भाजपा ग्रामविकास व पंचायतराजच्या विभागीय संयोजकपदी किशन धुळशेट्टे यांची नियुक्ती
लातूर (एल.पी.उगीले) : भारतीय जनता पार्टीकडून सध्या विविध विभागाच्या पदाधिकारी निवडी सुरू आहेत. त्यामुळे, तळागळातील कार्यकर्त्यांना विभागीय तथा प्रदेश पातळीवर काम करण्याची संधी मिळत आहे. त्यानुसार, जळकोटचे माजी नगराध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व भारतीय अन्न सुरक्षा महामंडळाचे सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, किशन गुरुजी धुळशेट्टे यांची भाजपा ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या दक्षिण मराठवाडा ( जालना, बीड, धाराशिव, लातूर ) संयोजक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
साध्या आणि सरळ स्वभावाचे आणि जनमानसात रमणारे नेते अशी ओळख असलेले, शिक्षकी पेशातून स्वेच्छा निवृत्ती घेत राजकारणातून समाजकारण करताना प्रत्येक घटकाला सोबत घेऊन चालनाऱ्या गुरुजींची झालेली निवड अतिशय सार्थ असून, त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे. त्यांनी याअगोदर, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव आणि भाजपा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत पक्षाचा विचार ग्रामीण भागात पोहचविले आहेत.
भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने किशन गुरुजी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदरील विभागाचे प्रदेश संयोजक गणेशकाका जगताप यांनी तसे नियुक्ती पत्र दिले आहे. सदरील निवड प्रक्रियेत पंचायतराजचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष चौधरी, आ. मेघनाताई बोर्डीकर, भाजपाचे मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे यांची महत्वाची भूमिका आहे.
भाजपाच्या पंचायतराज व ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून रेशनिग, रोजगार हमी, बचत गट, बँकिंग, विद्युत, पाणी, व्यापार, कृषी,पर्यटन, शिक्षण, क्रिडा, वने, तीर्थक्षेत्र, आरोग्य, आणि प्रशासन आदी विषयावर आधारित रणनीती आखली जाणार असुन शासनाच्या योजना थेट सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. विविध भागात काम करण्याची संधी मिळाली असल्याने, किशन गुरुजी सदरील पदाला योग्य न्याय देतील. अशी अपेक्षा जळकोट तालुक्यांतील जनतेची आहे. त्यांची आज पर्यंतची सकारात्मक आणि लोकाभिमुख ठरलेली कार्यपद्धती पाहता मिळालेल्या संधीचे ते नक्की सोने करतील, अशा प्रकारच्या आपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.