मुस्लिम आरक्षण मागणीला एमआयएमचा पाठिंबा
उदगीर (प्रतिनिधी) : गेल्या 13 दिवसापासून दारिद्र रेषेखाली जगणाऱ्या मुस्लिम समाजाला आरक्षण मागणीसाठीच्या दलित पॅंथर चे प्रदेश उपाध्यक्ष तथा नगरपालिकेचे माजी सभापती निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उदगीरात एमआयएमच्या वतीने चौबारा ते तहसील कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढून उपजिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
तहसील कार्यालय समोर भारतीय दलित पॅंथरचे प्रदेश उपाध्यक्ष निवृत्ती सोनकांबळे यांच्या मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी १८ सप्टेंबर पासून सुरू असलेल्या धरणे आंदोलनास एमआयएमने मोर्चाद्वारे जाहीर पाठिंबा दिला. धरणे आंदोलनाच्या ठिकाणी अनेकांनी भाषणे केली. यावेळी मंडळ अधिकारी शंकर जाधव यांना देण्यात आलेल्या निवेदनात मुस्लिम समाजाचे शैक्षणिक , सामाजिक व आर्थिक मागासलेपण दूर करण्यासाठी आरक्षण देण्यात यावे , उदगीर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा मुख्य रस्त्याच्या मध्यभागी उभारून सुशोभीकरण करण्यात यावे , सूफी संत शाहमदशाह खादरी दर्गा समोर कमान उभारून व मस्जिदसाठी जागा उपलब्ध करुन देण्यात यावी. अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
यावेळी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद अली शेख , भारतीय दलित पॅंथरचे प्रदेश उपाध्यक्ष निवृत्ती सांगवे , सय्यद ताहेर हुसेन, मुसा पठाण, अखिल शेख ,मौलाना नौशाद , हाफिज मोहियोद्दिन शेख , साबेर पटेल , फेरोज पठाण,मजहर पटेल, मुकरम जहागीरदार , सनाउल्ला खान,अहमद सरवर, अजित शिंदे, फय्याज शेख , मोहम्मदअली जहागीरदार , फारुख मौलाना , अजीज पटेल , जहांगीर पटेल , जावेद बागवान , जलील चौधरी आदी मोर्चामध्ये सहभागी झाले होते.