आनंददान हेच सर्वश्रेष्ठ दान – प्रा. प्रसाद महाराज जालनापुरकर
उदगीर (प्रतिनिधी) : कलीयुगामध्ये अन्नदान, रक्तदान, ज्ञानदानापेक्षा देखील मौलिक दान आनंददान आहे. त्यामुळे इतरांच्या आनंदाचे कारण व्हा, तुमच्या आनंदाची काळजी भगवंत घेईल. आनंद घेण्याची नाही तर देण्याची गोष्ट आहे, असे मत प्रा. प्रसाद महाराज जालनापुरकर यांनी व्यक्त केले. ते संस्कार भारती शाखा उदगीरच्या वतीने डॉ. संजय कुलकर्णी यांच्या निवासस्थानी आयोजित मासिक सभेमध्ये गीतेवरील प्रवचनादरम्यान बोलत होते. यावेळी संस्कार भारती उदगीर शाखेचे अध्यक्ष सतीश उस्तुरे अध्यक्षस्थानी होते. पुढे बोलताना जालनापुरकर महाराज म्हणाले, अध्यात्मात फायदा, तोटा पहायचा नसतो. अध्यात्मामध्ये श्रद्धा महत्वाची असते. अध्यात्म म्हणजे आनंद. सुख-दुःखाच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी अध्यात्म महत्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येक माणसाने शुद्ध भाव व श्रद्धा ठेवून भगवंताची आराधना करावी. भगवंताकडे स्वतःसाठी काहीही मागू नये, आणि मागायचेच असेल तर इतरांसाठी मागावे. समाजातील इतरांच्या आनंदाचे कारण होण्यासाठी अध्यात्मिक ज्ञान महत्त्वाचे आहे. कलियुगातील मायावी भवसागरातून तरुण जाण्यासाठी अध्यात्माकडे शक्य तेवढ्या लवकर वळावे, असे आवाहन उपस्थितांना केले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. मुकेश कुलकर्णी, गोपाळ जोशी गुरुजी, मृगेंद्र कुलकर्णी, वेद पाटील यांनी संस्कार भारती ध्येयगीत सादर करून केली. डॉ. संजय कुलकर्णी व डॉ. दीपा कुलकर्णी यांच्या वतीने प्रा. प्रसाद महाराज जालनापुरकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रा. महादेव खताळ यांनी मानले. यावेळी संस्कार भारतीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.