लिहिणे आणि बोलणे ही आजच्या काळाची खूप मोठी गरज : डॉ. रणजित जाधव
उदगीर (एल.पी.उगीले)
महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थी अभ्यास मंडळाचे अनन्यसाधारण महत्त्व असते. विद्यार्थी दशेतील हे महत्त्वाचे व्यासपीठ असते. या व्यासपीठावर विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांचा विकास होतो. या संधीचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या साहित्याचा अभ्यास करून आपल्या अभिव्यक्ती क्षमतेचा विकास करावा. कारण लिहिणे व बोलणे ही आजच्या काळाची खूप मोठी गरज आहे. असे मत डॉ. रणजित जाधव यांनी व्यक्त केले. ते शिवाजी महाविद्यालय, उदगीरच्या हिंदी विभागाच्या वतीने हिंदी सप्ताहाचा समारोप समारंभ व हिंदी अभ्यास मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-प्राचार्य डॉ. ए.एम. नवले होते. याप्रसंगी उप-प्राचार्य डॉ. आर.एम. मांजरे, सिनेट सदस्य डॉ. व्ही.एम. पवार, विभागप्रमुख डॉ. व्ही.के. भालेराव, प्रा. बालाजी सूर्यवंशी, डॉ. प्रणिता पाटील, प्रा. सविता साळवे, प्रा. अनंत पाटील इत्यादींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. जाधव यांनी हिंदी दिवस, हिंदी भाषेचे महत्व, नवीन शैक्षणिक धोरणात स्वभाषांचे महत्त्व, हिंदीमध्ये रोजगारांच्या संधी इत्यादी विषयांवर प्रकाश टाकला. डॉ. ए.एम.नवले यांनी हिंदी ही सर्वात सहज, सुंदर भाषा असल्याचे सांगून तिचा सर्वांनी सन्मान करावा ही भावना व्यक्त केली.
डॉ. व्ही. के. भालेराव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. अतार मुस्कान या विद्यार्थिनीने संचलन तर कदम साक्षी हिने आभार मानले. याप्रसंगी विद्यार्थांनी बनविलेल्या “साहित्य दर्पण” या भितीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले, तसेच निबंध व काव्यलेखन स्पर्धेतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी डॉ एस व्ही शिंदे, डॉ एस एम कोनाळे व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.