साठोत्तरी स्त्रियांच्या साहित्यातून विद्रोहाचे चित्रण आलेले आहे – प्रा. प्रतिमा परदेशी

साठोत्तरी स्त्रियांच्या साहित्यातून विद्रोहाचे चित्रण आलेले आहे - प्रा. प्रतिमा परदेशी

अहमदपूर (गोविंद काळे) : मध्ययुगीन काळात संत जनाबाईंनी आपल्या अभंगांतून स्त्रियांची दुःखं मांडली.आधुनिक काळात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, मुक्ता साळवे, सावित्रीबाई रोडे, ताराबाई शिंदे आदींनी आपल्या साहित्यातून विषमतेवर प्रहार करत समतेची मागणी केली. याच बंडखोर प्रेरणेतून पुढे साठोत्तरी मराठी स्त्रीवादी साहित्याचा स्वतंत्र प्रवाह निर्माण झाला. या प्रवाहातील स्त्रियांच्या साहित्यातूनच खऱ्या अर्थाने विद्रोहाचे चित्रण झालेले आहे, असे प्रतिपादन सत्यशोधक विचारवंत, विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी यांनी केले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि मराठी विभाग, महात्मा फुले महाविद्यालय, अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्रात बीज भाषक म्हणून त्या बोलत होत्या. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध लेखक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते. तर उद्घाटक म्हणून धाराशिव येथील तेरणा महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगरचे माजी अधिष्ठाता डॉ. भारत हंडीबाग हे उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना प्रा. प्रतिमा परदेशी म्हणाल्या की, अजूनही स्त्रियांचे शोषण विविध पातळ्यांवर होत असून, या शोषणाविरुद्ध तसेच जात वर्ग भांडवली व्यवस्थेविरुद्ध स्त्रियांनी आपल्या लेखणीतून यल्गार पुकारला पाहिजे. स्त्रियांनी आपल्या लेखणीतून सडेतोडपणे विचार मांडले पाहिजेत, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

या चर्चासत्रातील शोधनिबंध वाचनसत्राचे अध्यक्षस्थान मुंबई विद्यापीठातील मराठीच्या प्राध्यापक तथा ज्येष्ठ लोककला अभ्यासक, संशोधक प्रा. डॉ. श्यामल गरुड यांनी भूषविले. आपल्या भाषणात त्यांनी भारतीय स्त्रियांची सोशिकता हीच त्यांच्या दमनाला कारणीभूत असून स्त्रियांनी आपल्या भावभावनांची कोंडी न करता मुक्तपणे व्यक्त व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या चर्चासत्रात मुरुड येथील शिवाजी महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ .मनीषा झोंबाडे व कोसबाड टेकडी, डहाणू येथील डॉ . शशिकला पोतनीस कला वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अंजली सामंत यांनी अभ्यासपूर्ण शोध निबंधांचे वाचन केले. अध्यक्षीय समारोपात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी एकंदरीत मराठी साहित्यातील स्त्रियांच्या लेखनाचा आढावा घेत, साठोत्तरी काळातील लेखनाचे विशेष सांगितले. तसेच स्त्रीवादी लेखनाची गरजही त्यांनी आपल्या भाषणात प्रतिपादन केली. यावेळी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व सचिव यांच्या शुभेच्छा संदेशांचे वाचन हिंदी विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले. चर्चासत्राचे प्रास्ताविक संयोजक डॉ. मारोती कसाब यांनी केले. सूत्रसंचालन सहसंयोजक प्रोफेसर डॉ. अनिल मुंढे यांनी केले, तर आभार मराठी विभागाची विद्यार्थिनी क्रांती राठोड हिने मानले. गुगलमीटवर झालेल्या या राष्ट्रीय चर्चासत्रात देशभरातून दोनशेहून अधिक संशोधक, अभ्यासक, विद्यार्थी, प्राध्यापक सहभागी झाले होते.

About The Author