंद विवेकवादी संत होते – प्रा.मॅक्सवेल लोपीस

स्वामी विवेकानंद विवेकवादी संत होते - प्रा.मॅक्सवेल लोपीस

उदगीर (प्रतिनिधी)
स्वामी विवेकानंद कुठल्याही गोष्टीवर पारखल्याशिवाय विश्वास ठेवत नव्हते. एखाद्या गोष्टीची खात्री झाल्यावरच किंवा सत्यता तपासून घेतल्यावरच ते त्यावर विश्वास ठेवायचे. म्हणून स्वामी विवेकानंद हे खऱ्या अर्थाने विवेकवादी संत होते असे विचार प्रा.मॅक्सवेल लोपीस यांनी व्यक्त केले.
उदगीर येथील वाचक संवाद अंतर्गत वसई येथील संत साहित्य व शास्त्रीय संगीताचे अभ्यासक प्रा. मॅक्सवेल लोपीस यांनी २९७ वे पुष्प गुंफले. सत्येंद्रनाथ मुजुमदार यांनी लिहिलेले स्वामी विवेकानंद यांचे चरित्र या ग्रंथावर त्यांनी मार्गदर्शन केले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.गोपाळराव पाटील हे होते.पुढे बोलताना प्रा.लोपीस म्हणाले,वैराग्य, ज्ञान, त्याग व भक्ती याचा सुंदर समन्वय स्वामी विवेकानंद यांच्या जीवनात झालेला होता.
त्याकाळात भारतीय संस्कृतीचा परिचय जगाला स्वामी विवेकानंदांनी करून दिला. अलौकिक प्रतिभा, ज्ञानसाधना, भ्रमंती व मेहनत याचे मिश्रण म्हणजेच स्वामी विवेकानंद होत. आपल्या जीवनात स्वामी विवेकानंदांनी भक्ती, ज्ञान व कर्म याचा सुरेख समन्वय साधला. सुख दुःखाला आपण समतुल्य मानायला हवे, ही शिकवण त्यांनी दिली. असे सांगत स्वामी विवेकानंदांची जडणघडण, गुरुपरंपरा, प्रेरणा व त्यांच्या जीवनातील विविध प्रसंग वेगवेगळ्या उदाहरणासह भाष्य करत श्रोत्यांना अंतर्मुख केले. त्याबरोबरच श्रोत्यातून विचारले गेलेल्या प्रश्नालाही त्यांनी समाधानकारक उत्तर दिले.
अध्यक्षीय समारोपात प्रा. गोपाळराव पाटील म्हणाले,समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे गरजेचे आहे. स्वामी विवेकानंद सारख्या इतर अनेक संतांनी वैज्ञानिक जनजागृती केली, परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष केलो. अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनंत कदम, प्रा.राजपाल पाटील आदींनी प्रयत्न केले. कार्यक्रमास पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.म.ई. तंगावार तर आभार कु.अंकिता ढगे यांनी मानले.

About The Author